मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातून यंत्रणांनी शाश्वत ग्रामविकास साधावा – जिल्हाधिकारी अशोक काकडे ; अभियानाच्या आढावा बैठकीत दिल्या सूचना

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 3 : शाश्वत ग्रामविकासासाठी यंत्रणांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान परस्पर समन्वयाने यशस्वी करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिल्या.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, तहसीलदार लीना खरात, अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बिभीषण सारंगकर, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक टी. एन. खांडेकर, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास इनुजा शेख आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, केंद्र शासनाच्या पंचायत राज विभागाने शाश्वत विकासाच्या ध्येयांच्या स्थानिकीकरणाच्या अनुषंगाने शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे अपेक्षित आहे. विकासाच्या बहुतांश योजना पंचायत राज विभागामार्फत राबवल्या जातात. त्यामुळे या योजनांची प्रभावी व जलद गतीने अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांनी कार्यवाही करावी. शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवावा व त्यांचे जीवनमान उंचवावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे म्हणाले, दिव्यांग युडीआयडी वाटप, नळपाणी पुरवठा जोडणी, संजय गांधी निराधार योजना, विद्यार्थ्यांना जातीचे दाखले, आदिंच्या अनुषंगाने संबंधित यंत्रणांनी तालुका स्तरावर बैठक घेऊन परस्पर समन्वय ठेवावा. जास्तीत जास्त पात्र लाभार्थींना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी कार्यरत राहावे. या अभियानात सांगली जिल्ह्याची कामगिरी उल्लेखनीय व्हावी, यासाठी जिल्हा परिषद व अन्य शासकीय यंत्रणांनी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे ते म्हणाले.
यावेळी दिव्यांगांना युडीआयडी वाटप, पीएम सूर्यघर, कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून पात्र बेरोजगारांना कौशल्य विकास प्रशिक्षण व कर्जवाटप, संजय गांधी निराधार योजनेतून पात्र लाभार्थींची यादी मंजुरी, ॲग्रिस्टॅक योजना, शेतकरी उत्पादक गट संस्था, बचत गटांना प्रशिक्षण आदिंसह अन्य बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीस उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.