सांगली, मिरज व कुपवाड शहरातील मद्यविक्री आस्थापना चालकांना पोलीस अधीक्षकांचे आदेश

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली येथे सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील खाद्य पेय विक्रेता मालक-चालक यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये खाद्य पेय विक्रेता मालक चालक असोसिएशन, सांगली जिल्हा अध्यक्ष लहु भडेकर, सचिव रमेश शेट्टी तसेच उपाध्यक्ष मिलिंद खिलारे यांनी मद्यविक्री आस्थापना मालकांना येणाऱ्या विविध समस्या व अडचणी याबाबत चर्चा केली.
बैठकीदरम्यान मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांनी मद्यविक्री आस्थापना चालकांना कडक पालनाचे आदेश देत पुढील सूचना दिल्या :
२१ वर्षाखालील व्यक्तींना मद्यविक्री करू नये.
आस्थापनेच्या अनुज्ञप्ती क्रमांकाचा बोर्ड स्पष्ट दिसेल असा लावावा, परवाना वेळेवर नूतनीकरण करावा, रजिस्टर अद्यावत ठेवावे.
परवानाविना व्यक्तींना मद्यविक्री करणे बंदी असून अवैध दारू विक्रीमुळे वाढणाऱ्या गुन्ह्यांवर अंकुशासाठी सर्वांनी सहकार्य करावे.
विनापरवाना मद्यपान केले गेले व त्यातून गुन्हा घडला तर संबंधित आस्थापना चालकावर जबाबदारी राहील.
उघड्यावर मद्यपान झाल्यास तत्काळ पोलीस विभागास माहिती द्यावी.
आस्थापनेमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व व्यक्तींची तपासणी करावी. आवश्यकतेनुसार सिक्युरिटी रक्षक नेमावा.
प्रवेश व बाहेर जाण्याचा मार्ग एकच असावा.
आस्थापनेच्या सर्व बाजू CCTV मध्ये कॅप्चर होतील अशा उपाययोजना कराव्यात. CCTV कायम सुरु स्थितीत असावेत.
चायन/वाईन शॉपमध्ये मोठ्या प्रमाणात एकाच व्यक्तीस मद्यविक्री टाळावी. निवडणूक कालावधीत विशेष दक्षता घ्यावी.
या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी (मुख्यालय) संजय मोरे तसेच मिरज शहर, कुपवाड MIDC, महात्मा गांधी चौक, सांगली शहर, संजयनगर व विश्रामबाग पोलीस ठाण्यांचे अधिकारी उपस्थित होते. खाद्य पेय विक्रेता मालक चालक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती.