‘दैनिक नवराष्ट्र’ तर्फे श्री. रावसाहेब पाटील यांना ‘कॉ-ऑपरेटिव्ह आयकॉन’ पुरस्काराने सन्मानित

प्रतिष्ठा न्यूज
मुंबई : स्वातंत्र्यपूर्व काळापासून सहकार, समाजकारण आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात महत्त्वाचे स्थान असलेल्या नवभारत वृत्तपत्र समूहाच्या ‘दैनिक नवराष्ट्र’ तर्फे आयोजित ‘नवराष्ट्र को-ऑपरेटिव्ह अवॉर्ड 2025’ या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात सांगली येथील श्री. रावसाहेब पाटील यांना ‘कॉ-ऑपरेटिव्ह आयकॉन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी माजी मंत्री विनय कोरे, आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, सहकार व पणन सचिव प्रवीण दराडे, नवभारत वृत्तपत्र समूहाचे समूह प्रमुख श्रीनिवास राव, दैनिक नवराष्ट्रचे संपादक संजय मलमे, विभागीय व्यवस्थापक राजेश वरळेकर, तसेच सांगली जिल्हा आवृत्ती प्रमुख प्रवीण शिंदे तसेच सहकार क्षेत्रात काम करणारे विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते .
श्री. रावसाहेब पाटील यांनी सहकार क्षेत्रातील अनेक महत्त्वपूर्ण संस्थांमध्ये प्रभावी कार्य केले आहे. त्यामध्ये कर्मवीर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली, सिम्बॉयसिस को-ऑपरेटिव्ह फार्मास्युटिकल लिमिटेड, सांगली, आणि सांगली डिस्ट्रिक्ट केमिस्ट्स क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांसारख्या संस्थांचा समावेश आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली या संस्थांनी पारदर्शकता, सेवा भाव आणि सदस्याभिमुख कार्यपद्धतीच्या माध्यमातून उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
या प्रसंगी आयोजित प्रकट मुलाखतीत श्री. पाटील यांनी सहकार क्षेत्रातील आपले अनुभव आणि विचार मांडले. त्यांनी ग्रामीण भागातील आर्थिक प्रगतीसाठी सहकार चळवळीचे मोल अधोरेखित केले तसेच पतसंस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक पाठबळ देण्याच्या कार्याचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी पतसंस्थांमधील ठेवींना विमा संरक्षण मिळावे अशी अग्रक्रमाने मागणी केली
या पुरस्कारामुळे सहकार क्षेत्रात कार्यरत सर्व सहकारी संस्थांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रेरणादायी ऊर्जा मिळाल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.



