नगराध्यक्ष पदासह सर्व उमेदवारांची यादी तयार राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांची पत्रकार परिषदेत घोषणा

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव नगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट स्वबळावर लढवणार आहे,सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून नगराध्यक्ष पदासह सर्व उमेदवारांची यादी तयार आहे.ती योग्य वेळी जाहीर करण्यात येईल. अशी माहिती तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी सचिन पाटील म्हणाले,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत मुंबई येथे झालेल्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद,पंचायत समिती, महापालिका,नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला आहे.तासगाव नगरपालिकेची निवडणूकही जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटही ही निवडणूक स्वतंत्रपणे, स्वबळावर लढविणार आहे.पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत तासगाव – कवठेमहांकाळ मतदार संघातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.या बैठकीत पवार यांनी मतदारसंघातील राजकीय स्थिती, राष्ट्रवादीची गटबांधणी व आगामी निवडणुकांसाठीची तयारी याबाबतचा आढावा घेतला.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढवाव्यात,असे स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,सांगली जिल्हा अध्यक्ष (ग्रामीण) निशिकांतदादा पाटील,प्रदेश सरचिटणीस प्रतापनाना पाटील,ज्येष्ठ नेते माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार,तसेच पक्षश्रेष्ठी यांच्या आदेशानुसार तासगावची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढण्याची तयारी केली आहे. वार्ड निहाय उमेदवारांची यादी जवळ जवळ निश्चित झाली आहे.काही वार्डांमध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे.दोन दिवसांत इच्छूकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.तसेच इतर पक्षातील काही नेते व माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश करणार आहेत.कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वबळावर लढणार आहे असा निर्धार सचिन पाटील यांनी व्यक्त केला.
इच्छुकांनी तासगाव शहर अध्यक्ष दिनेश पवार व ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष अजय चव्हाण यांच्याबरोबर संपर्क साधावा असे सचिन पाटील यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला तासगाव शहर अध्यक्ष दिनेश पवार, ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष अजय चव्हाण,महिला आघाडी सांगली जिल्हा उपाध्यक्ष सौ.विद्या गायकवाड महिला आघाडी तासगाव तालुका अध्यक्ष सौ. छाया पाटील,शशिकांत मोहिते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.



