ऊसावरील लोकरी माव्याचे एकात्मिक व्यवस्थापन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात ऊसातील लोकरी मावा या किडीने पहिल्यांदा आभूतपूर्व पातळी गाठली आणि ऊस पिकाचे गंभीर नुकसान केले.ऊस लागवडीत लोकरी माव्याचा मोठ्या प्रादुर्भावामुळे ऊसाच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली आणि साखरेचे प्रमाण १५ टक्क्यांपर्यंत कमी झाले.
*नुकसानीचा प्रकार*
ऊसाच्या शेतात प्रामुख्याने जवळच्या तळाशी झाडांवर १० ते १५ मिटर त्रिज्येच्या पॅचमध्ये नुकसान होते. पानांचा खालचा पृष्ठभाग: मध्य शिरेच्या दोन्ही बाजूंला माव्याची वसाहत असते. लागवड आणि खोडवा ऊस: सक्रिय वाढीच्या अवस्थेत, फुटवे निर्मितीच्या अवस्थेत, मोठ्या वाढीच्या काळात आणि परिपक्वतेच्या टप्यात लोकरी मावाचा प्रादुर्भाव होतो.
*एकात्मिक व्यवस्थापन*
– ऊसाची पट्टा अथवा रुंद सारी पद्धतीने लागवड करावी.
– कीड ग्रस्त भागातील ऊस बेण्यासाठी वापरू नये.
– सुरुवातीस पानांवर लोकरी मावा आढळून आल्यास अशी प्रादुर्भाव ग्रस्त पाने काढून घ्यावीत आणि जाळून टाकावीत.
– बेणे निवडून झाल्यानंतर सदर ऊसाची पाने जाळून टाकावीत.
– ऊस लागवडी पूर्वी मेलॅथिऑन ३० मिली प्रती लिटर पाण्यात १५ मिनिटे बेणे बुडवून घ्यावे.
– रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा.
– नत्रयुक्त खतांचा वापर जास्त केल्यास या किडीला प्रोत्साहन मिळते.
– प्रादुर्भाव ग्रस्त ऊसाची हिरवी अथवा कोरडी पाने एका शेतातून दुसऱ्या शेतात किंवा एका भागातून दुसऱ्या भागात घेऊन जाऊ नये.
– मित्र कीटक कोनोपात्रा एफिडिवोरा च्या १००० आळ्या किंवा मायक्रोमस इगोरोटस २५०० किंवा क्रायसोपरला च्या २५०० आळ्या प्रती हेकटर याप्रमाणे शेतात सोडाव्यात.
– कडूनिंब आधारित किटकनाशक ५% ३७५ मिली ७५० लीटर पाणी याप्रमाणे हेक्टरी फवारणी करावी.
– रासायनिक कीटकनाशक फवारणी करण्यापूर्वी ऊसावरील लोकरी माव्यावर मित्र कीटकांची संख्या चांगल्या प्रमाणात असेल तर रासायनिक कीटकनाशकांची फवारणी शक्यतो टाळावी.
– रासायनिक कीटकनाशक फवारणीनंतर हे मित्र किटक १५ दिवस शेतामध्ये सोडू नये किंवा सोडल्यानंतर फवारणी करू नये.
– ऊस पिकासाठी पाण्याचा संतुलित प्रमाणे किंवा अवश्यकतेनुसार वापर करावा.
– लेकॅनीसिलीम लेकॅनी (१×१०८ CFU) किंवा मेटाऱ्हीझीअम @५ ग्रॅम प्रती लीटर पाण्यातून १० दिवसाच्या अंतराने २ ते ३ फवारण्या कराव्यात.
– मावा किडीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आल्यास क्लोरोपायरीफॉस २०% इसी १.०० ते १.५० मिली किंवा ऍसीफेट २ ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून गटूर अथवा पावरच्या पंपाने फवारणी करावी.
*शेतकऱ्यांसाठी सल्ला*
– ऊस लागवडीपूर्वी बेणे उपचार करावा.
– रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा.
– मित्र कीटकांचा वापर करावा.
– रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळावा.
– पाण्याचा संतुलित वापर करावा.