सांगलीत बिबट्याचा वावर; नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली वनविभागातील मिरज मधील कुंभार मळा या ठिकाणी बिबट्याचे ठसे दिनांक १४.११.२०२५ रोजी दिसून आले होते. सदर ठस्यांची खात्री झाले नंतर वन विभागामार्फत सदर परिसरामध्ये वनविभागाचे जलद कृतीदल बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात आले होते. तथापी प्रत्येक्ष बिबट्या दिसून आला नव्हता. दिनांक १६.११.२०२५ रोजी रात्री १२:०० ते १२:३० च्या दरम्यान वालनेसवाडी परिसरात भरती हॉस्पिटल समोरील मिरज सांगली रोडला रात्री १२ च्य सुमारास एक बिबट दिसला आहे. ही बातमी खरी असून रात्री वन विभागाचे कर्मचारी तसेच जलद कृतीदल व पोलिस यांचेमार्फत संयुक्त पणे भारती हॉस्पिटल परिसर वालनेस वाडी परिसर, विजयनगर, हसणी आश्रम, वालचंद कॉलेज परिसर विश्राम बाग या भागात गस्त करत पाहटे पर्यंत पाहणी केली. तथापी सदर परिसरात बिबट्या असल्याचे ना कारता येत नाही. १४/११/२०२५ पासून आज पर्यंत कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. बिबट्याकडून पशुधन अथवा मनुष्यहानी किंवा त्यावरती हल्ला झालेली घटना कोठेही घडलेली नाही. तरी सुध्दा सदर परिसरातील व आसपासच्या सर्व नागरीकांना दक्षता घेण्याची सूचना करणेत येत आहे. सदर परिसरामध्ये वन विभागाने ट्रॅप कॅमेरे लावलेले असून संपूर्ण परिस्थितीवर वन विभाग, जलद कृती दल व पोलिस लक्ष ठेवून आहेत.
वन विभागामार्फत सर्व नागरिकांना आव्हान करणेत येते की, कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता बिबटया बाबत कांही अस्तित्व किंवा कांही घटना आढळून आल्यास त्वरीत वन विभाग सांगली टोल फ्री क्रमांक १९२६ व ८७८८०३८५३६, ९०४९४२७४७९ या भ्रमणध्वनीवर तात्काळ संपर्क साधणेचे आव्हान वनपरिक्षेत्र अधिकारी, सांगली यांनी केले आहे.