प्रतिष्ठा न्यूज

प्रत्येकाने नोकरी शोधणारा नव्हे तर देणारा बनण्याचा संकल्प करावा – सौ. स्वातीताई सुशांत खाडे

प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
सांगली : उद्योग संचनालय महाराष्ट्र शासन, जिल्हा उद्योग केंद्र सांगली पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सांगली आयोजित हरिहर कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून “CCTV कॅमेरा स्थापना, दुरुस्ती व मार्केटिंग प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात सात्रळकर व्यापारी संकुलात अत्यंत प्रेरणादाई व उत्साही वातावरणात झाली.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयक प्रियांकाताई कांबळे व एमसीडी प्रकल्प अधिकारी किरण बनसोडे यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली हा उपक्रम ३० दिवस अत्यंत प्रभावी व यशस्वीरीत्या राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

या कार्यक्रमास जिल्हाध्यक्षा भाजपा महिला मोर्चा सौ. स्वातीताई खाडे यांनी उपस्थित राहून प्रशिक्षणार्थी तरुण, तरुणींना मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. सरकारी नोकरीच्या मागे धावण्याऐवजी तरुणांनी उद्योगाची कास धरली, तर देशाचा सर्वांगीण विकास निश्चित होईल. स्व-रोजगार आणि उद्योजकतेमुळे रोजगारनिर्मिती होते आणि राष्ट्र आर्थिकदृष्ट्या सक्षम बनते. आजची तरुण पिढी नावीन्यपूर्ण कल्पनांनी उद्योग क्षेत्रात उतरत असून त्यातून आत्मनिर्भर भारताची संकल्पना साकार होत असल्याचे स्वातीताई यांनी सांगितले. पुढे त्या असेही म्हणाल्या की, “प्रत्येकाने नोकरी शोधणारा नसून नोकरी देणारा बनण्याचा संकल्प केला पाहिजे”. यावेळी माजी नगरसेविका तथा माजी जिल्हाध्यक्षा भाजपा महिला मोर्चा सौ. गीतांजली ढोपे पाटील यांनीही भेट दिली. तसेच भाजपा महिला मोर्चा सांगली जिल्हा सोशल मीडिया संयोजिका सुस्मिता कुलकर्णी यांनीही प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या.

तसेच इन्स्टिट्यूटचे आयोजक व प्रशिक्षण देणारे मान्यवर शकुंतला महारुद्र सावळे (B.A. English, रिटायर्ड शिक्षिका), महारुद्र बाळाप्पा सावळे (B.Sc., M.Ed.) यांच्या मार्गदर्शनाखाली CCTV तांत्रिक प्रशिक्षण, इन्स्टॉलेशन प्रॅक्टिकल, नेटवर्किंग, तसेच मार्केटिंग व स्वयंरोजगाराबाबत सखोल माहिती देण्यात आली. हरिहर कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये MSCIT, Tally, Spoken English, एमकेसीएल अधिकृत कोर्सेस, NSDL PAN कार्ड व विविध ऑनलाइन सेवांसह अनेक रोजगारक्षम उपक्रम सातत्याने राबवले जात असून आजचा उपक्रम त्याच श्रेणीतील एक महत्त्वाचे पाऊल ठरला आहे.कार्यक्रमात मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदवला व समाधान व्यक्त केले.