प्रतिष्ठा न्यूज

महिला मोर्चा म्हणजे संघटन, सेवा आणि सशक्तीकरणाचं प्रतीक : स्वातीताई सुशांत खाडे

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
मिरज: नवनियुक्त भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष स्वातीताई खाडे यांचा मिरजेमध्ये सुमनताई खाडे, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्या यांच्या उपस्थितीत माजी महापौर संगीता खोत यांच्या हस्ते श्रफळ, शाल व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी खोत यांनी स्वातीताईंना शुभेच्छा देत, त्यांनी करत असलेल्या निस्वार्थ समाजसेवेची व पक्ष विस्तारासाठी करत असलेल्या कार्याची दखल घेत पक्षाने दिलेला हा सन्मान आहे असे सांगितले. तसेच हे पद म्हणजे सन्मानाबरोबरच सेवेचे व्रत असल्याचे सांगितले. समोरील पदाधिकारी व कार्यकर्त्या महिलांना उद्देशून त्यांनी आपल्यातील क्षमतांना ओळखून कार्य करा म्हणजे प्रगतीचा मार्ग लवकर सर करता येईल. तसेच पक्षश्रेष्ठी याचे मोजमाप करतील आणि आपली प्रगती होण्यास कोणीही अडवू शकणार नाही असे सांगितले.

यावेळी स्वातीताई यांनी भाजपा महिला मोर्चा म्हणजे संघटन, सेवा आणि सशक्तीकरणाचं प्रतीक आहे. महिलांच्या प्रगतीशिवाय राष्ट्राची प्रगती अपूर्ण आहे, आणि हाच आमच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे असे प्रतिपादन केले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुका, मंडळ आणि बूथ स्तरावर आमच्या भगिनी सक्रिय व्हाव्यात, आत्मविश्वासाने उभ्या राहाव्यात, हे माझं ध्येय आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या महिला कल्याण योजनांचा लाभ घराघरात पोहोचवणे, महिलांच्या आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षिततेसाठी जनजागृती करणे, आणि गरजू भगिनींना शासन योजनांचा प्रत्यक्ष फायदा मिळवून देणे हेच आमच्या कामाचं स्वरूप असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच महिलांना उद्देशून आपण सर्व मिळून “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास” या विचारांना मूर्त रूप देऊ असेही सांगितले. महिला मोर्चा ही फक्त संघटना नाही, तर मातृशक्तीचा एक जागर आहे जो समाज परिवर्तनाचा दीप प्रज्वलित करणार आहे.

आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण आपला जिल्हा भाजप महिला शक्तीचे आदर्श उदाहरण बनवू शकतो. त्यासाठी सर्वांना आपापसातील हेवे दावे विसरून सक्रिय होण्याचे आवाहन केले.

यावेळी ज्योती जयपाल कांबळे महिला मोर्चा प्रदेश सचिव, रूपाली देसाई अनुसूचित मोर्चा प्रदेश सचिव अनिता हारगे पश्चिम मंडल अध्यक्ष, लतिका शेकणे जिल्हा सरचिटणीस, अनघा कुलकर्णी पूर्व मंडल अध्यक्ष शोभाताई गाडगीळ समन्वयक, प्राची फाटक पूर्व मंडल उपाध्यक्ष, तानंगचे माजी सरपंच सुनंदा खोत, रूपाली गाढवे, राजश्री कोरे, रेखा शेजवळ, वर्षा वांढरे, शोभा तोडकर, कपिला पाटील, रूपाली पवार ,ज्योती मगदूम, सारिका राहुटे व इतरही महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थिती होत्या. तसेच विठ्ठल खोत व दयानंद खोत यांनीही उपस्थित राहून स्वातीताईंचे अभिनंदन केले.