शहाजी महाविद्यालयात जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांचा गौरवपूर्ण सत्कार

प्रतिष्ठा न्यूज
कोल्हापूर प्रतिनिधी : दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला नवी उंची देत श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात जागतिक दिव्यांग दिनानिमित्त एक प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला. एन.एस.एस. विभाग आणि क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाला दिव्यांग विद्यार्थी, त्यांचे पालक तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात दिव्यांग विद्यार्थ्यांनी व पालकांनी व्यक्त केलेले मनोगत सर्वांना भावणारे ठरले. शिक्षणातील अडथळे ओलांडत पुढे जाण्याचा त्यांचा संघर्ष आणि जिद्द यांचे प्राध्यापकांनीही कौतुक केले. दिव्यांग विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण होते. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत सांगितले की, “दिव्यांगत्व ही अडथळा नसून प्रगतीचा वेगळा मार्ग आहे. संधी दिल्यास हे विद्यार्थी समाजासाठी आदर्श निर्माण करू शकतात.”
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादांचे या उपक्रमास मिळालेले मार्गदर्शन आणि प्रोत्साहन विशेष ठरले.
कार्यक्रमाला डॉ. राहुल मांडणीकर, श्री रविंद्र भोसले, श्री मनीष भोसले आणि डॉ. पांडुरंग पाटील यांची उपस्थिती लाभली.
उपक्रमाचे नियोजन डॉ. विजय देठे, डॉ. प्रशांत पाटील, प्रा. संतोष कांबळे आणि प्रा. प्रशांत मोटे यांनी प्रभावीपणे केले.
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्षमतांना योग्य व्यासपीठ देण्याचा महाविद्यालयाचा हा उपक्रम समाजासाठी एक सकारात्मक संदेश देणारा ठरला आहे.