प्रतिष्ठा न्यूज

तासगावचे निर्भया पथक कागदावरच संवेदनशील शहराला खमक्या अधिकाऱ्याची गरज

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव शहर पोलिसांच्या निर्भया पथकाच्या कारवाया थंडावल्याने विद्यार्थिनींची छेडछाड करणे,त्यांचा विनयभंग करणे, त्यांच्याभोवती दुचाकीवर फिरणे, त्यांना कट मारून जाणे असे प्रकार करीत शहरातील बस स्थानक, महाविद्यालये,शाळांभोवती रोडरोमिओंनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे शहर पोलिस ठाण्यातील निर्भया पथक फक्त कागदावरच आहे की काय असे वातावरण झाले आहे. तर याबाबत तासगावकर पालकांमध्येही नाराजी पसरली आहे.
विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी व रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात “निर्भया’ पथकाची निर्मिती करण्यात आली आहे.मात्र शहर पोलिसांचे पथक सध्या कोमात गेले आहे.त्यामुळे पालकांच्या जीवाला घोर लागला आहे.कॉलेज व शाळांचा परिसर, बसस्थानक,बस थांबे येथे मुलींची रोडरोमिओंकडून छेडछाड तसेच शेरेबाजी,मुलींना पाहून गाड्या जोरात दामटण्याचे प्रकार सर्रास सुरू झाले आहेत.मात्र या प्रकाराकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असून रोडरोमिओंवर खास लक्ष ठेवण्यासाठी नेमण्यात आलेले निर्भया पथक कायम कार्यरत राहणे गरजेचे आहे.असे असतानाही त्यांच्याकडून अपेक्षीत कारवाई होताना दिसत नाही.त्यामुळे विद्यार्थिनींचे शिक्षण घेण्यासाठी कॉलेजला ये- जा करणे अवघड बनले आहे.पालकांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे.
शहरातील प्रमुख शाळा कॉलेज याठिकाणी शिक्षणानिमित्त महाविद्यालयात ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींना व महिलांना रोडरोमिओंकडून अश्लील शेरेबाजी व हावभाव करून तसेच त्यांच्या मागेपुढे घुटमळत त्रास देण्याचा प्रकार होत आहे.या गंभीर प्रकाराकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत यासाठी नेमण्यात आलेल्या ‘निर्भया’ हे पथक केवळ नावालाच आहे का असा सवाल विद्यार्थिनी करत आहेत. रोडरोमिओंच्या त्रासामुळे पालकांमध्येही भीतीचे वातावरण आहे.आपल्या मुलींना शिक्षणासाठी कॉलेजला पाठवायचे की नाही,असा मोठा प्रश्न पालकांसमोर उभा आहे.
कॉलेज अथवा शाळेत गेलेली आपली मुलगी सुरक्षित घरी येईल किंवा नाही याबाबत पालकवर्ग खास करून महिलावर्ग कमालीचा चिंतीत असल्याचेही आढळून आले आहे.
बस स्थानक परिसर,कॉलेजच्या शाळेच्या रस्त्याला आणि गेटच्या आसपास परिसरातीलच काही मुले घुटमळत असतात.रस्त्यावरून ये-जा करताना आम्हाला छेडतात.आम्हाला पाहून गाड्या जोरात मारणे,शिट्ट्या मारणे तसेच अश्लील भाषेत बोलणे यासारखे प्रकार वाढल्याचे चित्र आहे.
कॉलेज बंद होईल म्हणून आम्ही हे प्रकार घरी सांगत नाही त्यामुळे टपोरीचा उच्छांद वाढला आहे असे काही विद्यार्थीनीनी सांगितले.
शहरात पुन्हा एकदा टवाळखोरांचे फावल्याने शिक्षण,नोकऱ्यांसाठी घराबाहेर पडणाऱ्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे शहर पोलिसांनी तातडीने लक्ष घालून तासगाव शहरातील निर्भया पथकांना पुन्हा सुसज्ज करण्याची नितांत गरज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button