प्रतिष्ठा न्यूज

यंदा तासगाव श्रींचा रथोत्सव 28 ऑगस्टला,श्रावण मास अनुष्ठान प्रारंभ

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : मराठा साम्राज्याचे सरसेनापती परशुराम (भाऊ) रामचंद्रपंत पटवर्धन (जन्म १७४०: अंत १७९९) यांनी स्थापन केलेल्या तासगांवच्या श्रीगणपति मंदिराचा वार्षिक भाद्रपद मास उत्सव शके १९४७ यंदा दि २४ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट २०२५ या कालावधीत साजरा होणार आहे.परशुराम‌भाऊ यांनी सुरू केलेल्या या समारोहाचें २०२५/२६ हे सलग २४६ वे वर्ष आहे.ऋषिपंचमीचा रथोत्सव हे या उत्सवाचे अतुलनीय असे आकर्षण तर आहेच,परंतु या सोहळ्यांतील इतर अनेक सांस्कृतिक महत्त्वाची वैशिष्ट्‌ये जनमानसात फारशी प्रसिद्ध नाहीत,त्यापैकी एक प्रमुख म्हणजे प्रतिवर्षी होणारे श्रावण-मास-अनुष्ठान हे आहे.
मंदिर हे पंचायतन मंदिर असून गणेशश्री भोवती श्रीविष्णु,श्रीमहादेव,श्रीसूर्यनारायण व श्री उमादेवी अशा चार देवता आहेत.वार्षिक भाद्रपद मास उत्सवापूर्वी पावित्र्यपोषक असे वातावरण श्रीगणेश चतुर्थीपूर्वी एक महिना तयार होत जावे,म्हणून श्रावण  शु॥४ रोजी हे अनुष्ठान-पर्व सुरू होतें, व श्रीगणेश चतुर्थी दिवशी समाप्त होतें.मंदिरातल पाचहीं देवतांच्या वेद मंत्र,सुक्ते,रुद्र,लघुरुद्र इत्यादीचें पठण हा पूर्ण महिना मंदिरातील ज्ञानी शास्त्री / पंडिताकडून केले जाते.सोमवारी सकाळी १० वाजता हे अनुष्ठान पं.अनंतशास्त्री जोशी यांच्या सूत्रसंचलनाकडे,शास्त्रोक्त पध्दतीने सुपूर्द करण्याचा कार्यक्रम मंदिरांत विश्वस्त-अध्यक्ष श्री राजेन्द्र परशुराम पटवर्धन,विश्वस्त सचिव सौ सितारा राजेन्द्र पटवर्धन व विश्वस्त श्री.राहुल राजेंद्र पटवर्धन यांच्या उपस्थितीत पार पडला.सर्व नियोजन मंदिराचे प्रमुख सरव्यवस्थापक पवनसिंह कुडमल,व्यवस्थापक अशोक कुंभार व व्यवस्थापक अथर्व अनंत जोशी यांनी केले होते.
अनुष्ठान-पर्वाची श्रेय-नामावली पुढील प्रमाणे आहे.श्रीगणपति प.अनंतशास्त्री शंकर जोशी व श्रीमहादेव पं.दीपकशास्त्री पांडुरंग जोशी,
श्रीविष्णुदेव पं अथर्व अनंत जोशी,
श्रीसूर्यनारायण पं.शशिकांत वामन जोशी,श्री उमादेवी पं.विजय नारायण कुलकर्णी,श्रीगणेश पुराण पं मल्हारी मोहन कुलकर्णी,राजवाडा-देवपूजा व श्रीसुक्त पठण पं अजित वसंत कुलकर्णी.या कार्यक्रमापूर्वी प्रथेप्रमाणे वार्षिक रथोत्सवापूर्वी डागडु‌जीसाठी रथ रथगृहाबाहेर, शाखविधिपूर्वक घेण्यात आला.यावेळी रथसंचालनाचे प्रमुख मानकरी रंगराव धोत्रे,संतोष धोत्रे,दत्ता जाधव व त्यांचे सर्व गाडी-वडार सहकारी व इतर मानकरी उपस्थित होते.यावेळी विश्वस्त अध्यक्ष श्री राजेंद्र पटवर्धन यांनी आवाहन केले आहे कि यंदाचा रथोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदोत्सवात व्हावा यासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी उपस्थित रहावे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!