अमावस्येला जिवंत बोकड झाडाला उलटे टांगले! कवलापूर येथील अघोरी प्रकार
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील कवलापूर या गावांमध्ये तासगाव रस्त्याकडेच्या एका लिंबाच्या झाडाला मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या दर्श सोमवती अमावस्येच्या दिवशी कोणीतरी अंधश्रद्धेतून एक जिवंत बोकड आणून त्याचे मागील दोन पाय दोरीने बांधून त्याला झाडाच्या फांदीला उलटे लटकवून ठेवले होते. आठवडाभर ते बोकड त्याच अवस्थेत राहिल्यामुळे त्या बोकडाचा तडफडून मृत्यू झाला आहे. ही घटना कवलापूर येथील जागरूक नागरिक शिवाजीराव पाटील यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगली ला कळवली. तातडीने अंनिसचे कार्यकर्ते डॉ. संजय निटवे, राहुल थोरात, फारुख गवंडी यांनी जाऊन या घटनेची पाहणी केली.
तेव्हा त्यांना तासगाव रोड पासून पन्नास फूट अंतरावरील शेतातील एका लिंबाच्या झाडाला एक वर्षे वयाचे, अंदाजे दहा किलो वजनाचे बोकडाचे मागील दोन पाय रस्सीने बांधून त्याला उलटे टांगून ठेवले होते. आठवडाभर ते बोकड तसेच राहिल्यामुळे त्याचा तडफडून मृत्यू झाला आहे.
हा सर्व प्रकार अमावस्येच्या रात्री ज्याप्रकारे केला आहे, यामागे अघोरी प्रथा आणि अंधश्रद्धेचा प्रकार दिसून येतो. आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या कडे चौकशी केली असता, त्यांनी सांगितले की पाडव्याच्या आदल्या दिवशी असणाऱ्या सोमवती अमावस्येच्या रात्री एक गाडी रस्त्याकडेला येऊन थांबली होती. त्यातील लोकांनी हा प्रकार केला असावा असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
या पूर्वी ही कवलापूर मध्ये मागील महिन्यात कवलापूर येथील रसूलवाडी रोडवर असाच झाडाला बोकड उलटे टांगून अघोरी प्रकार केला गेला होता.
झाडाला असे उलटे जिवंत बोकड टांगून त्याचा बळी देण्याचा अघोरी प्रकार पहिल्यांदाच आम्ही पाहत आहे असे अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात, फारूक गवंडी यांनी सांगितले.
कोणीतरी मांत्रिकाच्या किंवा देवरुर्षीच्या सल्ल्यानुसार हा अमावस्येच्या दिवशी प्रकार केला असावा असे वाटते. याबाबत अंनिस च्या कार्यकर्त्यांनी सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनला माहिती दिली. तसेच कवलापूर गावच्या सरपंच, तंटामुक्त अध्यक्ष, पोलीस पाटील यांनाही कल्पना दिली आहे. परंतु त्यांनाही या प्रकाराबद्दल सविस्तर माहिती नव्हती.
जिवंत बोकडाला झाडाला उलटे टांगून अघोरी पद्धतीने बळी देणे. ही अत्यंत अमानवी, अघोरी प्रथा आहे, असे कृत्य करणाऱ्या वर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार आणि प्राणी छळ प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते राहुल थोरात, फारूक गवंडी,डॉ. संजय निटवे यांनी केली आहे.
या प्रकाराबद्दल अधिक माहिती कोणाला असल्यास त्यांनी पोलिसांशी किंवा अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. तसेच अशा प्रकारामुळे घाबरून न जाता नागरिकांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाने विचार करून अंधश्रद्धेला आपल्या आयुष्यात धारा देऊ नये असेही आवाहन अंनिसने केले आहे.