प्रतिष्ठा न्यूज

व्यक्तिमत्व विकास शिबीरं होणं हे मुलांबरोबरच पालकांनाही गरजेचे : नाट्य दिग्दर्शिका चेतना वैद्य

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली: बारा वर्षांच्या परंपरेनुसार, यावर्षी देखील दिपाली यशवंत कुलकर्णी यांच्या उन्हाळी “तालरंग” नृत्यनाट्य शिबीराचे आयोजन केले गेले. नृत्यकलेच्या कथक, आणि भरत नाट्यम मध्ये विशारद असलेल्या दीपाली या आपली सरकारी नोकरी सांभाळत कलेची भूक भागवण्यासाठी गेली अनेक वर्षे या शिबिराचे आयोजन करीत आहेत. नाट्यपंढरीमधील बुरसटलेल्या राजकारणापासून दूर रहात. निरागस बाळगोपालांमध्ये रमत आजवर १०० च्या वर मुलांना त्यांनी घडवले आहे. मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा, सभाधीटपणा यावा, स्वतःमधे असलेले गुण त्याना कळावेत या उद्देशाने दि.११ मे ते १९ मे २०२४ या कालावधी मधे तालरंग शिबिराचं आयोजन सांगली मधील विश्रामबाग येथील रोटरी क्लब बहुउद्देशीय सभागृहात घेण्यात आले.
या शिबिराचा सांगता समारोप रविवार दिनांक १९ मे २०२४ रोजी सायंकाळी संपन्न झाला. यावेळी मुलांनी त्यांची कला सादर केली. सदर कार्यक्रमास जेष्ठ नाट्य दिग्दर्शिका चेतना वैद्य प्रमुख पाहुण्या लाभल्या.या प्रसंगी बोलताना “मोबाईल मधल्या रिल मध्ये अडकलेल्या आजच्या युगात सांस्कृतिक कलेचा खरा खुरा अनुभव घेण्यासाठी अशी शिबीरं होणं हे मुलाबरोबरच पालकांसाठी गरजेचं आहे” असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी रोटरी क्लबचे अमित पाटील यांनी अशा उपक्रमांना रोटरी क्लब नेहमीच पाठीशी असेल असे अश्वासन दिले.
प्रमुख उपस्थिती असलेले रेडिओ निवेदक विशाल कुलकर्णी यांनी अशा शिबिरामधून नकळतपणे मुलांचा विकास होतो. हसत खेळत मुलांमध्ये अमूलाग्र सकारात्मक बदल कसा घडतो यावर भाष्य केले. दहा दिवस चाललेल्या या शिबिरात अथर्व पतकी, आराध्या पुंदे, असावरी पुंदे, शिवात्मिका उकले, श्रीश कुलकर्णी, आर्य उंडे, स्वराली साळुंखे, रूजुला जोशी, ओवी सात्रस, माही लोखंडे, मिहीर कुलकर्णी, आर्वी भोसले, राही कुलकर्णी, श्रुती भोसले, प्रियांका देशपांडे या कलाकारांनी आपली कला सादर करीत, मोबाईल शिवायही एका वेगळ्या रंगीबेरंगी विश्वाची अनुभूती घेत धमाल केली. सर्व मुलांच्या पालकांनी रोज मुलांसाठी खाऊ देऊन अत्यंत आस्थेने आपला सहभाग नोंदवला. या उपक्रमास सचिन साठे यांनी लाईट्स आणि साऊंड व्यवस्थेची जबाबदारी मनापासून पार पाडली तसेच, पुष्कर कुलकर्णी व सुपर्ण मराठे यांचे विशेष सहकार्य लाभले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.