प्रतिष्ठा न्यूज

लोकसभेसाठी सांगलीत संजयकाकाच बॉस; विशालदादांची उमेदवारी आभासी?

प्रतिष्ठा न्यूज / तानाजीराजे जाधव
सांगली : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगली लोकसभेसाठी विशालदादा पाटील यांची तयारीला लागा असे सांगून उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर खासदार संजयकाका पाटील यांनी जत्रा आल्यावर व्यायाम करणारा मी पैलवान नाही, असे विधान करत त्यातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला. संजयकाका पाटील यांना भाजपच्या अनेक स्थानिक नेत्यांकडून खासदारकीच्या उमेदवारीसाठी विरोध आहे. परंतु सध्या तरी जिल्ह्यामध्ये संजयकाका पाटील यांच्याइतका प्रबळ उमेदवार नाही. काँग्रेसमध्ये असणारे गटातटाचे राजकारण आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी असणारा संजयकाका पाटील यांचा सलोखा पाहता सांगली लोकसभा मतदार संघात संजयकाका पाटील हेच एकमेव बॉस आहेत. अजून हा मतदारसंघ काँग्रेसला अधिकृतपणे मिळालेला नाही. त्यामुळे विशाल पाटील यांची उमेदवारी आभासी ठरेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सध्या देशभर लोकसभा निवडणूकीच्या तयारीसाठी सर्वच पक्षांकडून मोठी तयारी सुरू आहे. सांगली लोकसभा मतदार संघातील उमेदवारीसाठी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशालदादा पाटील यांची उमेवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतीच जाहीर केली. परंतु गेल्या काही वर्षातील वाटचाल पाहता विशालदादा यांच्यासाठी ही निवडणूक एवढी सोपी राहिलेली नाही. सन २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत संजयकाका पाटील यांनी ‘वारस पाहिजे का सरस पाहिजे’ हा मुद्दा पुढे आणत मोदी लाटेवर स्वार होत माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांचा तिन लाख मतांनी पराभव केला होता. त्यांनतर सन २०१९ च्या निवडणूकीत ऐनवेळी भाजचे गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी घेऊन विशालदादा आणि संजयकाका पाटील यांच्यासमोर कडवे आव्हान निर्माण केले होते. पडळकर यांची उमेदवारी संजयकाका पाटील यांच्या पथ्थ्यावर पडली आणि त्यांचा विजय सोपा झाला. हा गेल्या दोन लोकसभा निवडणूकींचा इतिहास झाला. आता सन २०२४ मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणूकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. त्यासाठी अनेकांनी दंड थोपटले आहेत. तर काहीजणांनी आपली इच्छा बोलून दाखविली आहे.

भारतीय जनता पार्टीमध्ये खासदार संजयकाका पाटील यांच्याविषयी सध्या नाराजीनाट्य सुरू आहे. काही दिवसांपूर्वी सांगलीचे प्रभारी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांचा सांगली दौरा झाला. त्यावेळी सांगली जिल्हा कार्यकारणीतील अनेक नेत्यांनी राणे यांच्या जवळ संजयकाकांविषयी नाराजी व्यक्त केली. या नाराजीमागे त्यातील अनेकांना उमेदवारीचे डोहाळे लागल्याची चर्चा होती. पक्षांतर्गत विरोध झाला आणि संजयकाकांना उमेदवारी मिळू नये यासाठी कितीही फिल्डींग लावली तरी भाजपकडे संजयकाका पाटील यांच्यासारखा प्रबळ उमेदवार दुसरा कोणीही नाही. त्यामुळे पक्षाला त्यांनाच उमेदवारी द्यावी लागेल. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकापर्यंत सततचा संपर्क असणारा आणि सर्व पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारा एकमेव नेता अशी त्यांची ख्याती आहे.

काँग्रेसचे उमेदवार म्हणून विशालदादा पाटील यांना ही निवडणूक सोपी नाही. पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळेच दादा घरातील उमेदवारांची नेहमी गोची होत आली आहे. काँग्रेसमधील गटातटाचे राजकारण नवे नाही. विशालदादा हे जरी प्रदेश उपाध्यक्ष असले तरी काँग्रेसच्या विविध कार्यक्रमांमध्ये नेहमीच माजी मंत्री विश्वजीत कदम यांचा वरचष्मा असतो. सन २०१९च्या निवडणूकीत त्यांना उमेदवारी मिळू नये यासाठी बरीच मोठी फिल्डींग त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी लावली आणि हा मतदार संघच कॉंग्रेसकडून काढून घेण्यात आला. स्वत:च्या हिमतीवर लढणार्‍या दादा घराला त्यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाच्या वळचणीला जाण्याची नामुष्की आली. सध्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक आणि बाजार समितीत दादा गटाला स्थान मिळाले असले तरी त्यांच्या ताकदीनुसार वाटा मिळाला का? त्यांच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला का? या प्रश्‍नाचे उत्तर होकारात्मक येताना दिसत नाही.

संपर्काच्या बाबतीत विशालदादा खूपच कमी पडत आहेत. सोशल मिडियात कितीही बोलबाला केला तरी प्रत्यक्ष संपर्कात तुम्ही कमी पडत असाल तर लोक तुमच्या सोबत आहेत असे म्हणता येत नाही. मतदार संघातील प्रत्येक गावात दादा गटाला मानणारा कार्यकर्ता आहे. परंतु त्यांच्या पर्यंत ते पोहचतात का? हा संशोधनाचा विषय आहे. पक्षांतर्गत विरोधकांनी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्षपद विशालदादांना मिळू दिले नाही. परंतु मिळालेले प्रदेश उपाध्यक्षपद ही त्यांच्यासाठी मोठी संधी होती. राज्यभर काम करत राज्याचे नेते होण्याचा प्रयत्न केला असता तर जिल्ह्यातील काँग्रेस आपोआप त्यांच्या मागे आली असती. परंतु विश्वजीत कदम यांच्या आक्रमक नेतृत्वापुढे विशालदादा शांत राहून केवळ लोकसभा कशी जिंकता येईल. एवढेच बघत आहेत.

मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतिक पाटील यांना सांगली लोकसभेसाठी उभा करण्यात येईल. अशी चर्चा रंगली होती. राष्ट्रवादीला सांगली लोकसभेचा मतदार संघ हवा आहे. परंतु राजकीय सोय पाहूनच ते त्याची मागणी करतील. येणार्‍या निवडणूकीत जयंत पाटील आपल्या मुलाला उभा करण्याचे धाडस दाखविणार नाहीत. परंतु राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते विशालदादा पाटील यांना मनापासून सहकार्य करतील का? याविषयी राजकीय विश्‍लेषकांचे मतभेद आहेत.

एका बाजूला संजयकाका पाटील यांच्यासारखा आक्रमक खासदार आहे तर दुसर्‍या बाजूला पक्षांतर्गत कुरघोड्यांचे राजकारण आहे. अशा परिस्थितीत विशाल पाटील यांची उमेदवारी आभासी ठरावी अशीच आहे. ती वास्तववादी ठरावी यासाठी त्यांना मतदार संघात आपल्या नावाचे एक नवे वादळ निर्माण करावे लागेल. काँग्रेस नव्हे तर दादा गटाचा उमेदवार म्हणून भक्कम बांधणी करावी लागेल. तरच ते पक्षाच्या नव्हे तर स्वबळावर कुस्ती निकाली करण्यात यशस्वी होतील.

आमदार गोपीचंद पडळकर आणि संजयकांका यांची मिळून ९ लाख मते पडतील, असे विधान संजयकाका पाटील यांनी केले आहे. परंतु विशालदादा पाटील हे या संघर्षात कसे आक्रमक ठरतात, संजयकाका यांच्या विरोधकांना ते आपल्याकडे कसे आकर्षित करतात यावर हे गणित अवलंबून आहे.

भाजपमध्ये अनेकजण उड्या मारत असले तरी आज मितीस संजयकाका पाटील यांच्याइतका प्रबळ उमेदवार त्यांच्याकडे नाही. जिल्हाभर सततच संपर्क आणि कट्टर कार्यकर्त्यांची भक्कम फळी ही त्यांची मोठी शक्ती आहे. त्यामुळे सांगली लोकसभा मतदार संघात संजयकाका पाटील हेच एकमेव बॉस आहेत. आणि त्यांना शहर देणारा अथवा निवडणूकीत पराभव करू शकेल असा उमेदवार आज घडीला तर कोणी दिसत नाही. त्यामुळे ‘काका द बॉस’ हेच खरे आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.