प्रतिष्ठा न्यूज
राजकीय

पद नसताना कवलापुरला पाणी दिले, कोठे होते भाजपवाले?: विशाल पाटील सांगली

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : पालकमंत्री विकासकामे केली म्हणून आता दम देत आहेत. त्यांनी व्यक्तिगत कामे केली नाहीत, तर शासनामार्फत केली आहेत. मी शासनाच्या योजनेची वाट न पाहता, आमदार-खासदार नसताना वसंतदादा कारखान्याच्या धडक योजनेचे पाणी कारखान्याच्या जॅकवेलमधून कवलापुरला दिले. गावकर्‍यांची तहान भागवली. त्यावेळी भाजपवाले कोठे होते? असा सवाल अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी सभेत बोलताना केला.
अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ कवलापूर येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. सभेला मिरज तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब कोरे, युवकचे शहर जिल्हाध्यक्ष मनोज सरगर, कवलापूरचे माजी सरपंच विजय पाटील, प्रकाश माळी, माजी उपसरपंच प्रमोद पाटील, सौरभ पाटील, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सदाशिव खाडे, वसंतदादा पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष सुशांत पाटील, माजी अध्यक्ष मोहन पाटील, विकास सोसायटीचे अध्यक्ष दादासाहेब गावडे, प्रविण पाटील, शिवाजी पोळ, सुनंदा पाटील, गजानन सावंत आदी उपस्थित होते.
विशाल पाटील म्हणाले, कवलापुरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. मी आमदार, खासदार नव्हतो. तरी देखील वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या डिग्रज येथील धडक योजनेचे पाणी कारखान्याच्या जॅकवेलमधून दिले. दहा लाख रूपये यासाठी खर्च करण्यात आले. याला कोणतीही शासकीय योजना पाहिली नव्हती. गावातील नागरिकांना पाणी दिले. मात्र आता पालकमंत्री विकासकामे केली म्हणून दम दाखवत आहेत, त्यांनी विकासकामे शासनाच्या निधीतून केली आहेत. व्यक्तिगत केली नसल्याचा टोला पाटील यांनी लगाविला.
भाजपने धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याचा शब्द दिला होता. मात्र हा शब्द पाळला नाही. भाजप आता संविधान अडचणीत आणू पाहत आहे. पण आम्ही वसंतदादांचे वारसदार आहोत. दादांनी जसे प्रत्येक समाजाला संरक्षण दिले, प्रत्येक समाजाच्या पाठीशी ते कायम राहत होते. तेच कार्य आम्ही करत आहोत. वसंतदादा पाटील यांचा वारसा समर्थपणे मी चालविणार आहे. मी त्यांचा वारसा चालवू शकतो का नाही? याच्यासाठी मला निवडून देण्याची गरज आहे. मी कामात राहणारा आहे. पुढचे लोक कामात राहणारे नाहीत. त्यामुळे या निवडणुकीत लिफाफा समोरील बटन दाबून मला विजयी करावे, असे आवाहन विशाल पाटील यांनी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.