प्रतिष्ठा न्यूज

प्रजासत्ताक दिनाचा 73 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 26, (प्रतिनिधी) : सबका साथ सबका विकास हे घोषवाक्य घेवून सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून अनेक कल्याणकारी योजना शासन राबवित आहे. सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द असल्याची ग्वाही कामगार मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनी पोलीस संचलन मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न झाले. राष्ट्रध्वजास सलामी देवून राष्ट्रगीत म्हणण्यात आले. यावेळी त्यांनी सर्व जिल्हावासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देवून संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महानगरपालिका आयुक्त सुनिल पवार, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षा नंदिनी आवडे, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, अपर पोलीस आंचल दलाल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दिपक चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, स्वातंत्र्य सेनानी माधवराव माने आदि मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, लोकांच्या कल्याणासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये विविध विभागातील रिक्त पदांवर भरती, वयाची 55 वर्ष पूर्ण केलेल्या नोंदणीकृत घरेलू कामगारांना सन्मानधन योजनेंतर्गत 10 हजार रुपयांचा आर्थिक लाभ, सलोखा योजना, दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य, दिव्यांग कल्याण यासह विविध सिंचन प्रकल्पांना गती अशा अनेक महत्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत.
शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून शासन काम करीत असून जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या 56 हजाराहून अधिक शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात 205 कोटी पेक्षा अधिक अनुदान वितरीत करून दिवाळीची भेट देण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये 24 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले असून त्यांची रक्कम त्यांच्या खात्यात लवकरच जमा करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले.
पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे 4 लाखाहून अधिक शेतकरी लाभार्थी आहेत. यामध्ये सॉफ्टवेअर मध्ये वैयक्तिक माहिती पूर्ण केलेल्या 2 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना 45 कोटी पेक्षा जास्त रूपयांचा 11 वा हप्ता वितरीत करण्यात आला आहे. तर 70 हजाराहून अधिक लाभार्थ्यांना 12 व्या हप्त्याचे 14 कोटीहून अधिक रूपये वितरीत करण्यात आले आहेत. उर्वरीत शेतकऱ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे. सन 2024 पर्यंत सर्वांना घरे देण्याचे शासनाचे धोरण आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून 22 हजाराहून अधिक घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. त्यामध्ये 62 टक्क्याहून अधिक घरकुले पुर्ण झालेली असून उर्वरीत घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे. राज्य पुरस्कृत योजनांमधून 8 हजाराहून अधिक घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. 6 हजाराहून अधिक इतकी घरकुले पूर्ण झालेली आहेत. तर 2 हजार पेक्षा जास्त घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे.
जिल्ह्यात अनेक रस्त्यांची कामे प्रगतीपथावर असून यामध्ये अनेक वर्षापासून मागणी होत असलेल्या पेठ नाका – सांगली या कामाचा समावेश असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, या रस्त्याच्या 41 किलोमीटर लांबीच्या कामासाठी 860 कोटी रूपये निधी मंजूर केला आहे. या कामाचे उद्या भूमिपूजन होत आहे. त्याचबरोबर अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे कामही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात येत आहे.
पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा शासनाचा निर्धार आहे. विशेषत: जत तालुक्यातील वंचित गावांना पाणी देण्यासाठी म्हैसाळ विस्तारीत योजनेतील वर्षानुवर्ष प्रलंबीत असलेली कामे आपल्या सरकारने तीन महिन्यात गतीमान केली आहेत. या योजनेतील कामांसाठी 981 कोटी रूपयांची निविदा नुकतीच प्रसिध्द करण्यात आली आहे. यामुळे जत तालुक्यातील 65 गावातील सिंचनाच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडविण्यात येणार आहे. म्हैसाळ पाणी योजना सोलरवर चालविण्यासाठी केंद्र शासनाने निधी मंजूर केला आहे. त्यामुळे वीज बिलाचा प्रश्न सुटणार आहे.
दर्जेदार शिक्षण व आरोग्य प्रत्येक नागरिकाचा हक्क असून सरकार व जिल्हा प्रशासन त्यासाठी कटिबध्द असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आरोग्यासाठी 59 कोटीहून अधिक रूपये तरतूद केली आहे. शिक्षणासाठी डीपीडीसीसह विविध माध्यमातून 34 कोटीहून अधिक रूपये खर्च करण्यात येणार आहे. सांगली जिल्हा परिषदेने मॉडेल स्कूल, स्मार्ट पीएचसी, स्मार्ट अंगणवाडी यासारखे राज्याला आदर्श होतील असे उपक्रम राबविले आहेत. ही सांगली जिल्ह्याच्या दृष्टीने प्रशंसनीय बाब आहे. या व्यतिरीक्त जिल्ह्यात मिरज येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलसाठीच्या 275 कोटी रूपये मंजूर झाले आहेत व महिला रूग्णालयाचा विषय आपण मार्गी लावत आहोत. त्याच्या प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही लवकरच पूर्ण होत आहे. ‍
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 416 कोटी 64 लाखाच्या प्रारूप आराखड्याला डीपीडीसीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये 140 कोटी 84 लाख रूपये इतक्या वाढीव अतिरीक्त निधीची मागणी करण्यात आली असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, हा निधी विविध यंत्रणांच्या मार्फत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी खर्च करण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यात उद्योग, व्यापार, निर्यात यांना चालना देण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. यामध्ये विमानतळ करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. पुणे – मिरज रेल्वे मार्गाच्या दुसऱ्या मार्गिकेसाठी भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण झाली असून रेल्वे लाईनचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. या रेल्वेलाईनमुळे रेल्वे वाहतूक वेगवान होणार असून याचा शेतकरी, व्यापारी, नोकरदार यासह सर्वसामान्यांना गतीमान प्रवासाची सोय होणार आहे. आपले सरकार शेतकरी, सर्वसामान्य माणूस यांना केंद्रबिंदू मानून काम करीत आहे आणि यापुढेही करीत राहू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते शहिद शिपाई रोमित चव्हाण यांच्या आई वैशाली चव्हाण आणि लान्स नायक विनोद माने यांना शौर्याच्या सन्मानार्थ ताम्रपट देवन सन्मानित करण्यात आले. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलिस अधिकारी व अंमलदार यांचा गौरव, शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरावर गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर पालकमंत्री डॉ. खाडे यांनी परेड निरीक्षण केले. यावेळी विविध पथक प्रमुखांनी पालकमंत्री डॉ. खाडे यांना मानवंदना दिली. प्रजासत्ताक दिनाच्या परेड संचलनात सांगली पोलीस दल, आरसीबी पथक, सशस्त्र पोलीस पथक, महिला पोलीस पथक, होमगार्ड, वाहतूक विभाग, महाराष्ट्र सुरक्षा बल, अग्नीशमन दल, पंचक्रोशी विद्यानिकेतन निमणी, आयडीएल स्मार्ट स्कूल मिरज व मार्टिन इंग्लीश स्कूल या शाळेंचे पथक, पोलीस दल बँड पथक, दंगल ‍विरोधी पथक, श्वान पथक, निर्भया पथक वाहन, डायल 112 वाहन, फॉरेन्सीक लॅब वाहन, बॉम्ब शोधक पथक वाहन, जेल कैदी पथक वाहन, ॲम्बुलन्स वाहन, अग्नीशमन वाहन, पत्रकार ‍दिपक चव्हाण यांचा मतदार जागृतीपर ‍चित्ररथ आदिंनी सहभाग घेतला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमानंतर शालेय विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. खाडे हाती तिरंगा घेवून सहभागी झाले. या कार्यक्रमात पोतदार स्कूल सांगली, गुजराती हायस्कूल सांगली, सिटी हायस्कूल सांगली, क.भ. दामाणी हायस्कूल सांगली, सुंदराबाई दडगे हायस्कूल सांगली, आप्पासाहेब बिरनाळे स्कूल सांगली, प्रज्ञा प्रबोधिनी प्रशाला, रा.स. कन्या प्रशाला सांगली, नवकृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम आणि ग. रा. पुरोहित कन्या प्रशाला सांगली च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या समारंभास स्वातंत्र्य सैनिक, अनेक मान्यवर पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन विजयदादा कडणे यांनी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.