विश्वासार्हता संपल्यानेच मौनी आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडून निधी आणल्याचा खोटारडेपणा : पृथ्वीराजबाबा पाटील यांचा आरोप
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : आमदार सुधीर गाडगीळ हे विविध विकास कामांसाठी २ हजार ६०० कोटींचा निधी आणल्याचे खोटे सांगत आहेत. एवढा निधी आणला असता तर सांगलीचे शांघाय झाले असते. यातील १ हजार ८०० कोटींचा निधी आणण्यासाठी खासदार, पालकमंत्री तसेच मी स्वतः प्रयत्न केले आहेत. सांगलीच्या कोणत्याही प्रश्नांबाबत विधानसभेत तोंड न उघडणारे सुधीर गाडगीळ हे मौनी आमदार असून निधीबाबत फुकटचे श्रेय लाटण्याचा खोटारडेपणा ते करीत आहेत. त्यांना आता राजकारणाचा रंग लागला असून त्यांची विश्वासार्हता संपली आहे, असा आरोप काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजबाबा पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. पाटील यांनी यशोधन कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.
पृथ्वीराजबाबा पाटील म्हणाले, आमदार गाडगीळ आमदारकीच्या कार्यकाळात २ हजार ६५० कोटी रुपयांचा निधी आणल्याचे सांगत आहेत. प्रत्यक्षात यातील अठराशे कोटी रुपये महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन पालकमंत्री आ. जयंत पाटील, मी स्वतः, कॉग्रेसचे नेते विशाल पाटील, खासदार संजयकाका पाटील, पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या प्रयत्नातून आला आहे. असे असताना ते इतरांचे श्रेय लाटण्याचे प्रयत्न गाडगीळ करीत आहेत. सोन्याच्या व्यवसायात सचोटीचा, विश्वासार्हतेचा व्यवसाय करणाऱ्या आ. गाडगीळ यांना आता खोटे सांगण्याची वेळ का आली. त्यांना कशाला भीती वाटते. त्यांची राजकीय विश्वासार्हता संपली आहे.
सांगलीमध्ये पाचशे खाटांचे रुग्णालय उभारणीसाठी आणि वसतिगृहासाठी २३३ कोटी रुपये महाविकास आघाडी सरकारने जून २०२२ मध्ये माझ्या प्रयत्नामुळे मंजूर केले आहेत. याला प्रशासकीय मंजुरीही मिळाली आहे. शंभर खाटांच्या रुग्णालयाला केंद्राने मंजुरी दिली आहे. याचे श्रेय द्यायचेच असेल तर खासदारांना दिले पाहिजे. रेल्वे मार्गाचे सध्या दुहेरीकरण आणि इलेक्ट्रीफिकेशन सुरू आहे. त्यामुळे जुने पूल पाडून नवे पूल बांधण्यात येत आहेत. या पुलाचेही ते श्रेय घेत आहेत. जुना बुधगाव रोडवरील पूलही २०१५- १६ मध्ये रेल्वे प्रशासनाने मंजूर केला आहे.
इनामधामणी ते स्फूर्ती चौक रस्त्याला सार्वजनिक मंत्री असताना अशोक चव्हाण यांनी माझ्या पाठपुराव्यामुळे, प्रयत्नामुळे मंजुरी दिली आहे. याचे पत्रही माझ्याकडे आहे.
खोतवाडी पुलाचे माझ्याहस्ते भूमिपूजन झाले आहे. सांगली-पेठ रस्ताही जयंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे मंजूर झाला आहे. असे असताना इतरांनी केलेल्या कामाचे श्रेय गाडगीळ का लाटत आहेत.
गेल्या नऊ वर्षात त्यांनी कधीही सांगलीच्या शेरीनाल्याचा, कायदा आणि सुव्यवस्थेचा, रोजगाराचा, गुंठेवारीचा प्रश्न विधिमंडळात मांडला नाही.
महापालिकेतील वीज घोटाळा. कवलापूरचा विमानतळाचा प्रश्नही त्यांनी कधी उपस्थित केला नाही. सांगलीच्या प्रश्नावर इतर आमदारांनी प्रश्न मांडले आहेत. परंतु गाडगीळ यांनी कधी तोंड उघडले नाही. ते मौनी आमदार आहेत. निवेदन दिल्याशिवाय कामे होत नाहीत परंतु फक्त निवेदन देणे एवढेच त्यांचे काम नाही. आता किती विकास कामांचे प्रस्ताव त्यांनी सादर केले. गुंठेवारीचा प्रश्न सोडविण्यासाठी सभागृहात कायद्यात बदल करण्यासाठी कोणतीही भूमिका मांडली नाही, असा आरोपही पाटील यांनी केला.
जुने मंजूर झालेले निधीचे आकडे सांगून मतदारांची गाडगीळ दिशाभूल करीत आहेत. त्यांनी सादर केलेले विकास निधीचे आकडे हे राजकीय लाभासाठी आहेत. आ. गाडगीळ यांनी सांगलीसाठी त्यांनी सांगितल्याप्रमाणे २ हजार ६०० कोटी रुपये आणले असते, तर सांगलीचा शांघाय झाला असता, असे असेही ते म्हणाले.