प्रतिष्ठा न्यूज

सुधाकर इनामदार यांच्या कविता आत्मशोधाच्या अक्षरवाटा आहेत : प्रा.वैजनाथ महाजन ; सांगलीत ‘माझे दगडाचे हात’ कवितासंग्रहाचे प्रकाशन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सुधाकर इनामदार यांच्या कविता या आत्मशोधाच्या अक्षरवाटा आहेत. ‘असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक प्रा. वैजनाथ महाजन यांनी केले. कवी सुधाकर इनामदार यांच्या ‘माझे दगडाचे हात ‘ या कवितासंग्रहाच्या प्रकाशन कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होते.
प्रा. वैजनाथ महाजन पुढे म्हणाले, ज्या काळात भावकवितांच्या चर्चा होणे बंद झालेले आहे.त्या काळात या भावकवितांचे प्रकाशन होत आहे म्हणून या संगहाचे मोल अधिक आहे.
कवीने काय चिंतन केले केले पाहिजे याचा सुंदर वस्तुपाठ सुधाकर इनामदार यांनी यातील कवितेचा संवादमध्ये केला आहे. कवितेच्या चिंतनाकरिता ज्या संयमाची, ज्या प्रतिक्षेची गरज असते, ती प्रतीक्षा करण्याची, तो संयम बाळगण्याची जिद्द त्यांच्याकडे आहे म्हणून ते श्रेष्ठ कवी आहेत.. कविता सुचणे आणि कविता व्यक्त होणे या दोन स्थिती आहेत त्यामध्ये कवीच्या मनाचा अंतराय असतो. कविता लिहिली आणि सोडून दिली असे होता कामा नये. आत्महत्येला कदाचित अनेक पर्याय असतील पण कवितेला मात्र पर्याय नसतो. कविता ही लिहावीच लागते.. कवीची काव्यसाधना असायला हवी.काव्यसाधना म्हणजे शब्दांचा खेळ नव्हे. कविता तुमच्या रंध्रारंध्रात उतरावी लागते. काव्यामागचे चिंतन ही काय गोष्ट आहे, हे आपण कधी समजूनच घेत नाही. चांगल्या कथा, कविता प्रतीक्षा करत असतात. बा. भ. बोरकरांची एक कविता अठरा वर्षे रेंगाळली होती त्यानंतर कवितेच्या सहा ओळी पूर्ण झाल्या आणि मग ती प्रकाशित झाली.. कवितेचे चिंतन हे असे असते..कविता ही आपल्याला शब्दाच्या आणि अर्थाच्या बाजूने समृद्ध करत असते आणि ही समृद्धी अन्य कोणत्याही माध्यमातून येत नाही. कविता लिहिणे हे सहजसाध्य नसते. काव्यलेखनामागे प्रदीर्घ चिंतन, शब्द सापडणे, शब्दांचा पाठपुरावा करणे, शब्दांच्या मागे धावणे या गोष्टी असतात. शब्दांचे तुकडे असे रस्त्यात सापडत नाहीत.
या कवितासंग्रहातील सौन्दर्यस्थळे ही अव्वल दर्जाची आहेत. अव्वल दर्जाचे वाचण्याकरिता सुद्धा कवितेच्या पायऱ्या कळाव्या लागतात.हे निर्विवाद आहे. कविता ही सर्वप्रिय गोष्ट असते, ती अठरा विश्वे दारिद्र्यातही जन्म घेऊ शकते किंवा सात मजली बंगल्यातही जन्म घेऊ शकते.. त्यात फरक करता येत नाही. कवी हा कलंदरच असला पाहिजे, तो व्यावहारिक मर्यादेत गुंतून न पडणारा असावा.त्याचे विश्व वेगळे असते. हे कलंदरपण जपणे फार अवघड असते. अस्सल काव्य कधीही निरर्थक नसते. जे काव्य निरर्थक असते ते समाज बाजूला फेकून देतो.
मुलांना कविता शिकवायला हव्यात आणि कविता या त्यांना शब्दांचा लळा लावण्यासाठी असाव्यात.
चांगले काव्यसंग्रह हे दुर्मिळ होण्याचा आजचा काळ आहे. कवितेबद्दलची काळाची संकल्पना बदलली असली तरीं कविता आहे त्याच जागी आहे. चांगले कवी आजही चांगल्या कवितेच्या मागे आहेत. सुधाकर इनामदार यांनी काव्यसंग्रह प्रकाशित करून काव्यरसिकाना समृद्ध केले आहे.
सांगली जिल्हा नगर वाचनालय येथे ज्येष्ठ कवी सुधाकर इनामदार यांच्या ‘माझे दगडाचे हात ‘ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच एक लक्ष पुस्तक वाचन उपक्रमाचे शिल्पकार आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंहबापू देशमुख यांच्या शुभहस्ते झाले.यावेळी मंचावर प्रसिद्ध कवी आणि समीक्षक प्रा.डॉ.वि. दा. वासमकर, ज्येष्ठ कवयित्री वासंतीताई मेरू, कवी सुधाकर इमानदार, सौ. इनामदार, हे उपस्थित होते.
या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना अमरसिंहबापू देशमुख म्हणाले, ‘आटपाडी तालुक्याला माडगूळकर बंधू, शंकरराव खरात, ना. स. इनामदार यांच्यासारख्या साहित्यिकांची मोठी परंपरा आहे आणि त्याचा वारसा सुधाकर इनामदार जपत आहे.. ही परंपरा जपण्याचे शिवधनुष्य उचलण्याचे, पेलण्याचे काम पुढच्या पिढीतील साहित्यिकांनी करावे अशी अपेक्षा आहे. ग्रामीण भागात वेगवेगळी साहित्यसंमेलने होत असतात, त्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्याची पद्दत सुरू केली होती, ती पुन्हा सुरू व्हावी, चालू राहावी.’
‘माझे दगडाचे हात ‘ कवितासंग्रहाबाबत कवी सुधाकर इनामदार यांनी मनोगत व्यक्त केले तर प्रसिद्ध कवी -समीक्षक प्रा.डॉ.वि. दा. वासमकर यांनी कवितासंग्रहातील कवितांबाबत विस्तृत भाष्य केले. तिळगंगा साहित्यरंग परिवार,पेठ; शब्दगंधर्व साहित्य परिवार, जत; आम्ही सिद्धलेखिका, सांगली; नागभूमी साहित्य मंच, बत्तीस शिराळा आणि सांगली जिल्हा नगर वाचनालय, सांगली यांनी संयुक्तरित्या या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केले होते. प्रमुख पाहुण्यांचा मेहबूब जमादार, विनायक कुलकर्णी, विक्रम जाधव, सुमेधा दिवाण, विकास जोशी यांच्या हस्ते तर कवी सुधाकर इनामदार यांचा सत्कार प्रा.वैजनाथ महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्यिक प्रा.सुभाष कवडे व प्रा. संतोष काळे यांचा संयोजक संस्थांच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी जाधव यांनी केले. आनंदहरी यांनी प्रास्ताविक केले तर कवी विनायक कुलकर्णी यांनी आभार मानले.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे, प्रा.सुनील दबडे, रघुराज मेटकरी दयासागर बन्ने, प्रा.संतोष काळे, कवी शिवाजी बंडगर, दिनेश देशमुख, रुपेश देशमुख, नामदास सर, प्रा.श्रीकृष्ण पडळकर, निलेश दबडे, सौ.श्रुती इनामदार , युवान माडगुळकर, विकास जोशी, जयवंत आवटे, विक्रम ठाणेदार (कोल्हापूर ), संजय पाटील, विश्वनाथ गायकवाड, एकनाथ गायकवाड, अशोक पवार, चंद्रकांत वेल्लाळ, आनंदराव जाधव, एम. बी. जमादार, पुजा माडगुळकर, निर्मला लोंढे, प्रतिभा जगदाळे, अर्चना मुळ्ये, अस्मिता इनामदार,सुमेधा दिवाण, अभिजित पाटील, शाहीर पाटील, मुबारक उमराणी, सुहास पंडित, गौतम कांबळे, रावसाहेब यादव, अरुण बनपुरीकर, मेहबूब जमादार, विक्रम जाधव, दिलीप गिरीगोसावी आदी अनेक मान्यवर साहित्यिक, साहित्यरसिक बहुसंख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.