प्रतिष्ठा न्यूज
आपला जिल्हा

दोस्त दोस्त ना रहा; सापशिडीच्या राजकीय खेळात विश्वजीत कदमांनी सोडली विशाल पाटीलांची साथ; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात होणार सहभागी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि.२५ : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे सांगलीचे तिकीट विशालदादा पाटील यांना मिळावे यासाठी आमदार विश्वजीत कदम यांनी दिल्लीपर्यंत धडक मारली आणि आपण सच्चे मित्र असल्याचे दाखवले. परंतु आज झालेला काँग्रेसच्या मेळाव्यात वरिष्ठांचा आदेश मान्य करत महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात सहभागी होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे सापशिडीच्या राजकीय खेळात विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांच्या मैत्रीमध्ये दोस्त दोस्त ना रहा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये सांगलीत काँग्रेसमध्ये विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्याने पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच महाविकास आघाडीत ही जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते संतापले आहेत. विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील अनेक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मन वळवत त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे काम करावे यासाठी काँग्रेसने आज सांगलीत मेळावा आयोजित केला होता.

यावेळी आमदार विश्वजीत कदम यांनी, पक्षाची अडचण होत असेल तर कार्यकर्त्यांनी समजून घ्यायला हवे, असे सूचक विधान केले. तसेच पक्ष जो आदेश देईल त्या उमेदवाराला निवडून आणू असे सांगत त्यांनी चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे काही दिवसांपूर्वी समाज माध्यमातून झळकलेला विश्व -विशाल हा फलक पुसला गेला आहे.

सांगली लोकसभेसाठी काँग्रेसकडून विशाल पाटील यांच्यासाठी प्रयत्नांची शर्थ करूनही निराशा हाती आलेल्या आमदार विश्वजित कदम यांनी आज काँग्रेस मेळाव्यातून आपली भूमिका स्पष्ट केली. विश्वजित कदम म्हणाले की, सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहील असे आम्हाला सांगितले होते. आम्ही लोकांना सांगत गेलो की यंदा काँग्रेसचाच खासदार असेल.

जागावाटपाची चर्चा सुरू झाल्यानंतर सांगली आणि कोल्हापूरचा संबंध कुठे आला? शाहू महाराज ज्या पक्षाकडून लढतील त्यावर ते लढतील असे ठरले होते. मग सांगलीवर कसा काय हक्क सांगितला ? उद्धव ठाकरे सांगलीत आले आणि चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. असं लोकशाहीत होतं का? जागा देऊन चूक केलीच, कोण काय करत होते, याकडे का लक्ष दिलं नाही ? अशी थेट विचारणाच विश्वजित कदम यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना यावेळी केली.

विश्वजीत कदम म्हणाले की, मी विशाल पाटील यांना समजावून सांगितले पण त्यांनी त्यांचा निर्णय घेतला आहे. मी काँग्रेस उमेदवारासाठी प्रयत्न करत होतो. पण आता मला महाविकास आघाडीचा धर्म पाळावा लागणार आहे. तसेच खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेलाही विश्वजीत कदम यांनी यावेळी उत्तर दिले, व यावेळी झालेली चूक विधानसभेला होऊ देणार नाही. या निवडणुकीत शिवसेनेला जेवढी मते मिळतील ती सर्व काँग्रेसची असतील आणि त्यामुळे पुन्हा विधानसभेला त्यांनी आवाज करू नये. गेल्या तीन-चार महिन्यांच्या सापशिडीच्या खेळात आम्हाला साप चावला पण अंतिम विजय आमचाच होईल.

यावेळी काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते बाळासाहेब थोरात, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आदेश देत ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचे काम करण्याचे आदेश दिले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.