प्रतिष्ठा न्यूज

अंनिसचे राज्यस्तरीय आधारस्तंभ पुरस्कार सांगली जिल्ह्यातील सहा कार्यकर्त्यांना जाहीर – डॉ. निटवे, डॉ. माने, खोत, साळुंखे, भिंगे, बामणे यांचा समावेश

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय आधारस्तंभ पुरस्कार सांगली जिल्ह्यातील अंनिसच्या सहा क्रियाशील कार्यकर्त्यांना जाहीर करण्यात आले आहेत अशी माहिती अंनिसच्या मुक्ता दाभोलकर आणि राहुल थोरात यांनी दिली. यामध्ये अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. संजय निटवे, इस्लामपूर कार्याध्यक्ष डॉ. एस. के. माने, क्रियाशील कार्यकर्ते शशिकांत बामणे, तासगाव कार्याध्यक्ष अमर खोत, अंनिस सोशल मीडिया चे राज्य कार्यवाह वाघेश साळुंखे विटा, तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील भिंगे आटपाडी, यांचा समावेश आहे. अंनिसचे हे कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा विचार घेऊन समाजामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य चिकाटीने करत आहेत. त्यांच्या क्रियाशीलतेमुळे सांगली जिल्ह्यामध्ये संघटनेचे काम वाढत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र या मासिकाच्या वाढीसाठी हे कार्यकर्ते सतत प्रयत्नशील असतात.

या पुरस्काराचे वितरण वडघर जिल्हा रायगड येथे रविवार दि. 15 सप्टेंबर रोजी सुप्रसिद्ध कवियत्री नीरजा यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बालसाहित्य राजीव तांबे, भाऊ सावंत, मुक्ता दाभोलकर, राजीव देशपांडे, राहुल थोरात उपस्थित असणार आहेत.

या पुरस्काराच्या निमित्ताने रायगड येथे ‘राज्यस्तरीय निवासी लेखन कौशल्य कार्यशाळा’ ही आयोजित केली आहे. या कार्यशाळेमध्ये साप्ताहिक साधनाचे संपादक विनोद शिरसाठ, बाल साहित्यिक राजीव तांबे, डॉ. हमीद दाभोलकर पत्रकार आलोक देशपांडे हे कार्यकर्त्यांना लेखन कौशल्याबद्दल सखोल मार्गदर्शन करणार आहेत.

पुरस्कार प्राप्त कार्यकर्त्यांचे अभिनंदन सांगली जिल्हा अंनिसचे अध्यक्ष व्ही.वाय.आबा पाटील, राज्य कार्यकारी समिती सदस्य फारुख गवंडी, सुजाता म्हेत्रे यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.