प्रतिष्ठा न्यूज

विराट गर्दीत मोरयाच्या गजरात तासगावच्या श्रींचा रथोत्सव उत्साहात संपन्न.. आजी-माजी खासदारांची उपस्थिती

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ मंगलमूर्ती मोरयाऽऽऽ च्या जयघोषात आणि विराट गर्दीने आज तासगावच्या श्रींचा 245 वा रथोत्सव मोठया उत्साहात पार पडला.
येथील श्री.गणपती पंचायतनच्या प्रसिद्ध उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाच्या मंदिरातील ‘श्रीं’चा भाद्रपद उत्सव 4 सप्टेंबरपासून सुरू झाला असून आज भाद्रपद शुद्ध 5 ऋषीपंचमी शके 1946 रोजी 245 वा रथोत्सव झाला.या रथोत्सवा निमित्त मंदिराच्या गोपुरावर रंगीबेरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यावेळी रथोत्सवासाठी रथाची रंगरंगोटी, तसेच केळीचे खुंट, नारळाचे तोरण बांधून रथ सजवण्यात आला होता. तासगावचा श्री सिद्धिविनायकाचा रथोत्सव महाराष्ट्रातील नव्हे, तर देशभरातील गणेश भक्तांचे श्रद्धास्थान आहे. दुपारी 1 वाजता श्रीं’च्या तांब्याच्या उत्सव मूर्तीसह श्री गणपती पंचायतनचे विश्वस्त पटवर्धन कुटुंबीय व विविध समाजाच्या मानाच्या मानकर्यांच्या उपस्थितीत श्रींची उत्सव मूर्ती रथामध्ये विराजमान झाली. 1 वाजून 25 मिनिटांनी राष्ट्रगीत आणि गणपतीची आरती झाल्यानंतर मोरयाच्या गजरात रथोत्सवास सुरुवात झाली. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील पावसाने हजेरी लावली, यावेळी भर पावसात दोरखंडाच्या सहाय्याने हजारो श्रीं भक्तांनी रथ ओढला. खोबरे आणि पेढ्याच्या उधळणीत गणपती मंदिर ते काशीविश्वेश्वर मंदिर पर्यंत रथ नेण्यात आला. तिथे आरती झाल्यानंतर पुन्हा रथ गणपती मंदिर पर्यंत आणण्यात आला. यावेळी श्रीं भक्तांनी भक्तिमय वातावरणात हा रथोत्सव आनंदाने पार पाडला याबद्दल पटवर्धन कुटुंबियानी भक्तांचे आभार मानले. रथोत्सव व्यवस्थित पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी मंत्री शंभूराजे देसाई, माजी खासदार संजयकाका पाटील, कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष खासदार विशाल पाटील, युवा नेते रोहित पाटील, युवानेते प्रभाकर पाटील यांनी उपस्थित राहून भाविकांना शुभेच्छा दिल्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.