प्रतिष्ठा न्यूज

सांगली लोकसभेची जागा ठाकरेंकडेच; विश्वजीत कदमांसह कॉंग्रेस नेत्यांच्या प्रयत्नांना अपयश : आमचं काय चुकलं? कार्यकर्ते संतप्त ; विशालदादा पाटील आता जनतेच्या कोर्टात जाणार?

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये दावे प्रतिदावे सुरू होते. काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे पूर्ण ताकद लावूनही त्यांना जागा मिळवता आली नाही. आज महा विकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे उमेदवार चंद्राहार पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. काँग्रेस उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या सोशल मिडिया टीमकडून आमचं काय चुकलं? आता लढाई थेट जनतेच्या कोर्टात या पोस्ट प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. याचा अर्थ विशालदादा पाटील हे अपक्ष निवडणूक लढविणार असाच काढला जात आहे. परंतु प्रत्यक्षात आता कोणती भूमिका घेतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला मंगळवारी (दि.९) जाहीर करण्यात आला. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा संपुष्टात आल्याचे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचे नेते एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे जाहीर केले.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला २१, काँग्रेसला १७ आणि शरद पवारांची राष्ट्रवादी १० जागा लढणार आहे. सांगलीची जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडे राहणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले. यामुळे सांगलीची जागा कॉंग्रेसने गमावल्याचे स्पष्ट झाले आहे. तर उत्तर मुंबईची जागा काँग्रेसला मिळाली आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ ठाकरे गटाकडे गेला आहे. त्यामुळे येथून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील आता कोणती भूमिका घेणार हे महत्त्वाचे आहे. सांगलीची जागा काँग्रेसकडेच कायम राहण्यासाठी माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम यांनी ताकद पणाला लावली होती. मुंबई, नागपूर, दिल्लीपर्यंत जाऊन त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना साकडे घातले. अगदी त्यांनी टोकाची भूमिका घेण्याचा इशारा दिला. परंतु त्यांच्या प्रयत्नांना अपयश आले.

सांगली लोकसभेच्या जागेवरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातला वाद विकोपाला गेला होता. दरम्यान, सांगली लोकसभा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेकडेच राहणार असल्याचे आज महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. शिवसेनेने हा मतदारसंघ काँग्रेसला सोडलेला नाही. यामुळे विशालदादा पाटील यांना अपक्ष निवडणूक लढण्याशिवाय पर्याय नाही.

ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांची सांगलीतील उमेदवारी मागे घ्यावी, असा आग्रह काँग्रेसकडून धरण्यात आला. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले. पण ठाकरे सांगलीच्या जागेवर ठाम राहिले. यामुळे काँग्रेसला ही जागा सोडावी लागली.
ठाकरे गटाने आपला उमेदवार निवडणूक मैदानात ठेवला, तरी आम्हाला मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी द्या, असा हट्ट विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी पक्षश्रेष्ठींकडे धरला होता.
सांगलीच्या जागेवरून आक्रमक भूमिका घेतल्यास त्याचा परिणाम राज्यभर भोगावे लागतील असा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिला होता. त्यामुळे राज्यातच नव्हे देशपातळीवरही फटका बसू शकतो, अशी भीती काँग्रेस श्रेष्ठींना वाटली. मित्रपक्षांना सोबत घेऊन जाण्यात काँग्रेस कमी पडतेय, हे चित्र निर्माण होणे हे काँग्रेससाठी फायद्याचे नाही. त्यामुळेच मैत्रीपूर्ण लढतीसाठीही काँग्रेस श्रेष्ठींनी परवानगी दिली नाही.
आता विशाल दादा पाटील यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून आमचं काय चुकलं असा सवाल विसरण्यात येत आहे तसेच आता लढाई जनतेच्या कोर्टात अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल करण्यात येत आहेत त्यामुळे विशाल दादा पाटील अपक्ष लढणार हे जवळजवळ नक्की झाले आहे अशी चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.