प्रतिष्ठा न्यूज
राजकीय

व्यापारी समाजाला कधीही अंतर पडू देणार नाही : विशालदादा पाटील : सांगली व्यापारी उद्योजक संवाद मेळावा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : वसंतदादांनी सर्वांना एकत्र करून सांगलीचा विकास केला. त्याच वाटेवर चालण्याचा माझा प्रयत्न आहे. व्यापाऱ्यांनी वसंतदादांना नेहमीच साथ दिली आहे. व्यापाऱ्यांच्या विकासासाठी काम करण्याची माझी तयारी आहे. त्यांना कधी ही अंतर पडू देणार नाही, अशी ग्वाही अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांनी दिली.
सांगलीतील राजमती भवन येथे व्यापारी उद्योजक संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पाटील बोलत होते. मेळाव्याला माजी केंद्रीय मंत्री प्रतीक दादा पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, व्यापारी एकता असोसिएशनचे समीर शहा, आशिष शहा, मराठा उद्योजक फोंडेशन चंद्रकांत पाटील, दिपेन देसाई, शरद शहा, चेंबरचे अध्यक्ष अमर देसाई, भारत बोत्रा, अरुण शहा, शरद शहा, माजी महापौर प्रशांत मजलेकर आदी उपस्थित होते.
विशाल दादा पाटील म्हणाले की, सांगली हे व्यापारी शहर आहे. व्यापारी उद्योजकांना सोबत घेऊन वसंतदादांचा वारसा पुढे चालवणार आहोत. निवडणूक लढवत असताना अनेकांचे फोन आले. सांगलीच्या अस्मितेसाठी लढण्याचा सल्ला दिला. तुमच्या साऱ्यांच्या पाठबळामुळे निवडणुकीत लढण्याचे धाडस केले आहे. व्यापाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. व्यापाऱ्यांसाठी तक्रार निवारण केंद्र असावे. जिथे व्यापारी आपल्या समस्या अडीअडचणी मांडू शकतील. व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही अशी व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी अधिकारी कर्मचारी व्यापाऱ्यांची लूट करतात. तुम्हीही भ्रष्टाचाराला खतपाणी घालू नका. व्यापाऱ्यांच्या प्रत्येक अडचणी बाबत चर्चा होणे गरजेचे आहे. सांगली मोठी करायची असेल तर व्यापाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. शहरातील व्यापार वाढला पाहिजे यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. व्यापाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल तर मी तुमच्यासोबत उभा राहील. माझी आयडॉलॉजी तुमच्यावर लादणार नाही. तुमच्या हक्काचे प्रश्न दिल्लीत मांडण्यासाठी मी कटीबद्ध आहे, अशी ग्वाही दिली.
प्रतिक दादा पाटील म्हणाले की, काँग्रेसच्या सत्ता काळात व्यापारी उद्योगांचे धोरणे निश्चित केली जात होती पण आता भाजप काळात कोणत्याच घटकाला विश्वासात घेतले जात नाही. समाजातील अनेक घटक आता आंदोलने करत आहे पण त्याची दखल घेतली जाते. केंद्र सरकारच्या अनेक योजना शहराच्या विकासासाठी उपयोगी आहे. पण त्या सांगलीत आणल्या जात नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल.
यावेळी व्यापार एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा म्हणाले की, सांगलीच्या विकासाचे मोठे आव्हान विशाल दादांच्या समोर असेल. राजकीय इच्छाशक्ती अभावी बाजार पेठ विकासापासून वंचित राहिले आहे. शहरालगत 25 एकर जागेत होलसेल मार्केट उभारण्यासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत. पण अद्याप त्याला यश आलेले नाही. वसंतदादा, मदनभाऊचा व्यापाऱ्यांना मोठा आधार होता. आता त्यांच्यानंतर तुम्ही व्यापाऱ्यांचे पालकत्व घ्यावे. आमच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य द्या, व्यापाऱ्यांसाठी तक्रार निवारण केंद्र उभा करा. अशी अपेक्षा व्यक्त केली. मराठा उद्योजक फाउंडेशनचे चंद्रकांत पाटील यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या मांडल्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.