लढाऊ स्त्री नायिकांना साहित्यात अजरामर करणारे स्त्रीवादी लेखक अण्णा भाऊ साठे

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जीवन म्हणजे संघर्षमय जगण्याची एक जिवंत कहाणीच आहे. त्यांनी आपल्या जीवनात जे पाहिले, अनुभवले ते आपल्या साहित्यातून मांडले. अण्णा भाऊंनी आपल्या साहित्यात पुरुषांइतकेच किंबहुना त्याहून जास्त स्त्रियांना स्थान दिले आहे. अण्णाभाऊंच्या समकालात स्त्रियांना पुरुषी वर्चस्वाखाली दाबून ठेवले जात होते. त्या वंचित, उपेक्षित स्त्रीचे विविध प्रकारचे दुःख अण्णा भाऊंनी आपल्या साहित्यातून निर्भीडपणे मांडले आहे. स्त्री एक माणूस आहे. तिलाही मन, भावना, आकांक्षा आहेत. त्या व्यक्त करण्याचा तिला अधिकार आहे असे स्पष्ट मत अण्णा भाऊंनी आपल्या साहित्यात रेखाटले आहे. आपल्या अनेक कथा, कादंबऱ्यातून स्त्रियांना लढाऊ वृत्तीचे माणूस म्हणून उभं करण्याचं काम अण्णा भाऊंनी केलेलं दिसतं. अण्णाभाऊंच्या अनेक कथा, कादंबऱ्या नायिका प्रधान आहेत. वैजयंता, चिखलातील कमळ, चित्रा, रत्ना, टिळा लाविते मी रक्ताचा, आवडी, चंदन, फुलपाखरू या कादंबऱ्या स्त्रीप्रधान आहेत. अण्णाभाऊंच्या साहित्यातील नायिका नेहमी आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करताना दिसतात. त्यांची जीवनशैली लढाऊ असल्याची जाणवते. संघर्षमय जीवनाचा त्या भाग बनून जातात. आपल्या लेखणीतून अण्णा भाऊंनी स्त्रियांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. त्यांच्या साहित्यातील स्त्री नायिका अन्यायविरुद्ध पेटून उठते. तिच्यासमोर आलेल्या परिस्थितीला आत्मविश्वासाने तोंड देते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अण्णा भाऊंच्या साहित्यातील स्त्रिया फक्त दलित समाजातील नाहीत तर इतर उच्च समाजातील अनेक स्त्रियांची वर्णने त्यांच्या साहित्यात आलेली आहेत. अण्णा भाऊंच्या साहित्यातील स्त्री ही कणखर, लढाऊ वृत्तीची, स्वतःचे रक्षण स्वतः करणारी, स्वावलंबी आणि स्वाभिमानी आहे.
‘चित्रा’ या कादंबरीत स्त्रियांचे अतिशय हलाखीचे जीवन रेखाटले आहे. या कादंबरीतील चित्रा ही नायिका विधवा स्त्री असून तिचा मामा जेव्हा तिला कुंटण खाण्यात विकतो, तेव्हा ती स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी कशी धडपडते याचे विदारक चित्रण अण्णा भाऊंनी रेखाटले आहे. दारिद्र्यामध्ये जन्मलेल्या मुलीची अवस्था, तिला येणाऱ्या समस्या, त्यातून वाचण्यासाठी तिची धडपड, स्वतःच कराव लागणार रक्षण किती भयावह असतं याचं चित्रण अण्णा भाऊंनी हुबे हुब रेखाटले आहे.
‘वैजयंता” या कादंबरीमध्ये तमाशातील कलाकारांचे जीवन चित्रित केले आहे. वैजयंता नावाची देखणी सुंदर मुलगी तिची आई तमाशातील कलाकार असते, पण ती स्वतःच्या मुलीला तमाशापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते. पण वैजंताच्या हट्टा पायीमुळे ती तिला तमाशात नाचण्याची परवानगी देते. त्यानंतर वैजयंतीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते अनेक वासनांद नजरांची तिला शिकार व्हावे लागते. तमाशात काम करत असताना पुरुषप्रधान संस्कृतीची ती कशी बळी ठरते याचे वर्णन आपणाला या कादंबरीमध्ये दिसून येते. पुरुषांची स्त्रियाकडे बघण्याची वासनांद नजर, तमाशातील कलाकारांचे होणारे हाल. स्त्रीचा त्या काळातील संघर्षमय प्रवास या कादंबरीमध्ये रेखाटलेला दिसून येतो.
‘वारणेच्या खोऱ्यात’ या कादंबरीची नायिका मंगल अतिशय सुंदर, मृदू, कोमल आहे. तिचा भाऊ तिचे लग्न एका देशद्रोही मुलाबरोबर ठरवतो. पण ती त्या लग्नात धाडसाने नाकार देते आणि देशासाठी बलिदान करणाऱ्या हिंदुराव नावाच्या देशावर प्रेम करणाऱ्या एका व्यक्तीशी लग्न करते. पुढं ते दोघेही क्रांती चळवळीमध्ये सहभागी होतात. यात त्यांना वीरमरण प्राप्त होते. अतिशय मन हेलावणाऱ्या पण त्यागाला सामोरे जाणाऱ्या स्त्रीचे वर्णन अण्णा भाऊंनी येथे केले आहे.
‘आवडी’ या कादंबरीतील आवडी ही धनवान पाटलाची लाडकी, सुंदर शिकलेली मुलगी आहे. तिची लग्नात फसवणूक होते. दुःखाचा डोंगर तिच्यापुढे आ वासून उभा राहतो. तरीही ती आपण जगलो पाहिजे हा निर्धार करते. या काळात तिचं धनाजी रामोशी या व्यक्तीवरती प्रेम जडते. या प्रेमासाठी ती सर्व प्रथा परंपरा झुगारून देते आणि धनाजी बरोबर लग्न करते आणि प्रेमाने संसार थाटते. तिचा हा प्रेरणादायी संघर्ष अतिशय हुबेहूब अण्णा भाऊंनी आपल्या कादंबरीमध्ये चित्रीत केला आहे.
‘चंदन’ या कादंबरीतून अण्णा भाऊंनी विधवा स्त्रीच्या जीवनावर प्रकाश टाकला आहे. तिच्यावर होणारे अत्याचार, तिला उपभोगण्यासाठी टपलेल्या दुष्ट प्रवृत्तीच्या नजरा, वासनांद पुरुषांची प्रवृत्ती या सर्वांना भीक न घालता चंदन आपल्या चांगल्या कृती व्यवहाराने आपले जीवन कसे बदलून टाकते तिचा हा संघर्ष या कांदबरी मधून दिसून येतो.
अण्णा भाऊंच्या सर्व कादंबऱ्या आपणाला विविध प्रकारची जीवनमूल्य, संघर्षमय पद्धतीने सांगून जातात. पुरुषप्रधान संस्कृतीच्या विरुद्ध तीव्र पद्धतीने लढणाऱ्या अनेक स्त्री नायिका अण्णा भाऊंच्या साहित्यात अजरामर झाल्या आहेत. स्त्रियांना दुजाभावाची वागणूक न देता समतेने वागवले पाहिजे ही अण्णा भाऊंची भूमिका त्यांच्या साहित्यात नेहमी अधोरेखित होते. अण्णा भाऊंचे साहित्य नेहमी दलित, आदिवासी, उपेक्षित, शोषित जनतेसोबत उभे राहिलेले दिसून येते. अण्णा भाऊंच्या साहित्यामध्ये येणारे स्त्री वर्णन हे नेहमी लढाऊ पद्धतीने आले आहे. मूठ वळून अन्यायाविरुद्ध संघर्ष करणारी स्त्री अण्णा भाऊंच्या साहित्याचा बाज आहे. त्यामुळे लढाऊ स्त्री नायिकांना साहित्यात अजरामर करणारे स्त्रीवादी लेखक म्हणून अण्णा भाऊ साठे यांच्याकडे मराठी साहित्य विश्वात जगभर पाहिले जाते.
— प्रा. डॉ. शोभा चाळके-म्हमाने
कोल्हापूर
7447476667
(लेखिका श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर या ठिकाणी इंग्रजी विषयाच्या सहाय्यक प्राध्यापिका म्हणून काम करतात.)