प्रतिष्ठा न्यूज
आपला जिल्हा

मुस्लिम समाजासह सर्व ओबीसी ‘मविआ’सोबत : शब्बीर अन्सारी यांची पत्रकार परिषद; चंद्रहार पाटील हेच विजयी होणार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली ता. २८ : मुस्लिम आणि ओबीसी समाजात सध्या भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठीच इंडिया आघाडीसोबत आम्ही जाण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीसोबत आम्ही बिनशर्त राहणार आहोत. त्यामुळे मुस्लिम समाजासह सर्व ओबीसी ‘मविआ’सोबत असतील, असा विश्‍वास ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी पत्रकार बैठकीत व्यक्त केला. महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी सांगली, मिरजेत बैठकांचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
शिवसेनेचे उपनेते, संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील, जिल्हा प्रमुख संजय विभूते यांच्याकडे त्यांनी पत्र दिले. अन्सारी म्हणाले,‘‘आमची ऑर्गनायझेशन देशपातळीवर कार्यरत आहे. १९९९ मध्ये काँग्रेससोबत आम्ही आघाडी केली होती. त्यात मिरजेतील आमदार निवडून आले होते. त्यानंतर गेल्या पाच वर्षात देशात, राज्यात बरबादी राजकारण सुरू आहे. याविरोधातच आम्ही एल्गार मेळावे घेतले. संविधान संपवण्याचा निर्धार या सत्ताधाऱ्यांनी केला आहे. ज्याप्राणे ३७० कलम हटवले, त्याप्रमाणे ओबीसींसाठी असलेले ३४० कलम हटवले जाईल का, अशी भिती निर्माण झाली आहे. या द्वेषाविरोधात आम्हीही इंडिया आघाडीसोबत सहभागी आहोत. म्हणून येणाऱ्या निवडणूकीत सत्ताधाऱ्यांनी हद्दपार केले जाईल. राज्यात उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मुस्लिम समाजासह ओबीसी समाजाला मान्य आहे. त्यांच्यातील खमकेपणामुळेच अडीच वर्षात राज्यात चांगले काम झाले. म्हणून आम्ही त्यांना बिनशर्त पाठिंबा देत आहोत. सांगलीत चंद्रहार पाटील यांच्यामागे मुस्लिम समाज राहिल. मुस्लिम समाज हा कोणत्याही पुढाऱ्यांच्या मुठीत नाही.’’ संजय विभूते म्हणाले,‘‘मुस्लिम समाजाचा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे. त्या मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी अपक्षाकडून प्रयत्न होत आहे. मविआचे सर्व नेते प्रचारात अग्रेसर आहे. असे असताना राज्याचे नेते विश्‍वजीत कदम यांचे नाव घेवून मते मागत आहेत. त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र मतदारांनी आता मविआला साथ देण्याचे ठरवले आहे.’’ यावेळी पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. महेबुब बागवान, रियाज शिकलगार, मुजफ्फर सनदी, जावेद मोमीन, शाहनवाज सौदागर, गुफरान अन्सारी, इस्माईल मुजावर, आरिफ गवंडी उपस्थित होते. आंबेडकर भाजपची बी टीम शब्बीर अन्सारी म्हणाले,‘‘वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीसोबत यावेत, अशी इच्छा होती. मात्र ते कोणत्याही चर्चेला येत नव्हते. जागा वाटपातही ते सहभागी झाले नाहीत. त्यामुळे भाजपची बी टीम असल्याचा आरोप खरा असावा, असे वाटते.’’

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.