प्रतिष्ठा न्यूज
आपला जिल्हा

कंधार तालुक्यातील नागबर्डी यात्रा उत्साहात: देवस्थानला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची मागणी

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड : कंधार तालुक्यातील गुंडा येथील माळटेकडीवरील ग्रामीण भागातील नागबर्डी यात्रा नागपंचमीच्या दिवशी मोठ्या उत्साहाने भरली होती. या यात्रेत परिसरातील भाविक भक्त येथे दर्शनासाठी येत असतात. यात्रेस शेकडो वर्षाची परंपरा आहे. या यात्रेमुळे निसर्गाचे संगोपन व संवर्धन सुद्धा केले जाते तसेच सांस्कृतिक,धार्मिक परंपरा पिढ्यानपिढ्या जोपासली जात आहे.

मोजे गुंडा नागबर्डी येथे नागपंचमीच्या दिवशी नागदेव यात्रा निसर्गाचे संवर्धन आणि संगोपनाची परंपरा चालवत आहे. पिढ्यानपिढ्यापासून ही परंपरा प्रसिद्ध आहे. या यात्रेला हजारो भाविक येऊन नागोबाचे दर्शन घेतात. नवसाला पावणारा नागोबा अशी याची आख्यायिका आहे. ही यात्रा 700 ते 800 वर्षापासून भरत असते असे जेष्ठ भाविक भक्त सांगत असतात.
या यात्रेबाबत अधिक माहिती जाणून घेतले असता अशी कथा सांगितली जाते की, बंगाल देशातून बहीण-भाऊ उदरनिर्वाह करण्यासाठी दिंडा, गुंडा, बीडा परिसरात फिरत ते नागबर्डी माळरानावर येऊन एका मालकाची जनावरे चारत होते. येथे नागोबाच्या वारुळाच्या माळाला भावाने चार ते पाच खडे मारताच नागराज जागृत होऊन त्या भावाला दंश केला. मात्र त्या ठिकाणी असलेल्या लिंबाच्या पालाचा रस भावाला पाजल्यानंतर तो जिवंत झाला, अशी कथा सांगितली जाते. नागराजाची मूर्ती ही तेव्हापासून आहे. या माळरानाचे महत्त्व परिसरातील गावकऱ्यांना पटल्यामुळे एकही कडूनिंबाचे झाड तोडले जात नाही. तेथील वृक्ष कुजले,जिर्ण झाले तरी शेतकऱ्यांकडून झाडे तोडली जात नाहीत.

देवस्थानला पर्यटनस्थळाचा दर्जा द्यावा अशी मागणी भाविक भक्त करीत आहेत.

हे देवस्थान म्हणजे एक निसर्गरम्य ठिकाण आहे. याला पर्यटनस्थळाचा दर्जा द्यावा. लोकप्रतिनिधीनी या तिर्थक्षेत्राकडे लक्ष द्यावे, अशी मागणी सरपंच आनंदराव शिंदे यानी केली आहे.

या ठिकाणी चारशे फूट उंच असलेल्या माळावर नागोबाचे वारूळ आहे. येथील झाडाला व पानाला नासधूस करता येत नाही.

दरवर्षी नागपंचमीला येथे मोठी यात्रा भरते.

शेकडो वर्षांपासून या नागराजाच्या मंदिराला व परिसराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक पिढ्यांना आध्यात्मिक कार्यासोबतच येथील निसर्गाचे संवर्धन आणि संगोपनाची चालत असलेली परंपरांची जाणीव करून देण्यासाठी आहे. नागराजाचे भाविकांना महत्त्व चांगलेच ठाऊक आहे. हे जागृत देवस्थान आहे. अशी माहिती गुरुवर्य सदानंद गिरी महाराज, नागबर्डी यांनी दिली.
दरम्यान या तिर्थक्षेत्रास पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी होत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.