प्रतिष्ठा न्यूज
आपला जिल्हा

यूएसके ऍग्रोचे संचालक, उद्योजक संभाजी चव्हाण यांचे भीषण कार अपघातामध्ये निधन

प्रतिष्ठा न्यूज / अनिल शिंदे
सावळज दि. 28 : तासगाव : तालुक्यातील सिद्धेवाडी गावचे सुपुत्र तथा युएसके ऍग्रोचे संचालक, प्रसिद्ध उद्योजक संभाजी चव्हाण यांचे आज दुपारी भीषण अपघातात निधन झाले. जत वरून सिद्धेवाडी या आपल्या मूळगावी यात्रेसाठी येत असताना कुंभारवाडी जवळ त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

संभाजी चव्हाण हे आज सकाळी आपल्या कामानिमित्त जत भागात गेले होते. तेथील काम आटोपल्यानंतर ते आपल्या सिद्धेवाडी या गावाकडे येत होते. सिद्धेवाडी येथील आज यात्रा असल्याने ते यात्रेसाठी आपल्या स्विफ्ट या गाडीतून गावाकडे येत होते. कुंभारवाडी जवळ आल्यानंतर त्यांच्या गाडीचा ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या गाडीला त्यांची धडक बसली.
अपघातात स्विफ्ट या गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. त्यातच चव्हाण यांनी गाडीचा सीट बेल्ट न लावल्याने गाडीच्या एअर बॅग बाहेर आल्या नाहीत. परिणामी गाडीने दोन – तीन पलट्या घेतल्या. या भीषण अपघातात चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला.
चव्हाण हे प्रसिद्ध उद्योजक आहेत. आपले मित्र रमाकांत यांच्यासोबत त्यांनी यु एस के ऍग्रो या फर्मची स्थापना केली. अतिशय दर्जेदार शेती औषधे या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली. अतिशय गरिब परिस्थितीतून चव्हाण यांनी खडतर परिश्रम घेत यशस्वी उद्योजक होण्याची किमया केली होती.
त्यांच्या अपघाती निधनाची बातमी वाऱ्यासारखी जिल्ह्यात पसरली. गावाकडील अनेक लोक अपघातस्थळी दाखल झाले. कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात त्यांचे शिवविच्छेदन करण्यात आले. आज सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.