प्रतिष्ठा न्यूज
आपला जिल्हा

महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त – रमेश पवार यांचा विशेष लेख

महामानव महात्मा बसवेश्वर
(अन्य नावे : बसव, बसवण्णा)

हे कर्नाटकातील संत व समाजसुधारक होते. त्यांनी हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेविरुद्ध व अन्य हानिकारक प्रथांविरुद्ध संघर्ष केला. त्यांनी निर्गुण, निराकार एकेश्वरवादी श्रद्धेचा पुरस्कार केला.
समाजसुधारक बसवण्णा यांचा जन्म म्हैसूर (आजचा कर्नाटक) राज्यातील विजापूर जिल्ह्यातल्या बागेवाडी या तालुक्यात कम्मेकुळ या गावात झाला. त्यांचे वडील मादीराज आणि माता मादलांबिका.

इसवी सनाच्या बाराव्या शतकात अहिंसा, सत्य, भूतदया आणि सर्वधर्मसमानता, यासारखे क्रांतिकारक विचार मांडले. हिंदू धर्मातील चातुर्वर्ण्य पद्धतीला आणि त्यातून जन्मलेल्या जाती पद्धतीला त्यांनी कायम विरोध केला. “कायकवे कैलास” म्हणजे कर्म करण्यातच स्वर्ग आहे हा विचार त्यांनी मांडला. कोणतेही काम कमी प्रतीचे किंवा उच्च प्रतीचे नसते, सर्व मानव समान आहेत. कोणतीही जात श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही असे तत्वज्ञान त्यांनी मांडले. आपल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यानी लिंगायत धर्माची स्थापना केली.

बसवण्णांनी कुडलसंगम येथे वास्तव्य केले. कुडलसंगम हे मलप्रभा व कृष्णा नदीच्या संगमावर बसलेले विजापुर जिल्ह्यातील छोटेसे गाव आहे. बसवण्णांनी समाजातील वाईट चालीरीतींना शह देण्याचा सम्यक विचार केला आणि येथूनच त्यांच्या सामाजिक आंदोलनास सुरुवात झाली. पुढे कामाच्या शोधार्थ बसवण्णा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे आले. मंगळवेढा येथे बसवण्णांनी सामाजिक चळवळ आरंभ केली. ही चळवळ धार्मिक कर्म कांडाविरुद्ध आणि वर्णव्यवस्थेविरुद्ध होती. त्यांच्या परिवर्तनवादी विचारसरणीने बसवण्णा समाजात लोकप्रिय झाले. वैदिक धर्म नाकारून, वेदशास्त्र, होम-हवन, मूर्तिपूजा नाकारून बसवण्णांनी ‘लिंगायत धर्म’ स्थापन केला. आपण सर्व एकच आहोत हे सांगताना बसवण्णा आपल्या वचनात म्हणतात (वचन कन्नड भाषेत) : –
“इवनारव, इवनारव, इवनारवनेंदनिसदिरयया इस नम्मव,
इव नम्मव, नम्मवनेंदनिसयया, कुडलसंगमदेवा, निम्म मनेय मगनैदानिय्या.”

वरील वचन मराठीत :-
हा कोणाचा, हा कोणाचा, हा कोणाचा ऐसे नच म्हणवावे;
हा आमुचा, हा आमुचा, हा आमुचा ऐसेचि वदवावे.
कुडलसंगमदेवा, तुमचा घरचा पुत्र म्हणवावे.

वेद शास्त्र धर्म जे काही सांगतील मी त्यांना मानणार नाही.’ आपल्या वचनात बसवण्णा म्हणतात,
“वेदक्के ओरेय कट्टवे,शास्त्रक्के निगळवनिक्कु वे,
तर्कद बेन्न बारनेत्तुव, आगमद मूग कोयिवे, नोडखा,
महादानी कुडलसंगमदेवा, मादार चेन्नय्यन, मनेय मग नामय्या.”

वचन मराठीत :-
वेदावर खडग प्रहार करेन
शास्त्राला बेड्या लावीन
तर्कशास्त्राच्या पाठीवर आसूड ओढेन
आगमशास्त्राचे नाक कापेन
मातंग चेन्नयाचा प्रिय आहे मी,
कुडलसंगमदेवा.

मंदिर म्हणजे बहुजनाचे अंधश्रद्धा व भोळी मनोवृत्तीचे केंद्र आहे. म्हणून बसवण्णांनी आपल्या अनुयायांना मंदिर न बांधण्याचा आदेश दिला आहे. आपल्या देहालाच देवालय माना. देवालयापेक्षा देहालय श्रेष्ठ आहे. अशी शुद्ध विचारसरणी बसवण्णांची होती.

चातुर्यवर्ण :

वर्ण धर्माला वेडाचार ठरवतांना बसवण्णा म्हणतात,
चांभार उत्तम तो दुर्वास
कश्यप लोहार, कौंडिण्य तो न्हावी
तिन्ही लोकी बरवी प्रसिद्धी ती
जातीचे श्रेष्ठत्व हाची वेडाचार.

भस्म, गंध टिळा लावून काय उपयोग आहे, मणी गळ्यात बांधून काय उपयोग आहे जर तुमच्यात शुद्ध अंतरंग नसेल, मनाची शुद्धता नसेल हे सर्व देखावा आहे. लोक, ज्या गोष्टी आपल्या आचरणात येणे कठीण आहे त्याच गोष्टीच्या बाह्य अवडंबराने स्वतः शुद्ध मनाचे आहोत असा खोटा आव आणतात. जे देवाला दूध, लोणी, तूप अर्पण करतात ते अंधभक्त होत. त्या संदर्भात बसवण्णा म्हणतात,

दुग्ध ते उच्छिट तथा वासराचे।
पाणी ते मत्स्याचे उच्छिष्टची।
पुष्प ते उच्छिट तथा भ्रमराचे।
साधन पूजेचे काय सांगा ?

दूध हे वासराचे उष्ट असते, पाणी माशांचे उष्ट असते, पुष्प भ्रमराचे उष्ट असते असे वापरलेले अस्वच्छ उष्ट साधने देवाच्या पूजेचे साधन होऊ शकते का ? अशाप्रकारे बसवण्णांनी अंधश्रद्धा, कर्मकांड, जातीयता, बळी प्रथा, व्रतवैकल्य, उपास-तापास इत्यादींवर प्रखर हल्ला केला आहे. वीरशैव विचारधारा ही लिंगायतांना धार्मिक, मानसिक आणि सांस्कृतिक गुलाम करण्याचे षड्यंत्र आहे. आज लिंगायत विरुद्ध वीरशैव असा भेद निर्माण झाला आहे. वीरशैव हे सनातन धर्माचे कट्टर पुरस्कर्ते आहेत. वर्णधर्म त्यांना मान्य आहे, ब्राह्मण व्रतवैकल्ये मान्य आहेत. वीरशैव विचारधारेचा प्रमुख ग्रंथ सिंद्धान्त ’शिखामणी’ हा वर्णाश्रम धर्मावर आधारित असल्याचे कारण हा ग्रंथ आगम, निगम, शैवपुराण, वेद शास्त्र इत्यादींच्या मूळ स्रोतांशी बांधलेला आहे.

बसवण्णा एका वचनात म्हणतात : –
दगडाचा देव देव नव्हे।
मातीचा देव देव नव्हे।।
वृक्षदेव देव नव्हे।
सेतु बंध रामेश्वर।।
अन् इतर क्षेत्राचा।
देव देव नव्हे।।
देव तुमच्या अंतर्यामी।
हे कुडलसंगमदेवा।।

संत बसवण्णांनी आयुष्यभर भटशाहीतून मुक्त करण्यासाठी अनुभव मंटपाची स्थापना केली. त्यातून साहित्य निर्माण केले. वेद, पुराण, स्वर्ग, देव देवता, आत्मा, पुनर्जन्म, यज्ञ, वैकल्य ही थोतांडे नाकारली आणि ७७० परगड जातीतील लोकांना सोबत घेऊन लिंगायत धर्माची स्थापना केली.

बसवण्णा हे नाग लोकांचे दैवत आहे हे पटवून सांगताना अक्कामहादेवी आपल्या वचनात म्हणतात:-
देव लोकांचा देव बसवण्णा
मत्स लोकांचा देव बसवण्णा,
नाग लोकांचा देव बसवण्णा।
मेदुगिरि मंदागिरीचा देव बसवण्णा।
चेन्नमल्लिकार्जुना माझा तुमचा।
तव शरणांचा देव बसवण्णा।

– रमेश पवार, नांदेड 

(७५८८४२६५२१)

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.