प्रतिष्ठा न्यूज
राजकीय

सांगली म्हणजे यांना घराण्याची मक्तेदारी वाटते

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि.३०: सांगली विधानसभा मतदारसंघ किंवा सांगली लोकसभा मतदारसंघ किंबहुना संपूर्ण सांगली जिल्हा ही आपल्याच घराण्याची मक्तेदारी आहे असे विशालदादा पाटील आणि त्यांच्या अवतीभवती असलेल्यांना वाटत असावे. त्यामुळेच ते त्यांच्या घराण्यावर अन्याय झाल्याची तक्रार करीत आहेत. म्हणजे अनेक वर्षे जबरदस्तीने त्यांनी सांगली विधानसभा मतदारसंघ तसेच लोकसभा मतदारसंघात सत्ता भोगून सांगली जिल्ह्यातील लोकांवरच अन्याय केला आहे. या घराण्यातील निष्क्रिय लोकप्रतिनिधींमुळेच सांगली जिल्हा भकास झाला आहे.
सांगली विधानसभा मतदारसंघ किंवा सांगली लोकसभा मतदारसंघ या दोन्हीही ठिकाणी या घराण्याला
सर्वसामान्य जनतेतून आलेला उमेदवार उभा राहिलेला चालत नाही असा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे या मंडळींनी आजपर्यंत घराण्याची मक्तेदारी निर्माण करीत सांगलीकर जनतेवरच अन्याय केला आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघात वसंतदादा घराण्याला उमेदवारी मिळाली नाही अशी तक्रार काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील करीत आहेत.परंतु त्यांच्या घरात किंवा त्यांच्या घराण्यात आजपर्यंत लोकसभेचे बारा वेळा खासदार झालेले आहेत. तब्बल ३४,३५ वर्षे त्यांच्याच घराण्यातले खासदार झालेले आहेत.
विशालदादा पाटील यांच्या घराण्यात आजपर्यंत असंख्य सत्तापदे मिळालेली आहेत. महाराष्ट्रातील आणि देशातील कोणतेही प्रमुख सत्तापद यांच्या घराण्यापासून बाजूला राहिलेले नाही. सहकार क्षेत्रातील सर्व पदे यांच्या घराने मिळवली आहेत. खासदार, आमदार ,मंत्री, राज्यात मंत्री, केंद्रात मंत्री, राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्षपद, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्षपद, वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट चे संचालकपद अशा सर्व सत्ता पदांवर यांना संधी मिळाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती अशा संस्था वरही ताबा ठेवून या मंडळींनी आजपर्यंत चैन केली आहे. अखेर जनतेनेच त्यांना त्या संस्थातून जबरदस्तीने बाजूला केले होते.
एवढी प्रचंड संधी गेल्या ३० ते ३५ वर्षात मिळाल्यानंतरसुद्धा सांगली जिल्ह्याची आजची अवस्था काय आहे?
अनेक वर्षे खासदार आणि आमदार म्हणून यांच्या घराण्याने काम केल्यानंतर सुद्धा ताकारी, म्हैसाळ, टेंभू ,आरफळ अशा पाणी योजना खासदार संजयकाका पाटील ,माजी आमदार (कै.) अनिलभाऊ बाबर ,माजी आमदार (कै. )संपतरावअण्णा देशमुख या नेते मंडळींना पुढाकार घेऊन पूर्ण कराव्या लागल्या आहेत.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत तसेच त्यापूर्वी सांगली नगरपालिकेत यांच्या घराण्याकडे सत्ता सूत्रे होती. या तीनही शहरांचा यांनी किती आणि केवढा विकास केला ?अक्षरशः तिन्ही शहरांची वाट यांनी लावून टाकली. सांगलीचा साखर कारखाना यांना धड चालवता आला नाही. परंतु त्या कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या दूषित सांडपाण्यामुळे यांनी सांगलीकरांचे सगळे आरोग्य बिघडवून टाकले. अनेक सांगलीकर खराब पाण्यामुळे सांगली सोडून निघून गेले.
सांगली विधानसभा मतदारसंघातही यांच्या घराण्यानेच मक्तेदारी निर्माण केली होती. इसवी सन १९८६ मध्ये त्यांच्या या मक्तेदारीला पहिला धक्का माजी आमदार पैलवान संभाजीराव पवार (आप्पा) यांनी दिला. तेव्हापासून या घराण्याला चैन पडत नव्हते. या सांगली विधानसभा मतदारसंघात त्यांनी वारंवार आपली मक्तेदारी प्रस्थापित करायचा प्रयत्न केला; परंतु जनतेने त्यांची डाळ शिजू दिली नाही. सन १९९९ मध्ये माजी आमदार दिनकरतात्या पाटील यांनी या मतदारसंघात विजय मिळवला. परंतु तो सुद्धा यांच्या घराण्याला सहन झाला नाही. त्यांनी दिनकरतात्या पाटील यांचा २००४मधील निवडणुकीत दाम, दंड, भेद असे सगळे उपाय वापरून पराभव केला. घराण्यातील मक्तेदारीला धक्का बसतो आहे असे लक्षात आले तर हे आपापसातील मतभेद विसरतात आणि फायद्याच्या लोण्याकरता सगळे एकत्र येतात असा आजपर्यंतचा इतिहास आहे. इतर वेळी ते एकमेकांशी भांडतात; परंतु लाभाच्या वेळी एकत्र असतात. सांगली जिल्ह्यातील मोक्याची ठिकाणे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मिळू नयेत यासाठी या घराण्यातील सर्वजण सगळे मतभेद एकत्र विसरून एकत्र येतात.
लोकसभा मतदारसंघात तब्बल १२ वेळा खासदारकी भोगल्यानंतरही यांच्या घराण्याची हाऊस भागली नाही. अखेरीस सांगली लोकसभा मतदारसंघातील यांच्या मक्तेदारीला सन२०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांनी पहिला धक्का दिला. त्यानंतर२०१९ च्या निवडणुकीतही संजयकाका पाटील यांनी दुसरा धक्का दिला. तरीही हे सांगली लोकसभा मतदारसंघावरील आपली मक्तेदारी सोडायला ही मंडळी तयार नाहीत.
सांगली विधानसभा मतदारसंघ, सांगली लोकसभा मतदारसंघ आणि सांगली जिल्हा यावरील आपला हक्क वडलार्जीत हक्क आहे अशी यांची समजूत आहे. त्यामुळे तो हक्क सोडायला ते कधीही तयार होत नाहीत. सर्वसामान्य घरातून आलेल्या कार्यकर्त्याला कधीही हे संधी देत नाहीत. अशा एखाद्या कार्यकर्त्याने यांना धक्का देऊन संधी मिळवली तर यांना सहन होत नाही. ते सर्व भलेबुरे मार्ग वापरून कोणत्याही परिस्थितीत परिस्थितीत त्या कार्यकर्त्याला नेस्तनाबूत करायचा प्रयत्न करतात.
आता पुन्हा एकदा विशालदादा पाटील हे त्यांच्या घराण्यावर आणि काँग्रेस पक्षावर अन्याय झाल्याची ओरड करीत ही मक्तेदारी पुन्हा प्रस्थापित करण्यासाठीच लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. परंतु जनतेचा या घराण्यावर आणि या घराण्यातील निष्क्रिय लोकांच्यावर अजिबात विश्वास राहिलेला नाही. हेच पुन्हा एकदा या लोकसभा निवडणुकीतही सिद्ध होणार आहे.
यांना काँग्रेस पक्षाची चिंता नाही. यांनी स्वार्थासाठी अनेकदा काँग्रेस पक्षालाही नामोहरम करायला मागेपुढे पाहिलेले नाही. सांगली लोकसभा मतदारसंघात अनुभवी आणि पात्र काँग्रेस कार्यकर्त्याला यांनी कधीही उमेदवारी मिळू दिलेली नाही. ज्येष्ठ नेते आमदार मोहनराव कदम, ज्येष्ठ नेते आनंदराव मोहिते यांना उमेदवारी मिळू नये म्हणून याच मंडळींनी आकाशपाताळ एक केले होते.
काँग्रेस पक्षावर अन्याय झाल्याची यांची ओरड मतलबी आहे.यांना काँग्रेस पक्षाचेच एवढे प्रेम होते तर विशालदादा पाटील यांनी या खेपेसही दुसऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याचे नाव का पुढे केले नाही? यांना स्वतःच्याच घराण्याची मक्तेदारी प्रस्थापित करायची आहे.
‘ सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख ‘असे संत वचन आहे. या मंडळींनी आजपर्यंत केवळ आपल्या वडिलांची कीर्ती सांगत आणि त्यांचे नाव सांगतच दिवस काढलेले आहेत. या कर्तुत्वशून्य लोकांनी राजकारण हा धंदा समजून यांनी आजपर्यंत आपले दुकान चालू ठेवले आहे. यांना त्यांच्या वाड वडिलांनी स्थापन केलेल्या संस्थासुद्धा धड ठेवता आलेल्या नाहीत. एखादा अपवाद वगळला तर यांनी सर्व संस्थांना कुलपे लावलेली आहेत. सर्व संस्था मोडून खाल्ल्या आहेत. अनेक संस्थांचे भंगार सुद्धा शिल्लक राहिलेले नाही. तरीही अजून यांची राजकारणाची हाऊस भागलेली नाही. सार्वजनिक संस्थांवर आणि सत्ता स्थानांवर कब्जा मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न अजूनही सुरूच आहे. परंतु जनता या त्यांच्या प्रयत्नांना बिलकुल दाद देणार नाही.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.