प्रतिष्ठा न्यूज

काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा गुरूवारी सांगलीत ; कुपवाड चौकातून प्रारंभ; हिराबाग कॉर्नरला सभा : पृथ्वीराज पाटील यांची माहिती

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. १३ : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची जनसंवाद पदयात्रा उद्या गुरुवार, दि. १४ सप्टेंबर २०२३ रोजी सांगलीत प्रवेश करीत आहे. या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि पक्षाच्या उपक्रमाला ताकद द्यावी असे आवाहन सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे.

ते म्हणाले, या पदयात्रेचा मार्ग असा आहे, दुपारी ३.३० वा. कुपवाड चावडी चौकातून पदयात्रेला प्रारंभ होऊन ती भारत सूतगिरणी चौक-लक्ष्मी मंदीर चौक – वसंतदादा कुस्ती केंद्र – संजयनगर – अक्सा मशीद – अहिल्यादेवी होळकर चौक – भीमा कोरेगाव स्तंभ – रेल्वे स्टेशन चौक – वडर कॉलनी – कॉलेज कॉर्नर – पटेल चौक – झाशी चौक – सराफ कट्टा – कापड पेठ – बालाजी चौक – मारुती चौक – फौजदार गल्लीत जाईल. पदयात्रेची सांगता हिराबाग कॉर्नर येथे सभेने होईल. सभेला प्रमुख मार्गदर्शक माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री आ. विश्वजीत कदम हे संबोधित करणार आहेत.

सांगली जिल्ह्य़ातील सर्व तालुक्यांत या जनसंवाद पदयात्रेचे जंगी स्वागत झाले. लोकांतून मोठा प्रतिसाद लाभत आहे. बेरोजगारी, महागाई, सांप्रदायिक सहिष्णुता, शेतकरी, कष्टकरी, महिला यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी आवाज उठवणे अशा विषयांवर चर्चा झाली. सर्वसामान्य जनतेला काँग्रेस पक्षाच्या प्रवाहात सामील करून घेण्यासाठी ही जनसंवाद यात्रा आहे. पक्षाचे नेते खासदार राहूल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत ४००० कि. मी. ची भारत जोडो यात्रा पूर्ण करुन ‘नफरत छोडो – भारत जोडो’ हा संदेश दिला. भारतातील जनतेने प्रचंड उत्साहात यात्रेचे स्वागत केले. सर्व स्तरातील जनता त्यामध्ये सहभागी झाली. ‘निर्भय बनो’ हा संदेश दिलेल्या भारत जोडो यात्रेचा भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यातील सर्व जिल्ह्यात जनसंवाद पदयात्रेच्या आयोजनाचा आदेश प्रत्येक जिल्ह्यात दिला होता. सांगली जिल्ह्यात माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा सुरू आहे. यात आ. विक्रम सावंत, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, जयश्रीताई पाटील आणि तालुका व जिल्हास्तरीय कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.

ही जनसंवाद पदयात्रा सांगलीतही लक्षवेधी ठरणार आहे. या पदयात्रेला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळेल. नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या पदयात्रेला व सांगता सभेत सहभागी व्हावे असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.