प्रतिष्ठा न्यूज

‘हमास’ या आतंकवादी संघटनेचेसमर्थन करणार्‍यांवर ‘रा.सु.का.’ लावा ! – कोल्हापूर येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’त सरकारकडे मागणी

प्रतिष्ठा न्यूज
कोल्हापूर प्रतिनिधी : पॅलेस्टाईन येथील ‘हमास’ या आतंकवादी संघटनेने इस्रायलवर अत्यंत भीषण हल्ला करून 1400 हून अधिक लोकांची निर्घृण हत्या केली. शेकडो महिलांवर बलात्कार करण्यासह लहान-कोवळ्या मुलांचाही शिरच्छेद केला. अशा राक्षसी ‘हमास’ला तात्काळ आतंकवादी संघटना घोषित करावे आणि ‘हमास’, तसेच तिला पोसणार्‍या पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ देशभरात मोर्चे काढणार्‍यांवर आणि आंदोलने करणार्‍यांवर ‘राष्ट्रीय सुरक्षा कायद्या’अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे 19 नोव्हेंबर या दिवशी झालेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’द्वारे करण्यात आली.

या प्रसंगी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई आणि शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, हिंदु युवा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. अशोक देसाई, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे आणि सौ. साधना गोडसे, भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, राष्ट्रहित प्रतिष्ठानचे श्री. शरद माळी, उद्धव ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप आणि श्री. संजय कुलकर्णी, शिवसेनेचे श्री. अर्जुन आंबी, भाजप युवामोर्चाचे श्री. अमेय भालकर, शिरोली येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. नितीन चव्हाण, बजरंग दलाचे श्री. प्रथमेश मोरे, हिंदू एकता आंदोलनाचे श्री. अमर जाधव, श्री. वैभव कवडे, विश्‍व हिंदु परिषदचे श्री. विजय पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, शिपेकरवाडी येथील धर्मप्रेमी श्री. विकास भाटे यांसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन धर्मप्रेमी श्री. रामभाऊ मेथे यांनी केले.

या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे म्हणाले, ‘‘ पॅलेस्टाईनमधील ‘हमास’ ही जागतिक स्तरावरील क्रूर आतंकवादी संघटना आहे. इस्रायलसह अमेरिका, युरोपीय संघ, कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया यांसारखे पाश्‍चिमात्य देश आणि मिस्र, युएई, साऊदी अरब यांसारखे इस्लामी देश ‘हमास’ला आतंकवादी संघटना मानतात. इस्रायलवरील हल्ल्यात 1400 निष्पाप नागरिकांच्या हत्या करणार्‍या या आतंकवादी संघटनेला भारतानेही आतंकवादी संघटना म्हणून घोषित करण्याची वेळ आली आहे.’’
‘हमास’च्या समर्थनार्थ लेबनॉनची ‘हिजबुल्लाह’ ही आतंकवादी संघटना, तसेच येमेनमधील ‘हूती’ ही आतंकवादी संघटना इस्रायलविरोधात सशस्र लढा देत आहे. आतंकवाद्यांना आतंकवादी संघटनाच साहाय्य करणार, त्याप्रमाणे हे आहे. जर उद्या अशा आतंकवाद्यांनी भारतात आतंकवादी आक्रमणे केली, तर आज ‘हमास’ला समर्थन करणारे त्या आतंकवाद्यांच्या समर्थनार्थही रस्त्यावर उतरतील. काश्मीरमध्ये भारतीय सैन्यावर अशाप्रकारे आक्रमणे झाल्याचा देशासमोर आहे. त्यामुळे ‘हमास’ला समर्थन करणारे हे येणार्‍या काळात देशातील अंतर्गत संघर्षाला कारणीभूत ठरतील आणि देश गृहयुद्धाच्या दिशेने जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आतंकवाद्यांच्या समर्थकांना वेळीच पायबंद घालायला हवा. ‘हमास’प्रती लोकशाही मानणार्‍या कोणत्याही नागरिकाच्या मनात सहानुभूती कशी काय असू शकते ? त्यामुळे केंद्र शासनाने या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी या वेळी आंदोलनाच्या माध्यमांतून करण्यात आली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.