प्रतिष्ठा न्यूज

दुष्काळी सवलतीच्या अनुषंगाने प्रशासकीय विभागांनी त्वरित कार्यवाही करावी – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 28 : शासन निर्णय दिनांक 31 ऑक्टोबर 2023 नुसार सांगली जिल्ह्यातील शिराळा, कडेगाव, खानापूर-विटा, मिरज या चार तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात येऊन शासनाने मंजुरी दिलेल्या विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत. या व्यतिरीक्त दि. 10 नोव्हेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, वाळवा, जत, तासगाव, पलूस व आटपाडी या तालुक्यामधील 37 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत. शासनाने मंजुरी दिलेल्या सवलतीच्या अनुषंगाने संबंधित प्रशासकीय विभागांनी त्वरित कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.

आदेशात जमीन महसूलात सुट, पीककर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषि पंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर आणि टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे या सवलती लागू करण्यात आल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित प्रशासनिक विभागांनी देण्यात येणाऱ्या विविध सवलतींच्या अनुषंगाने त्यांच्या अधिपत्याखालील सर्व क्षेत्रीय यंत्रणांकरिता आवश्यक ते पूरक आदेश निर्गमित करावेत व आवश्यक निधी यंत्रणांना उपलब्ध करून द्यावा, असे आदेशात सूचित करण्यात आले आहे.

सांगली जिल्ह्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केलेली तालुकानिहाय ३७ महसूल मंडळे पुढीलप्रमाणे – कवठेमहांकाळ (५) – ढालगाव, देशिंग, कुची, कवठेमहांकाळ, हिंगणगाव. वाळवा (११) – वाळवा, कोरेगाव, कुरळप, तांदुळवाडी, ताकारी, पेठ, कासेगाव, बहे, आष्टा, इस्लामपूर, कामेरी. जत (८) – संख, माडग्याळ, जत, मुचंडी, डफळापूर, कुंभारी, उमदी, शेगाव. तासगाव (६) – मांजर्डे, विसापूर, येळावी, मणेराजुरी, सावळज, तासगाव. पलूस (४) – कुंडल, पलूस, भिलवडी, अंकलखोप. आटपाडी (३) – दिघंची, खरसुंडी, आटपाडी.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.