प्रतिष्ठा न्यूज

लोकमान्य टिळक स्मारक मंदिराच्या शताब्दी वर्ष महोत्सवचा शुभारंभ सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या व्याख्यानाने रविवारी होणार; सांगलीकरांमध्ये उत्साह

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगलीतील लोकमान्य टिळक स्मारक मंदिराचा शताब्दी वर्षाचा शुभारंभ सोहळा रविवार दिनांक १७ डिसेंबर २०२४ रोजी हा सरसंघचालक डॉ. श्री. मोहनजी भागवत यांच्या व्याख्याने होणार आहे. रविवारी सकाळी ९ वाजता सरसंघचालक संस्थेस भेट देणार आहेत. तर सायंकाळी ६ वा. चिंतामणराव व्यापार महाविद्यालय येथे खुल्या मैदानात त्यांचे व्याख्यान होणार आहे. अशी माहिती लोकमान्य टिळक स्मारक मंदिरच्या अध्यक्ष सौ. मनिषा काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. विनायक काळे, श्रीहरी दाते व प्रकाश बिरजे यावेळी उपस्थित होते.
सौ. मनिषा काळे म्हणाल्या,
दि. १५ फेब्रुवारी १९२० लोकमान्यांनी ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष पद सांगली नगरीमध्ये भूषविले. दुपारच्या वेळी विश्रांतीसाठी आयर्विन पुलासमोरच्या जागेत बांधलेल्या एका लहान खोलीमध्ये ते थांबले, खोली बाहेर मोठे मैदान आणि जागा अगदी मोक्याची, लोकमान्यांचे विचार, त्यांचे बोलणे आणि देशभक्तीने भारलेले त्यांचे व्यक्तिमत्व ह्या सगळ्यांमुळे काही तरुण मंडळी अतिशय प्रभावीत झाली. परंतु त्याच वर्षी १ ऑगस्ट या दिवशी लोकमान्यांचे महानिर्वाण झाले. त्यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या या तरुणांनी सांगलीमध्ये लोकमान्यांचे उचित स्मारक उभे करण्याचे ठरविले. दिनांक १९ डिसेंबर १९२४ या दिवशी लोकमान्य टिळक स्मारक मंदिर स्थापित झाले. साहित्य सम्राट न. चि. तथा तात्यासाहेब केळकरांनी या वास्तूचे उ‌द्घाटन केले,

आज उभी असलेली लोकमान्य टिळक स्मारक मंदिराची भव्य वास्तू आता शंभरीत पदार्पण करीत आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरील लोकमान्य टिळकांचा मेघडंबरीमध्ये उभा असलेला अर्थ पुतळा हे सांगलीकरांचे दैवतच जणू, जसे मंदिरात देवदर्शनासाठी जावे, तसे कित्येक लोक रोज लोकमान्यांच्या दर्शनासाठी या मंदिरात येतात.

या त्या निमित्ताने अनेक थोर नेत्यांचा सहवास या वास्तूला लाभला आहे. स्थापनेपासूनच संस्थेने विविध क्षेत्रात कामाला सुरुवाल केली. ७० पेक्षा अधिक वर्षे संस्थेने विविध उपक्रम राबवले आणि सांगलीकरांच्या मनात एक उत्तम स्थान निर्माण केले आहे.

योगाचार्य कैलासवासी जनुभाऊ गोडबोले आणि काही कै. बापूराव देवधर यांच्या अथक प्रयत्नातून संस्थेत योगासन वर्गाची सुरुवात झाली. जवळजवळ ६० वर्षे अव्याहतपणे हा मोफत योगासन वर्ग सुरू आहे. योगाचे वाढते महत्त्व लक्षात बोलले तर संस्थेने हा अतिशय स्तुत्य उपक्रम सुरु ठेवला आहे असे म्हणायला हवे.
आजपर्यंत शेकडो लोकांनी याचा लाभ घेऊन मनस्वास्थ्य आणि आरोग्य प्राप्त केले आहे.

प्रतिवर्षी गीता जयंतीच्या निमित्ताने आयोजित केल्या जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा हा सांगलीतील आणखी एक मानदंड, मुलांमध्ये सभाधिटपणा यावा, स्मरणशक्ती सुधारावी, विचारवृद्धी व्हावी या हेतूने गीता पठण, कथाकथन आणि वक्तृत्व स्पर्धा होतात. ६०० ते ७०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा त्यात सहभाग असतो. त्याचवेळी भगवद्‌गीता, ज्ञानेश्वरी व लोकमान्य टिळक या विषयांवर तज्ञ आणि प्रख्यात वक्त्यांची व्याख्यानमाला आयोजित केली जाते.

उन्हाळी सुट्टीत अभ्यासातून मुक्त झालेल्या मुलांसाठी बालसंस्कार शिबिराचे आयोजन होते. विविध मैदानी, बौद्धिक खेळ, कसरती, मनोरे, हस्तकला, नाट्य अभिनय, रांगोळी, देशभक्तीपर गीते, असे अनेक विषय आणि तज्ञ मार्गदर्शक यामुळे मुले उत्साहाने व आनंदाने या शिबिरात सहभागी होतात.

गेली ४० वर्षे सकाळी ८ ते १२ या वेळेत मराठीतील प्रमुख वृत्तपत्रे सर्व नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली जातात. संस्थेच्या परिसरातील कित्येक ज्येष्ठ नागरिक या वाचनालयाचा नित्य लाभ घेतात.

आपला परिसर, आपले सभासद सर्वच लोक निरोगी राहावे, त्यांचे आयुष्य आरोग्यपूर्ण असावे याच विचारातून एक सुरू असलेला उपक्रम म्हणजे आरोग्यविषयक व्याख्यान.

अनेक कारणांमुळे समाजासमोर उभ्या राहणाऱ्या प्रश्नावर चर्चा, विचार विनिमय करणे, समाजातील भीतीचे निराकरण करणे ही जबाबदारी देखील संस्था आजपर्यंत अतिशय जागरूकपणे पार पाडत आली आहे. शालेय पोषण आहार, व्यावसायिक अभ्यासक्रमची योजना, नोटाबंदी, जीएसटी, कलम ३७०, सी.ए.ए., एन.आर.सी. असे विषय उदाहरणार्थ घेता येतील.

दिवाळीच्या शीतल वातावरणात प्रतिपदेचा पहाटेचा स्वरसुरेल प्रभात हा कार्यक्रम म्हणजे सांगली आणि परिसरातील नवोदित गायक वादकांना व्यासपीठावर आपली कला सादर करण्याची दिलेली संधीच.
हे असे विविध उपक्रम आयोजित करताना टिळक मंदिराने आपले सामाजिक उत्तरदायित्वाचे भान निश्चितच जपले आहे. त्याचाच परिणाम म्हणून संस्था काही व्यक्तींचे आणि संस्थांचे कार्य समाजाच्या परिचयात आणून देते. प्रतिकूल परिस्थितीशी झगडून आव्हाने पेलत विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या नऊ भगिनींचा नवरात्र उत्सवात सन्मान केला जातो. नवदुर्गा सन्मान सोहळा साजरा करून त्यांच्या कार्याची ओळख सर्वांना करून द्यावी यासाठी हा उपक्रम.

लोकमान्य टिळकांनी संघटनेच्या हेतूने सुरू केलेला गणेशोत्सव या मंदिरात अगदी धामधुमीत साजरा होतो. सामूहिक अथर्वशीर्ष पठणासाठी उत्सव काळात २०० पेक्षा अधिक महिला संस्थेवरील प्रेमामुळे एकत्र येतात. प्रतिवर्षी कोजागिरी निमित्त एक आगळी वेगळी संकल्पना घेऊन अनोखी संगीत मैफिल आयोजित केली जाते. नामवंत गायक वादकांच्या या मैफिलीला जाणकार रसिकांचा उत्तम
प्रतिसाद मिळतो.

टिळक स्मारक मंदिरात राष्ट्रीय उत्सव सुद्धा उत्साही वातावरणात साजरे होतात. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी येथे साजरी केली जाते.

अशा सर्व उपक्रमामुळे समाजातील सर्व घटकांमध्ये संस्थेबद्दल मनस्वी आदर निर्माण झाला आहे. १९ डिसेंबर हा संस्थेचा वर्धापन दिन संस्थेमध्ये दीपोत्सव करून साजरा केला जातो. जवळच्या परिसरातील अनेक नागरिक, सभासद आणि हितचिंतक दीपोत्सवासाठी उत्स्फूर्तपणे हजर असतात.

टिळक स्मारक मंदिराचे प्रमुख विश्वस्त म्हणून पन्नास वर्षे कार्यरत असलेले कै. बाबुराव गोरे, शिस्त, वक्तशीरपणा, निस्वार्थी वृत्ती, प्रामाणिकपणा आणि चिकाटी या गुणांमुळे त्यांनी संस्थेला प्रभावी नेतृत्व दिले. त्यांच्या मार्गदर्शनानेच टिळक स्मारक मंदिर नावारूपाला आले. त्यांच्या कार्याचे स्मरण म्हणून २००१ सालापासून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेच्या कार्याचा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. लोकमान्यांच्या जाज्वल्य व्यक्तिमत्त्वाचा आदर म्हणून प्रतिवर्षी १ ऑगस्ट या दिवशी टिळक पुण्यतिथीला ध्वजवंदन व व्याख्यान आयोजित करण्यात येते. यंदाच्या शताब्दी वर्षाच्या काळात आणखी निरनिराळे
कार्यक्रम, उपक्रम आखण्याचा संस्थेचा मानस आहे. निरनिराळ्या विषयावरील व्याख्याने, प्रवचने, कीर्तन, निरूपण असे खास महाराष्ट्रीयन शैलीतील कार्यक्रम करण्याचा संस्थेचा मानस आहे.

पुढच्या पिढीत उत्तम वक्ते, लेखक, पत्रकार घडावेत यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे, म्हणूनच त्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली तरुण मुला-मुलींच्या कार्यशाळा भरवण्याचे संस्थेने ठरवले आहे

सरसंघचालक डॉ. श्री. मोहनजी भागवत संस्थेस सदिच्छा भेट देणार आहेत. सुमारे दहा वर्षानंतर त्यांचे संस्थेत आगमन होणार असल्यामुळे सर्व विश्वस्त आणि कार्यकारी मंडळाचा उत्साह व आनंद वाढला आहे. त्यांच्या मौलिक विचारांचा लाभ समस्त सांगलीकरांना मिळावा यासाठी सायंकाळी जाहीर व्याख्यान होईल. लोकमान्य टिळक स्मारक मंदिराच्या विश्वस्त व कार्यकारी मंडळांने सर्व सांगलीकरांना आग्रहाने आमंत्रित केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.