प्रतिष्ठा न्यूज

विस्तारित टेंभू योजनेच्या अहवालास तृतीय सुधारीत प्रशासकीय मान्यतेचा राज्य सरकारचा निर्णय रोहित पाटील

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात १४ डिसेंबर रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत विस्तारीत टेंभू योजनेच्या अहवालास तृतीय सुधारीत प्रशासकीय मान्यता (सु. प्र. मा) देण्यात आली होती, याबाबतचा निर्णय राज्य सरकारने शुक्रवारी (दि.५) रोजी घेतला आहे. आता सातारा,सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील ८ तालुक्यातील १०९ गावांचा टेंभू योजनेच्या वाढीव लाभक्षेत्रात समावेश झाला आहे. यामुळे आणखी १०९ गावातील ४१ हजार ३ हेक्टर क्षेत्र आता विस्तारीत टेंभू योजनेच्या सिंचनाखाली येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.यामुळे टेंभू योजनेचे एकूण लाभक्षेत्र आता १ लाख २१ हजार ४७५ हेक्टर पर्यंत पोहचणार आहे.नव्याने मंजूर झालेल्या आठ टी.एम.सी पैकी एक टी.एम.सी.तासगावला आणि अर्धा टी. एम. सी.पाणी कवठे महांकाळला असे दीड टी.एम.सी पाणी मतदारसंघाला मिळणार आहे.या पाण्याचा लाभ तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील २६ गावांना होणार आहे.यामध्ये तासगाव तालुक्यातील १७ आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील नऊ गावांचा समावेश आहे.टेंभूच्या या पाण्याचा लाभ मतदारसंघातील ८ हजार ४७६ हेक्टर क्षेत्राला होणार आहे.यामध्ये तासगाव तालुक्याच्या ६ हजार २६ तर कवठेमहांकाळ तालुक्यातील २ हजार ४५० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.
सांगली,सातारा आणि सोलापूर या तीन जिल्ह्यातील जवळपास ४१ हजार तीन हेक्टर क्षेत्र टेंभूच्या पाण्यापासून गेल्या अनेक वर्षापासून वंचित होते.टेंभू योजनेला मंजूर २२ टी. एम. सी. पाण्याचे वाटपाचे नियोजन पूर्ण झाल्यामुळे आणखी नविन गावे आणि क्षेत्र वाढविण्यासाठी पाण्याची उपलब्धता नव्हती.अनेक वर्षे पाण्याची वाट पाहण्यात गेली.
राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर जयंत पाटील हे जलसंपदामंत्री असताना राज्य शासनाने पत्र जा. क्र. २०२१ (२१६/२०२१) दि २९/०४/२०२२ नुसार ८ टी.एम.सी. अतिरिक्त पाण्यास तत्वत: अशी मान्यता मिळाली.त्यानंतर तब्बल दीड वर्षे गेली परंतू या आठ टी. एम. सी.पाण्यास अंतिम मंजूरी मिळाली नव्हती. विस्तारीत टेंभू योजनेच्या तृतीय अहवालास सु. प्र. मा. मिळावी यासाठी २ ऑक्टोबर २०२३ या गांधी जयंती दिनापासून आमरण उपोषण करण्याचा इशारा आमदार सुमनताई आणि मी स्वत: दिला होता. उपोषणाच्या दोन दिवस अगोदर ३० सप्टेंबर रोजी शासनाने आठ टी. एम. सी. पाण्याला अंतिम मंजूरी दिली.
गांधी जयंतीला सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते,उपोषणाच्या दुस-या दिवशी राष्ट्रवादीचे केंद्रीय अध्यक्ष शरद पवार यांची मध्यस्थी,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकारात्मक भूमिका, आमदार अनिल बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे केलेली केलेली यशस्वी शिष्टाई यामुळे जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी एक महिना कालावधीत योजनेच्या अहवालास तृतीय सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याची लेखी ग्वाही दिली.यानंतर ३ ऑक्टोबर रोजी उपोषण पाठीमागे घेतले.परंतू एक महिन्यात सु. प्र. मा.मिळाली नाही तर मुंबईत मंत्रालयासमोर आमरण उपोषण सुरु करण्याचा इशारा दिला होता.एक महिना कालावधीत तृतीय अहवालास सु. प्र. मा. देणे शक्य न झाल्याने २ नोहेंबर २०२३ ला जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी आमदार सुमन पाटील यांचेकडे आणखी एक महिन्याचा कालावधी मागितला होता.त्यानुसार तीन डिसेंबरपर्यंत सु. प्र. मा.मिळावी अशा मागणीचे निवेदन आमदार सुमन पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे दिले होते.यानंतर महाराष्ट्र सरकारने युध्दपातळीवर हालचाली करत सर्व विभागांची मंजूरी घेतली आणि नागपूर अधिवेशन काळात १४ डिसेंबर रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत टेंभूच्या तृतीय अहवालास सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली होती.यानंतरच याबाबतचा सरकारचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला असल्याचे राष्ट्रवादी युवानेते रोहित पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
चौकट : असे मिळाले ८ टी.एम.सी पाणी…
१९९६ मध्ये टेंभू योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली तेंव्हा २२ टी.एम.सी. पाणी राखीव होते.यामध्ये कोयना धरणातील १८.४६ टी. एम. सी, तारळी धरणातील १.६७ टी. एम. सी, वांग धरणातील ०.९७ टी. एम. सी. तर कृष्णा नदीचे पुराचे पाणी (मान्सूनोत्तर प्रवाहापैकी) ०.९० टी. एम सी. पाण्याचा समावेश होता. जयंत पाटील यांनी आठ टी. एम. सी पाणी उपलब्ध करुन दिले. यामध्ये लवादातील टेंभू प्रकल्पाचे शिल्लक ३.५० टी.एम.सी, कृष्णा प्रकल्पातील तरतूद आणि प्रत्यक्ष फरक असलेले २.५० टी. एम. सी. व कोयना प्रकल्पातील पश्चिमेकडे सोडण्यात येणा-या पाण्यातील बचत होणारे २ टी. एम. सी. असे एकूण आठ टी. एम. सी. अतिरिक्त पाणी मिळाले आहे.
विस्तारीत टेंभूमध्ये समाविष्ठ होणारी तालुकानिहाय गावे.
तासगाव तालुका :जरंडी,यमगरवाडी, दहिवडी, वायफळे,बिरणवाडी, डोंगरसोनी,वडगाव,लोकरेवाडी, सावळज,कचरेवाडी,किंदरवाडी, नरसेवाडी, विजयनगर, धोंडेवाडी,पेड, मोराळे,दत्तनगर (मांजर्डे)
कवठेमहांकाळ तालुका : तिसंगी, घाटनांद्रे, रायवाडी, गर्जेवाडी,  कुंडलापूर, वाघोली, शेळकेवाडी, केरेवाडी, जाखापूर, घोरपडी, दुधेभावी, शिंदेवाडी.
यावेळी विश्वास तात्या पाटील, खुजट वकील शहर अध्यक्ष,सागर पाटील जि प सदस्य,अमोल नाना माजी नगराध्यक्ष,अभिजीत पाटील युवक शहर अध्यक्ष, दत्तात्रय हावळे युवकाध्यक्ष,सागर लिंबळे विद्यार्थी अध्यक्ष, पी वाय जाधव,संदीप पाटील, रमेश कांबळे ,गुंडा भाऊ पाटील, संजय भाऊ थोरात,नदीम तांबोळी, उपस्थित होते..
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.