प्रतिष्ठा न्यूज

अंकलगी ग्रामस्थ पाण्यासाठी पुन्हा उतरणार रस्त्यावर- तुकाराम बाबा; सहा महिने उलटले तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाळले नाही आश्वासन

प्रतिष्ठा न्यूज
जत/प्रतिनिधी : जत तालुक्यातील माडग्याळ येथे दाखल झालेले म्हैसाळचे पाणी व्हसपेठ, गुडडापूर, अंकलगी तलाव येथे दाखल झालेच पाहिजे यासाठी जानेवारीमध्ये अंकलगी येथील महादेव मंदिरात आमरण उपोषण सुरू केले. या आंदोलनाला अंकलगी ग्रामस्थांसह अन्य गावांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. ७५ हुन अधिक तरुणांनी रक्त घ्या पण पाणी द्या म्हणत रक्तदान केले. आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर खुद्द कृष्णा खोरे महामंडळाचे अधीक्षक कार्यकारी अभियंता चंद्रशेखर पाटोळे हे नऊ जानेवारी रोजी अंकलगी येथे आले. येत्या सहा महिन्यात अंकलगीला पाणी सोडण्याचे नियोजन असून ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन करत उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासनही दिले पण आज सहा महिने उलटून गेले तरी अद्याप कामाचा पत्ता नाही. शासनापाठोपाठ प्रशासनानेही आमची फसवणूक केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही. यासंदर्भात अधिकाऱ्यांना जाब विचारून पुन्हा आमरण उपोषण, रस्ता रोको, रक्त घ्या पाणी द्या आंदोलन करण्याचा इशारा चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा, श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हभप तुकाराम बाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

अंकलगी येथील महादेव मंदिरात यासंदर्भात बैठक पार पडली. बैठकीस हभप तुकाराम बाबा महाराज यांच्यासह अंकलगी येथील भीमाशंकर पाटील, कुलांकर तेली, शिवलिंगप्पा तेली, भीमराय काखंडकी अप्पासाहेब बिरादार, बिराप्पा कोहळळी, महांतेश माळी, बाळासाहेब कांबळे, महादेव कांबळे, अनिल उदगेरी , शेकू महाराज अमित हतगणी, गोपाल माळी, बसवराज माळी, हनमंत तेली, मोदिन मुल्ल्हा,रवि कोळी, सागर उमराणी,राकेश कांबळे, शंकर कांबळे आदी उपस्थित होते. बैठकीनंतर तुकाराम बाबा बोलत होते.

तुकाराम बाबा म्हणाले, दुष्काळी जत तालुक्यातील प्रत्येक गावात म्हैसाळचे पाणी पोहचले पाहिजे यासाठी आपण २०१९ पासून लढा उभारला आहे.श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून संख, गुडडापूर, माडग्याळ येथे पाणी परिषदा घेतल्या. गावोगावी बैठका घेतल्या. जिल्हाधिकारी , तहसिल कार्यालयावर धडक मोर्चे काढणे, लाक्षणिक उपोषणे करत म्हैसाळचे हक्काचे पाणी जतला मिळालेच पाहिजे अशी आग्रही व आक्रमक भुमिका घेत जलचळवळ मोहीम राबवली. याच मागणीसाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ०७ जून २०१९ रोजी संख ते मुंबई मंत्रालय ५०० किलोमीटर पायी दिंडी काढली. जतच्या इतिहासात प्रथमच ही ऐतिहासिक पायी दिंडी काढण्यात आली. याच दिंडीने शासन व लोकप्रतिनिधींची पोलखोल झाली. आजपर्यत लोकप्रतिनिधी पाणी येणार, देणार सांगत होते पण प्रत्यक्षात जत पूर्व भागाला पाणी द्यायला पाणीच नाही हे उघड हेच या पायीदिंडीचे यश होय. पाण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खा. उदयनराजे भोसले, माजी खासदार संजयकाका पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, अदिती तटकरे यांच्यासह म्हैसाळच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेत हा विषय लावून धरला. अंकलगी येथे आमरण उपोषणही केले.

पाण्यासाठीचा हा लढा आजही सुरू आहे. आश्वासने देवूनही पाणी दिले जात नाही. कामाच्या निविदा काढल्याचे सांगतात. पण तसे घडले नाही. यासंदर्भात अंकलगीसह दुष्काळग्रस्त गावाचा ठराव घेवून अधिकाऱ्यांना भेटून आश्वासनाचे काय झाले याचा जाब विचारणार असल्याचे सांगून तुकाराम बाबा यांनी आंदोलनाचा इशारा दिला.

निविदा निघाल्या पुढे काय?
म्हैसाळचे पाणी माडग्याळ तलावातून व्हसपेठ, गुडडापूर, अंकलगी तलावात दाखल होणार आहे. या कामासह बिळूर भागातील उर्वरित कामासाठी २६ कोटी ८३ लाख ७६ हजाराची निविदा जाहीर झाल्याने येणाऱ्या काळात हे काम मार्गी लागणार असल्याचे सांगितले जाते पण त्या निविदेचे, काम सुरू करण्याचे झाले काय, यावर कोणीच का बोलत नाही असा सवाल तुकाराम बाबा यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.