प्रतिष्ठा न्यूज

तासगावच्या ‘शिवनेरी’ची कोल्हापूरात विजयी सलामी : स्व.अनिल भाऊंच्या आठवणीने सदस्यांना अश्रू अनावर

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगावच्या शिवनेरी कला,क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या गोविंदा पथकाने कोल्हापूर येथील निष्ठावंतांच्या शिवसेनेची दहीहंडी फोडत विजयी सलामी दिली. दहीहंडीच्या पहिल्याच दिवशी सात थर रचत यशस्वीपणे ही हंडी फोडून मंडळाने एक लाख रुपयांचे बक्षिस पटकावले.यावेळी मंडळाचे अध्यक्ष स्व.अनिल जाधव यांना हा विजय समर्पित करण्यात आला.
शुक्रवारी गोकुळ अष्टमीने राज्यभरात दहीहंडीला सुरुवात झाली.कोल्हापूर येथे पहिल्याच दिवशी शिवनेरी मंडळाच्या गोविंदानी दोन ठिकाणच्या दहीहंडीला हजेरी लावली.सुरुवातीला गुजरी चौकातील दहीहंडीच्या ठिकाणी या मंडळाने सात थर रचत यशस्वी सलामी दिली.त्यानंतर मिरजकर तिकटी येथील चौकात निष्ठावंतांच्या शिवसैनिकांनी आयोजित केलेल्या दहीहंडीला या पथकाने हजेरी लावली.
याठिकाणच्या दहीहंडीला चार संघांनी हजेरी लावली.सुरुवातीला चिठ्ठ्या टाकून संघांना हंडी फोडण्याची संधी देण्यात आली.परंतु ही हंडी सुमारे 40 फुटांवर उंच बांधली असल्यामुळे पहिल्या फेरीत कोणत्याच संघाला ही हंडी फोडता आली नाही.त्यानंतर दुसऱ्या फेरीत ही हंडी 38 फुटांवर आणण्यात आली.मात्र या फेरीतही कोणताच संघ हंडी फोडण्यात यशस्वी झाला नाही.त्यानंतर तिसऱ्या फेरीत ही हंडी 36 फुटांवर आणण्यात आली होती.या फेरीतही पहिल्या दोन संघांना ही हंडी फोडता आली नाही. शिवनेरीच्या गोविंदांनी मात्र तिसऱ्या फेरीत सात थर लावून यशस्वीपणे ही हंडी फोडत लाख रुपयांचे बक्षीस पटकावले.
*स्व.अनिल भाऊंची उणीव भासली..
हातनोलीसारख्या एका खेडे गावातून येऊन अनिल जाधव यांनी शिवनेरी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाची स्थापना केली होती.शेकडो युवकांना एकत्रित आणून त्यांनी कार्यकर्त्यांची मोळी बांधली होती.दहीहंडीच्या माध्यमातून राज्यभर या मंडळाने आपला नावलौकिक मिळवला आहे. दहीहंडी व दुर्गामाताच्या कार्यक्रमातून या मंडळाच्या युवकांनी एकजुटीचे दर्शन घडवले होते.अनिल जाधव यांनी या मंडळाला चांगल्या प्रकारची दिशा व शिस्त घालून दिली होती.मात्र 15 दिवसांपूर्वी त्यांच्यावर अमानुषपणे हल्ला चढवत हत्या करण्यात आली होती.आजच्या दहीहंडीच्या कार्यक्रमात जाधव यांची उणीव मंडळाच्या प्रत्येक सदस्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होती.
*…शिवनेरीच्या सदस्यांना अश्रू अनावर…!*
अनिल जाधव हे शिवनेरीचे सर्वेसर्वा होते.त्यांच्या हत्येने मंडळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.मंडळाचा प्रत्येक सदस्य आजही जाधव यांच्या हत्येमुळे खचलेला दिसून येत आहे. जाधव म्हणजे मंडळाची मोठी ताकद होती.राज्यभरात दहीहंडी फोडण्यास गेल्यानंतर जाधव हे मंडळाच्या प्रत्येक सदस्याला प्रेरणा देत होते.जाधव यांची प्रेरणा व पाठीवरील थाप यामुळे या मंडळाने राज्यातील अनेक नावाजलेल्या हंड्या लीलया फोडल्या आहेत.आज कोल्हापूर येथे विजयी सलामी दिल्यानंतर मात्र मंडळाच्या सर्व सदस्यांना अनिल भाऊ यांच्या आठवणीने कंठ दाटून आला.लाखाचे बक्षीस मिळवूनही मंडळाने अजिबात जल्लोष केला नाही.यावेळी मंडळाच्या सदस्यांना भाऊंच्या आठवणीने अश्रू अनावर झाले.अनेक सदस्य अक्षरशः ढसाढसा रडले.त्यामुळे काहीकाळ वातावरण भावनिक झाले होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.