प्रतिष्ठा न्यूज

श्रीकांत गोरशेटवार यांना शिक्षण भूषण पुरस्कार

प्रतिष्ठा न्यूज/राजू पवार
नांदेड दि.21 : शैक्षणिक क्षेत्रातील एकमेव मराठी डिजिटल नियतकालिक म्हणून अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस उतरलेले आणि अव्याहतपणे निःशुल्क, निःस्वार्थ, निःस्पृहपणे शिक्षकांच्या उदात्त, विद्यार्थीहिताच्या नाविण्यपूर्ण उपक्रमांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध असणारे म्हणून हे रयतेचा कैवारी नियतकालिक ठरले आहे. काल दि.१८ सप्टेंबर २०२२ रोजी बापूसाहेब डी.डी.विसपुते महाविद्यालय, विचुंबे, पनवेल जि.रायगड येथे या नियतकालिकाचा तृतीय वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात दिमाखदार सोहळा पार पडला. तृतीय वर्धापन दिनाच्या निमित्ताने राज्यभरात शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात भरीव व उल्लेखनीय कार्य करणार्‍या तमाम उपक्रमशील गुरुजनांना राज्यस्तरीय शिक्षण भूषण पुरस्कार २०२२, जीवन गौरव पुरस्कार २०२२, सेवा गौरव पुरस्कार २०२२ अशा विविध पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नूतन भोकर, ता.भोकर, जि.नांदेड येथे प्राथमिक पदवीधर म्हणून कार्यरत असलेले उपक्रमशील शिक्षक श्रीकांत द. गोरशेटवार यांनी केलेल्या कार्याची दखल यावेळी घेऊन त्यांना राज्यस्तरीय शिक्षण भूषण पुरस्कार २०२२ देऊन गौरव करण्यात आला. श्रीकांत द. गोरशेटवार सर हे सन २०१६ पासून नूतन भोकर येथे कार्यरत असून त्यांनी सातत्याने नावीण्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून शाळेचा गौरव वेळोवेळी वाढवला आहे. स्काऊट-गाईडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सेवा व सहकार्याचे, स्वावलंबनाचे आणि शिस्तीचे धडे देऊन आतापर्यंत १६ स्काऊट्सना राज्यपुरस्कार मिळवून देण्यात मोलाची भूमिका निभावली. शाळेच्या रग्बी खेळाडूंचा उत्कृष्ट संघ बांधून त्यांना जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळण्याची संधी उपलब्ध करुन दिली. रग्बी असोशिएशन ऑफ महाराष्ट्र या खेळाडूंच्या शासनमान्य संघटनेच्या मार्फत शाळेच्या विद्यार्थ्यांना खेळाचे उत्कृष्ट व्यासपीठ मिळवून दिले. विविध कार्यालयामार्फत अनेक प्रसंगी आयोजित करण्यात येणार्‍या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी मिळवून देतात. विद्यार्थीही मिळालेल्या संधीचे सोने करतात. कोरोनाकाळात वर्गातील विद्यार्थ्यांशी सातत्याने संपर्कात राहून त्यांना शिक्षणप्रवाहात टिकवून ठेवण्याचे कामही केले. अनेक विद्यार्थ्यांना विविध व्यासपीठावर चमकवण्यासाठी सातत्याने मेहनत करतात. कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात सहजपणे सहभागी होणार्‍या या हरहुन्नरी आणि उपक्रमशील शिक्षकास राज्यस्तरीय शिक्षण भूषण पुरस्कार २०२२ मिळाल्यामुळे त्यांचे गटशिक्षणाधिकारी, शिक्षणविस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह त्यांच्या मित्रमंडळीकडून आणि सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.