प्रतिष्ठा न्यूज

ड्रेनेज चेंबरमधील गाळ काढणारा अत्याधुनिक रोबोट लवकरच महापालिकेच्या ताफ्यात दाखल होणार : रोबोटची तीन ठिकाणी यशस्वी चाचणी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : खोल ड्रेनेज चेंबरमधील गाळ काढणारा अत्याधुनिक रोबोट लवकरच महापालिकेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. या अत्याधुनिक रोबोटची आज तीन ठिकाणी यशस्वी चाचणी घेण्यात आली. महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि आयुक्त सुनील पवार यांच्या उपस्थितीत ही चाचणी घेण्यात आली. चाचणीत अवघ्या 15 मिनिटात या रोबोटने ड्रेनेज चेंबरमधील गाळ काढल्याने महापौर आयुक्तांनी कौतुक केले. दरम्यान या रोबोटबाबत पालकमंत्री मा. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी सूचित केल्याप्रमाणे जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांचेकडे मनपा आयुक्त सुनील पवार यांच्या मान्यतेने रोबोट खरेदीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात शहरी भागात अनेक ठिकाणी भुयारी ड्रेनेज लाईन आहेत. या ड्रेनेज लाईन साफ करून त्यातील गाळ काढण्याचे काम मनपाच्या ड्रेनेज विभागाचे कर्मचारी करतात. अनेक ठिकाणी चेंबरची खोली 5 ते 10 मीटर पर्यंत असते त्यामुळे कर्मचारी चेंबरमध्ये उतरल्यानंतर आतील गॅस मुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे खोल ड्रेनेज चेंबरमधील गाळ हा अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून काढण्याबाबत निर्णय झाला आहे. यानुसार सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून आपल्या ड्रेनेज लाईन चेंबरमधील गाळ काढण्यासाठी आता रोबोटचा वापर केला जाणार आहे. याबाबत पालकमंत्री मा. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी सूचित केल्याप्रमाणे जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांचेकडे मनपा आयुक्त सुनील पवार यांच्या मान्यतेने रोबोट खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्व योजनेतून रोबोट खरेदीचा 39 लाख 52 हजाराचा प्रस्ताव पाठवला आहे. हा रोबोट केरळ येथील बॅडिकोट कंपनीकडून तयार करण्यात आला असून त्या रोबोटच्या प्रत्यक्ष कामाची चाचणी आज महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि आयुक्त सुनील पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी गणेश नगर येथील ड्रेनेज लाईनमधील चेंबरमधील गाळ या रोबोटने अवघ्या 15 मिनिटात बाहेर काढीत आपल्या यंत्राची कमाल दाखविली. विशेष म्हणजे हा रोबोट जनरेटवर चालतो व फक्त दोन व्यक्ती याला चालवण्यासाठी लागतात. विशेष म्हणजे या रोबोटच्या आर्ममध्ये सेन्सर आहे तसेच कॅमेराही असल्याने कॅमेराच्या माध्यमातून चेंबर मधील गाळ आणि चेंबरची स्थिती पाहता येणार आहे. त्यामुळे आर्म चेंबरमध्ये गेल्यावर आतील गाळ स्वच्छ करण्यास मदत होणार आहे. या रोबोटमुळे कर्मचाऱ्यांकडून केले जाणारे काम 15 मिनिटात केले जाणार असून यामुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडणार नाही. आज या चाचणीवेळी विरोधीपक्षनेते संजय मेंढे, उपायुक्त राहुल रोकडे, नगरसेवक सुबराव मद्रासी, फिरोज पठाण , मनपाचे ड्रेनेज अभियंता परमेश्वर अलकुडे, कार्यशाळा प्रमुख तेजस शहा, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, केरळ येथील बॅडिकोट कंपनीचे प्रतिनिधी उदगावकार आदी उपस्थित होते. हा रोबोट खरेदी करण्याबाबतचा आयुक्त सुनील पवार यांच्या सूचनेनुसार तसा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठवण्यात आला असून त्याला मंजुरी मिळताच हा रोबोट महापालिकेच्या ताफ्यात दाखल होईल असे ड्रेनेज विभागाचे अभियंता परमेश्वर अलकुडे यांनी सांगितले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.