प्रतिष्ठा न्यूज

कोविड लसीचा प्रिकॉशन डोस तात्काळ घ्या अफवांवर विश्वास ठेवू नका : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचे आवाहन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 22, (प्रतिनिधी) : सध्या चीनमध्ये नव्याने सापडलेल्या BF-7 या ओमायक्रॉनच्या उप-प्रकारामुळे सुरू असलेल्या कोवडि-19 साथ उद्रेकाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील यंत्रणा सतर्क व सज्ज आहे. जिल्ह्यात 15 नोव्हेंबरपासून एकही रूग्ण कोविड पॉझीटीव्ह नाही. कोणीही घाबररून जावू नये, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. कोविड लसीकरणासाठी पुरेसे डोस उपलब्ध असून ज्यांनी अद्यापही लसीचा पहिला व दुसरा डोस घेतला नाही त्यांनी तो तात्काळ घ्यावा. ज्यांचा प्रिकॉशन डोस प्रलंबित आहे त्यांनीही तो तात्काळ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात कोविड-19 साथीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, कोविड-19 साथीपासून बचाव करण्यासाठी कोविड ॲप्रोप्रीएट बिहेवीअरचे पालन करावे, गर्दीत जाणे टाळावे, कोविड सदृश्य लक्षणे दिसल्यास त्वरीत नजीकच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी. कोमॉर्बीड व्यक्ती, लहान मुले, गरोदर स्त्रीया यांनी विशेष काळजी घ्यावी. कोविड-19 साथीच्या संभाव्य लाटेच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या अनुषंगाने तसेच उपचाराकरीता सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे. सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. शासकीय यंत्रणेकडून दिल्या जाणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा, असे ते यावेळी म्हणाले.
कोविड-19 साथीच्या संभाव्य लाटेच्या तयारीच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक व नियोजनाकरीता विविध यंत्रणांसमवेत आढावा बैठक घेवून सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी उदा. आठवडी बाजार, लग्न समारंभ, यात्रा/जत्रा, मॉल, चित्रपटगृह इत्यादी ठिकाणी मास्क वापरावा. सर्व खाजगी वैद्यकीय अधिकारी यांनी सर्दी, खोकला, ILI / SARI यासारख्या लक्षणांसाठी उपचाराकरीता येणाऱ्या सर्व रूग्णांची माहिती शासकीय यंत्रणेला त्वरीत कळवावी, जेणेकरून सदर रूग्णांची तपासणी करून इतरांना बाधा होवू नये याकरीता वेळीच उपाययोजना राबविणे शक्य होईल. नागरिकांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर, सामाजिक दुरीकरण पाळणे इत्यादी कोविड ॲप्रोप्रीएट बिहेवीअरचे तंतोतंत पालन करावे.
जागतिक आकडेवारीच्या आलेखानुसार वयोगट 40 ते 70 यामधील व्यक्तींना कोविड-19 ची बाधा जास्त प्रमाणात झालेली आहे. त्याअन्वये जिल्ह्यातील 40 ते 70 यामधील व्यक्तींवरती जास्त लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. कोविड लसीकरणामुळे साथीचा फैलाव होण्यास बाधा होते व कोविड-19 आजाराकरीता रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामुळे ज्याप्रमाणे पहिल्या डोसचे लसीकरण 99 टक्के झालेले आहे, त्याप्रमाणे दुसऱ्या डोसचे लसीकरण पूर्ण करण्याबाबत तसेच प्रिकॉशनरी डोसचे प्रमाण अत्यल्प (9.35 टक्के) असल्यामुळे प्रिकॉशनरी डोसच्या लसीकरणावरती भर देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. ILI/SARI सर्व्हेक्षण करून सर्व संशयिंत रूग्णांची आर.टी.पी.सी.आर. तपासणी करण्याबाबत, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय मिरज येथे कोविड रूग्णांकरीता स्वतंत्र उपचार कक्ष निर्माण करून राखीव बेडचे नियोजन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व रूग्णालयातील ऑक्सीजन पाईपलाईनची आवश्यकतेनुसार दुरूस्ती करून ऑक्सीजन पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या, PSA/LMO प्लाँटस सुरळीतपणे कार्यान्वीत राहतील याची दक्षता घेण्याच्या, सर्व रूग्णालयातील व्हेंटीलेटर, BiPAP, PSA / LMO प्लाँटस च्या दुरूस्ती व देखभालीकरीता स्वतंत्र ऑक्सीजन कन्सलटंट / टेक्नीशियनची नेमणूक करणे, सर्व आरोग्य संस्थामध्ये औषधे, मास्क, सॅनीटायझर, ग्लोजचा मुबलक प्रमाणात उपलब्ध ठेवण्याबाबत संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत.
सर्व शासकीय यंत्रणामध्ये ऑक्सीजन पुरवठा यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात येणार आहे. याकरीता एकूण 10.61 मे.ट. इतक्या क्षमतेचे 15 PSA प्लॉंटस व 150.1 मे.ट. इतक्या क्षमतेचे 15 LMO प्लाँटस कार्यान्वीत आहेत. याव्यतिरिक्त जिल्ह्यामध्ये 481 ऑक्सीजन कॉन्सट्रेटर, 412 लहान सिलेंडर, 662 जम्बो व 56 डुरा सिलेंडर उपलब्ध आहेत. कोविड-19 च्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या लाटेमध्ये कार्यान्वित असलेल्या एकूण 45 डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 2 हजार 513 खाटांची सुविधा असून यापैकी 746 आयसीयु बेड्स व 1 हजार 416 ऑक्सीजन बेड्स, 259 व्हेंटीलेटर, 149 HFNO, BiPAP 107 आहेत. एकूण 44 डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 1 हजार 651 खाटांची सुविधा असून यापैकी 132 आयसीयु बेड्स, 1 हजार 326 ऑक्सीजन बेड्स, 34 व्हेंटीलेटर, 13 HFNO, 42 BiPAP 42 आहेत. एकूण 37 डेडीकेटेड कोविड केअर सेंटरमध्ये 4 हजार 374 इतक्या खाटांची सुविधा आहे. जिल्हा क्रीडा संकुल मिरज येथे स्वतंत्र 156 बेडचे कोविड हॉस्पीटल असून यामध्ये 7 आयसीयु खाटांची सुविधा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.