प्रतिष्ठा न्यूज

तासगाव तालुका डॉल्बीमुक्त करणार : पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे ; शिवजयंतीला पारंपरिक वाद्यांचा वापर करा

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव:तासगाव तालुक्यात डॉल्बी चालक,मालकांनी धुडगूस घातला आहे,डॉल्बीच्या आवाजाने अक्षरशः लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. गावागावात गावदेव,वरातील डॉल्बीचे प्रस्थ वाढत आहे.मात्र आता तालुक्यात एकही डॉल्बी चालू देणार नाही,कोणीही डॉल्बी लावल्यास गुन्हे दाखल केले जातील असा खणखणीत इशारा तासगावचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी दिला आहे.शिवाय 19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंतीला कोणीही डॉल्बी लावू नयेत पारंपरिक वाद्यांचा वापर करावा,असे आवाहनही त्यांनी केले.वायफळे (ता.तासगाव) येथील ग्रामपंचायतीत आयोजित डॉल्बी मालक व ग्रामस्थांच्या बैठकीत निंभोरे बोलत होते यावेळी सरपंच संतोष नलवडे, उपसरपंच पंकज नलवडे उपस्थित होते.
निंभोरे म्हणाले,कोणत्या ना कोणत्या कारणास्तव वारंवार वायफळे येथे बैठका घ्याव्या लागतात,हे दुर्दैवी आहे. तालुक्यात 69 गावे आहेत.इतरही गावांचा भार पोलिसांवर आहे. वायफळे येथे दोन डॉल्बी आमने – सामने येतात,आवाजाच्या बाबतीत त्यांच्यात इर्षा लागते,त्यातून वादावादीचे प्रकार घडतात,हे योग्य नाही. डॉल्बीच्या आवाजाचा त्रास वृद्ध, लहान मुले, महिलांना होतो. डॉल्बी चालकांचा हा नंगानाच खपवून घेणार नाही,असा इशारा त्यांनी दिला. तर नवीन डॉल्बी आणल्याचे गावाला दाखवून देण्यासाठी तो मोठमोठ्या आवाजात गावात लावणे,ही मस्तीही खपवून घेणार नाही, असेही निंभोरे म्हणाले.ते म्हणाले आजपर्यंत डॉल्बी चालक – मालक कारवाईच्या कचाट्यातून वाचले आहेत.मात्र यापुढे तालुक्यात एकाही ठिकाणी डॉल्बी चालू देणार नाही.कोणीही डॉल्बी लावल्यास तो जप्त करून गुन्हे दाखल केले जातील.तसेच 19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंतीला कोणीही डॉल्बी लावू नये. पारंपरिक वाद्यांचा वापर करून जयंती शांततेत साजरी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी पोलीस कर्मचारी सचिन कुंभार,अभिजित गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश पाटील, शिवाजी पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
कुठेही डॉल्बी सुरू असल्यास पोलिसांना कळवावे : निंभोरे
तासगाव तालुक्यात कुठल्याही गावात यापुढे डॉल्बी चालू देणार नाही. डॉल्बी चालक, मालकांची गय केली जाणार नाही. डॉल्बी जप्त करून गुन्हे दाखल केले जातील. जर पोलिसांना अंधारात ठेवून एखाद्या गावात डॉल्बी सुरू असल्यास सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील अथवा ग्रामस्थांनी याबाबत तातडीने पोलिसांना कळवावे. नागरिकांनी पोलीस ठाण्याच्या 02346240100 या नंबरवर फोन करून डॉल्बीबाबत तक्रार करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक निंभोरे यांनी केले.
….तर कोणाचेही फोन घेणार नाही : निंभोरे
 तासगाव तालुक्यातील डॉल्बीबाबत अनेक तक्रारी येत आहेत. पण आता डॉल्बीवाल्यांचा धिंगाणा खपवून घेणार नाही. एखाद्या गावातील डॉल्बी जप्त करून गुन्हे दाखल केल्यास कोणत्याही गावपुढाऱ्याचा फोन घेणार नाही. पुढाऱ्यांना व डॉल्बी चालक – मालकांना हे सांगण्यासाठीच आज मी वायफळे येथे आलो आहे, असाही इशारा निंभोरे यांनी दिला.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.