प्रतिष्ठा न्यूज

अग्रण धुळगाव बनतेय मका उत्पादनाचे हब

प्रतिष्ठा न्यूज
एक गाव एक वाण योजनेंतर्गत कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रण धुळगाव या गावाने मका उत्पादनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दोन वर्षांपूर्वी मका पिकाकडे केवळ जनावरांसाठी चारा अशा दृष्टीने पाहिली जात होते. मात्र आता एक गाव एक वाण आणि कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे गाव मका उत्पादनाचे हब बनले आहे.
अग्रण धुळगाव हे कवठेमहांकाळ पासून 8 कि.मी. अंतरावर पूर्वेकडे असणारे गाव. गावाचे भौगोलिक क्षेत्र 1809.88 हेक्टर असून 1589 हेक्टर क्षेत्र वहिवाटीखाली येते. गावची ओळख तशी दुष्काळी गाव म्हणूनच. अग्रणी नदी पुनरुज्जीवित झाल्यानंतर गावात मका, बाजरी, उडीद, सोयाबीन, गहू, खपली, ऊस, भाजीपाला पिके घेतली जात. काही प्रमाणात फळबाग लागवडी घेतल्या जात होत्या. मका पिकाचे सरासरी उत्पन्न एकरी 20 क्विंटल होते. कितीही कष्ट घेतले तरी जास्तीत जास्त 25 ते 30 क्विंटल उत्पन्न मिळू शकेल असा लोकांचा समज झाला होता.

मका पीक पद्धतीत अमुलाग्र बदल
एक गाव एक वाण या योजनेचा आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने एकरी 60 क्विंटल मका उत्पादन घेण्यासाठी गावातील शेतकऱ्यांनी बेत आखला. यासाठी गावातील ज्या शेतकऱ्यांकडे सर्व सुविधा उपलब्ध आहेत अशा शेतकऱ्यांची निवड करण्यात येऊन अधिक उत्पादन देणाऱ्या बियाणांची निवड करण्यात आली. शेती शाळा आणि कृषी विभागाचे मार्गदर्शन यातून मका पिकाची 60 x 20 से.मी. अंतर ठेवून पेरणी करण्यात आली. पेरणी करण्याअगोदर बियाणास विटावॅक्स पावर या बुरशीनाशकाची गावचौ या कीटकनाशकाची आणि अझोटोबॅक्टरची बीज प्रक्रिया करून जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करण्यात आली. पेरणी वेळी मिश्र खत 10:26:26 – 108 किलो, झिंक्स सल्फेट 10 किलो आणि युरिया तीन किलो एकरी देण्यात आले. पेरणीनंतर 72 तासाच्या आत ऍट्राझीन या तणनाशकाची फवारणी करण्यात आली.

खत व्यवस्थापन
मका पीक चार पानावर असताना एकरी 33 किलो युरिया, पीक 8 पानावर असताना एकरी 40 किलो युरिया, तुरा अवस्थेत असताना एकरी 27‍ किलो आणि दाणे भरत असताना एकरी 7 किलो युरिया देण्यात आला. खत दिल्यानंतर पाठोपाठ पाणी देण्यात आले.

पाणी व्यवस्थापन
रासायनिक खताबरोबरच मका पिकाला पाणी देण्याचे व्यवस्थापन तितकेच महत्त्वाचे आहे. मका पिकासाठी पाणी देण्याच्या महत्त्वाच्या चार अवस्था (क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस) आहेत यानुसार रोप अवस्थेत (25 दिवसांनी), तुरा बाहेर पडताना (45 दिवसांनी), दाणे भरतेवेळी (75 दिवसांनी) आणि पक्वता अवस्थेत (90-95 दिवसांनी) मका पिकाला पाणी देण्यात आले.

कीड व रोग व्यवस्थापन
पेरणीनंतर लष्करी आलेली नियंत्रणासाठी एकरी चार कामगंध सापळे लावण्यात आले. लष्करी अळीच्या पतंगाचा अटकाव करण्यासाठी बांधावर नेपियर गवताची लागवड, मका पीक दोन ते तीन पानावर असताना पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी, चार ते पाच पानावर असताना निंबोळी अर्क व क्लोरोपायरीफॉस आणि सायपरमेथ्रीची फवारणी व दहा ते बारा पानावर असताना दशपर्णी अर्क इमामेक्टिन बेंजोएट फवारणी करण्यात आली. याबरोबरच दर पंधरा दिवसांनी अंडा अमिनो ऍसिड या संजीवकाची दोन वेळा फवारणी केल्यामुळे पानांचा आकार तसेच रोपांची वाढ अतिशय चांगल्या पद्धतीने झाली.
मका उत्पादन घेताना पंचसूत्रीचा अवलंब केल्यामुळेच निवड केलेल्या शेतकऱ्यांपैकी रमेश संभाजी खंडागळे या शेतकऱ्याने एकरी 59.52 क्विंटल तर अन्य सहा शेतकऱ्यांनी एकरी 50 क्विंटल व तीन शेतकऱ्यांनी एकरी पंचवीस क्विंटल पर्यंत उत्पादन घेतले.

विक्री व्यवस्थापन
सांगली जिल्ह्यात फूड इंडस्ट्रीसाठी मका खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची सुमारे 50 हजार टनाची मागणी आहे. ही गरज भागवण्यासाठी शेजारील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यातून मका विकत घेतला जातो. पण आता एकाच वाणाची, कलरची, साईजची आणि कॉलिटीची मक्का मोठ्या प्रमाणात एकाच गावातून मिळणार असल्याने जिल्ह्यातील फूड इंडस्ट्रीसाठी काम करणाऱ्या व्यापाऱ्यांचे लक्ष आग्रण धुळगावकडे लागले आहे.

गाव करील ते राव काय करील या उक्तीनुसार अग्रण धुळगावच्या शेतकऱ्यांनी मका उत्पादनात आपल्या गावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेतकऱ्यांनी एकरी 50 क्विंटल उत्पादन घेतले आणि किमान 25 रुपये दर जरी मिळाला तर चार महिन्यात एक लाख 25 हजार रुपयांचे हमखास उत्पन्न मिळू शकते.
-एकनाथ पोवार

माहिती अधिकारी जिल्हा माहिती कार्यालय, सांगली

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More
Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.