प्रतिष्ठा न्यूज

द्राक्ष बाग अच्छादन योजनेस अनुदान वाढवून दया संदीप गिड्डे पाटील यांची उपमुख्यमंत्री फडणवीस यांचेकडे मागणी

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : राज्यामध्ये सांगली,नाशिक, सातारा, पुणे, सोलापूर, जालना, परभणी आदी जिल्ह्यामध्ये द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. आपल्या राज्यातील नगदी पिकांपैकी द्राक्ष हे प्रमुख पीक आहे.द्राक्षाच्या एकूण उत्पादना पैकी काही निर्यात केली जाते, तसेच काही वाटा बेदाणा प्रक्रियेसाठी वापरला जातो व उर्वरित द्राक्ष वाईन प्रक्रियेसाठी वापरली जातात.यामुळे या पिकापासून आपल्याला परकीय चलन देखील उपलब्ध होते.द्राक्ष पिकाची एकूण उलाढाल अंदाजे २० हजार कोटी पेक्षा जास्त आहे.द्राक्ष पीक जरी नगदी पीक असले तरी या पिकास अनेक रोगांचा प्रादुर्भाव होतो,यामध्ये प्रामुख्याने छाटणीनंतर पडलेल्या पावसामुळे जास्त नुकसान होते.
द्राक्ष पिकाचे अवकाळी पावसापासून संरक्षण व्हावे याकरिता द्राक्ष पिकासाठी ५० टक्के अनुदानावर अच्छादन योजना कृषी विभागाने आणली होती, मात्र या योजनेस तुटपुंजा निधी मिळाला असल्यामुळे जास्त शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकले नाहीत.गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यभरात अवकाळी पावसाने द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळावी यासाठी आग्रही मागणी आहे. मात्र द्राक्ष पिकांचा पंचनामा करीत असताना नुकसानीचा अंदाज लावण्याची तांत्रिक यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध नाही,त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकची नुकसान भरपाई देण्यास अडचणी येत आहेत.
दरवर्षीच राज्यात अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकाचे नुकसान होण्याच्या घटना वेळोवेळी होत असतात.मात्र यावर्षी अवकाळी पाऊस संपूर्ण राज्यभरात झालेला आहे. तसेच या पावसामुळे ऑगस्ट पासून ऑक्टोबरपर्यंत छाटण्या घेतलेल्या सर्वच शेतकऱ्यांच्या द्राक्षबागा बाधित झाल्या आहेत.
त्यामुळे राज्य शासनाच्या द्राक्ष पीक आच्छादन अनुदान योजनेस जर निधी वाढवून दिला तर जास्तीत जास्त शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील व दरवर्षी होणारे अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान टाळता येईल.शेतकऱ्यांना दरवर्षी नुकसान भरपाई देण्यापेक्षा आच्छादनासाठीचे अनुदान एकदाच देणे राज्य शासनाला देखील परवडू शकेल.त्यामुळे  द्राक्षाच्या आच्छादन योजनेस किमान २००० कोटींची तरतूद करावी व द्राक्ष उत्पादकांना दिलासा द्यावा,अशी  विनंती भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.