प्रतिष्ठा न्यूज

माणूस केवळ त्याच्या विचारांना उन्नत करून उभारी घेऊ शकतो- डाॅ. संगिता पाटील

प्रतिष्ठा न्यूज
पंढरपूर प्रतिनिधी : ज्या व्यक्तीकडे विचारांचा भक्कम पाया नाही. त्या व्यक्तीच्या आयुष्याची इमारत भक्कम उभीच राहू शकत नाही. आपण संकटावर मात करून जिंकू शकतो आणि सिद्धी मिळवू शकतो. हे आपल्या मनावर बिंबवले पाहीजे. माणूस स्वतःमुळेच घडतो किंवा बिघडतो. विचारांची योग्य निवड व खरा वापर करून तो दैवतत्वाची उंची मिळवू शकतो. तर विचारांच्या चुकीच्या वापराने, दुर्विचाराने त्याची अधोगती पशूंपेक्षा खालच्या पातळीपर्यंत होऊ शकते.चांगले विचार, चांगल्या कृती कधीच वाईट परिणाम आणू शकत नाहीत; वाईट विचार व कृती कधीच चांगले परिणाम आणू शकत नाहीत. ज्याने शंका व भीतीवर विजय मिळवला त्याने अपयशावर विजय मिळवला असे समजा. त्याचा प्रत्येक विचार शक्तीने भारावलेला असतो. सगळ्या अडचणींना हिमतीने तोंड दिलेले असते व शहाणपणाने त्याच्यावर मात केलेली असते. योग्य ऋतुमध्ये त्याच्या हेतूंची पेरणी झालेली असते. त्यामुळे ते बहराला येतात. त्यांना अशी फळे लगडतात जी कधीच जमिनीवर पडत नसतो. म्हणूनच माणूस केवळ त्याच्या विचारांना उन्नत करून उभारी घेऊ शकतो असे मत डाॅ. संगिता पाटील यांनी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये बोलताना व्यक्त केले.
रोटरी क्लब ऑफ पंढरपूर व एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर याच्या संयुक्त विद्यमानाने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात डाॅ. संगिता पाटील यांचे “आनंदी विचारांची शक्ती” या विषयावर प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या व्याख्यानाच्या सुरुवातीस प्रा. अंजली चांदणे यांच्या हस्ते डाॅ. संगीता पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. हे व्याख्यान इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. यामध्ये १५० हुन अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. हे व्याख्यान यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख डाॅ. भालचंद्र गोडबोले, प्रा. अंजली चांदणे, प्रा. स्वप्ना गोड, प्रा. सोनाली घोडके, संध्या शिंदे, कविता आदलिंगे, सत्यवान वसेकर आदींसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.