प्रतिष्ठा न्यूज

गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागासाठी 5 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 18 : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. स्पर्धेत भाग घेण्यास इच्छुक असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी करावयाच्या अर्जाचा नमुना दि. 4 जुलै 2023 च्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णयामधील परिशिष्ट-अ प्रमाणे आहे. या नमुन्यामध्ये माहिती भरून ती माहिती ऑनलाईन पध्दतीने पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com  या ई-मेल आयडीवर  दि. 5 सप्टेंबर 2023 पूर्वी सादर करावयाची आहे, असे जिल्हास्तरीय गणेशोत्सव पुरस्कार समिती अध्यक्ष तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल. सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड शासनाने ठरवून दिलेल्या निकषांच्या आधारे करण्यात येईल. शासनाच्या  निकषाप्रमाणे निवड होणाऱ्या पहिल्या 3 विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा राज्य शासनाकडून प्रथम क्रमांकास 5 लाख रूपये,  व्दितीय क्रमांकास 2 लाख 50 हजार रूपये व तृतीय क्रमांकास 1 लाख रूपये या प्रमाणे पारितोषिक व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात येणार आहे.
जिल्हास्तरीय समितीने राज्यस्तरीय समितीकडे शिफारस केलेल्या जिल्ह्यातील प्रत्येकी एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास 25 हजार रूपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचा  दि. 4 जुलै 2023 रोजीचा शासन निर्णय पाहावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.