प्रतिष्ठा न्यूज

तासगाव भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहाय्यकास चोप… शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रदीप माने आक्रमक

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगावच्या भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार नेहमीच चर्चेचा विषय आहे.येथील सरकारी कर्मचारी नेहमीच गैर हजर असल्याच्या अनेक तक्रारी असून देखील यावर प्रशासना कडून कारवाई न करता पाठीशी घालण्याचा प्रकार सुरु असल्याचे दिसून येत आहे. तसेच भूमी अभिलेख कार्यालयात अनेक बोगस लोक काम करतात,ही लोकं सरकारी कागदपत्रे हाताळतात सामान्य लोकांच्या कडून वारेमाप पैशाची मागणी करतात याच मुद्द्यावरून सेनेचे प्रदीप माने यांनी काही दिवसापूर्वी भूमिअभिलेख कार्यालयात जाऊन आक्रमक पवित्रा घेऊन इशारा दिला होता,परंतु त्यात कोणताही बदल न झाल्याने आक्रमक झालेले शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) तालुका प्रमुख प्रदीप माने यांनी आज भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक चंद्रकांत शिरढोणे यांना चोप दिला.सरकारी कागदपत्रे बोगस लोकांच्या हातात दिल्याने माने यांना संताप अनावर झाला.तसेच याठिकाणी कामं करणाऱ्या खाजगी व्यक्तीसहि चोप देण्यात आला.
दत्त माळावरील प्रशासकीय इमारतीत भूमी अभिलेख कार्यालय आहे,या कार्यालयातून मोजणी,नकाशे,जुने सातबारा,नोंदी यासह अन्य कामे होतात.मात्र या कार्यालयात कधीही गेले तर एकही अधिकारी वेळेवर उपस्थित नसतो.अनेकवेळा टेबल रिकामे पडलेले असतात.सामान्य नागरिकांना एका कामासाठी अनेक हेलपाटे मारावे लागतात.या कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी लोकांची दाद घेत नाहीत हि वस्तुस्थिती आहे.त्यामुळे सामान्य लोक या कार्यालयाच्या बेधुंद कारभाराला वैतागले आहेत.काही दिवसांपूर्वी प्रदीप माने यांनी या कार्यालयाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आणला होता.माने यांच्यासह सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यालयास अचानक भेट दिली होती. त्यावेळी कार्यालयातील 70 टक्के खुर्च्या रिकाम्या पडल्या होत्या.कोण कुठं गेलं आहे,याची कोणालाच कल्पना नव्हती.लोक मात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांची वाट पाहत उभे होते. त्यांना कोणीही व्यवस्थित माहिती देत नव्हते.या कार्यालयाचे प्रमुख वाय. सी.कांबळे हेही गैरहजर होते.हा प्रकार पाहून माने चांगलेच संतापले होते.या कार्यालयाच्या कारभारात सुधारणा झाली नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.सेनेच्या इशाऱ्यानंतरही या कार्यालयाच्या कारभारात सुधारणा झाली नाही. त्यामुळे आज पुन्हा प्रदीप माने यांनी या कार्यालयास अचानक भेट दिली. आजही कार्यालय प्रमुख वाय.सी. कांबळे गैरहजर होते.ते कुठे गेले आहेत याबाबत कोणाकडेही माहिती नव्हती.हालचाल रजिस्टर मागितले असता ते नसल्याचे सांगण्यात आले. याचवेळी खाजगी व्यक्ती कार्यालयातील मूळ नकाशे घेऊन त्यावरून दुसरा नकाशा तयार करत असल्याचे दिसून आले.हा प्रकार पाहून माने चांगलेच संतापले. शासकीय कागदपत्रे,मूळ नकाशे बोगस व्यक्तीच्या हातात दिल्याने संतापलेल्या माने यांनी मुख्यालय सहाय्यक चंद्रकांत शिरढोणे यांना धारेवर धरले,लोखंडे याने केलेल्या नकाशावर आपणच सह्या करत असल्याचे शिरढोणे यांनी कबूल केले. हा प्रकार पाहून माने यांनी शिरढोणे यांच्या कानाखाली लगावली.तर मूळ नकाशे खाजगी माणसाच्या ताब्यात देणाऱ्या अन्य एकाचेही गाल रंगवले.
यापुढे या कार्यालयात एक जरी बोगस व्यक्ती दिसला तर याद राखा,असा दम यावेळी माने यांनी दिला.तर सोमवारी पुन्हा या कार्यालयात येऊन कार्यालय प्रमुख कांबळे यांना जाब विचारणार असल्याचे माने यांनी सांगितले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.