प्रतिष्ठा न्यूज

पेट्रोलियमजन्य पदार्थांची वाहतूक, पुरवठा, वितरण सुरळीत राहण्यासाठी सांगली जिल्हा प्रशासन दक्ष – प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे; जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा – पेट्रोल व डिझेल वितरण सुरळीत – नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 2 : भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑईल कार्पोरेशन या तेल कंपन्यांच्या डेपोमध्ये पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांच्या आगामी संपाच्या पार्श्वभूमिवर पेट्रोलियमजन्य पदार्थांची वाहतूक, पुरवठा व वितरण सुरळीत राहील यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष आहे. जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा असून, पेट्रोल व डिझेल वितरण सुरळीत सुरू आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज येथे केले.

तिन्ही कंपन्यांच्या डेपोमध्ये पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांच्या संपाच्या पार्श्वभूमिवर जिल्हा प्रशासनातर्फे महसूल व पोलीस विभागाचे अधिकारी, एचपीसीएल, बीपीसीएल आणि आयओसीएल इंधन डेपो व्यवस्थापक, तिन्ही कंपन्यांचे समन्वयक, वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी व अन्य विक्री व्यवस्थापक यांची तातडीची संयुक्त बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात घेण्यात आलेल्या या बैठकीस सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, तिन्ही कंपन्यांचे अधिकारी, समन्वयक, वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी आदि उपस्थित होते.

या बैठकीत जिल्ह्यातील इंधन साठ्याचा आढावा, तसेच संपामुळे पेट्रोल डिझेलच्या वाहतूक व वितरणावर झालेल्या परिणामाचा, वाहतूकदारांना येणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यात आला. वाहतूकदार संघटना व डेपो व्यवस्थापक यांनी त्यांची बाजू मांडली. तसेच, प्रत्येक डेपोला गरजेनुसार २ पोलिसांचा बंदोबस्त देण्याचे तयारी जिल्हा प्रशासनातर्फे दर्शवण्यात आली.

प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ अंतर्गत पेट्रोल व डिझेलचा जीवनावश्यक वस्तू म्हणून अंतर्भाव होतो. या अधिनियमांतर्गत पेट्रोलियमजन्य पदार्थांची वाहतूक, पुरवठा व वितरण सुरळीत राहील यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष आहे. पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांच्या आगामी संपाच्या पार्श्वभूमिवर वाहनचालक व वाहतूकदार यांच्याकडून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येऊ नये म्हणून तसेच पेट्रोलियम पदार्थांच्या वितरणात अडथळा येऊ नये म्हणून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, जिल्ह्यातील जवळपास ९० टक्के इंधन वितरण एचपीसीएल, बीपीसीएल आणि आयओसीएल या तीन कंपन्यांकडून केले जाते. या तिन्ही कंपन्यांकडून टँकर्सद्वारे पेट्रोल पंप चालकांना सुरळीत इंधन वितरण सुरू असल्याची खात्री केली आहे. जिल्ह्यातील पेट्रोल, डिझेल व अन्य पेट्रोलजन्य पदार्थांच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर विपरित परिणाम होऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून, डेपो मॅनेजर, वाहतूकदार व डीलर्स यांच्यामध्ये समन्वय ठेवला जाणार आहे. याचा दैनंदिन आढावा घेतला जाणार आहे. महसूल व पोलीस अधिकाऱ्यांची पथके तयार करून पेट्रोलपंपांच्या इंधनाचा साठा तपासला जाणार आहे, असे त्या म्हणाल्या. तसेच, भविष्यात संपांची वेळ आली तर आगाऊ साठा करून ठेवण्याचे निर्देश देऊन त्यांनी तिन्ही कंपन्यांनी सांगली जिल्ह्याला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. अपवादात्मक स्थितीत पेट्रोल, डिझेलची वाहतूक करणारे वाहनचालक वाहतुकीस विरोध करत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाईचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.