प्रतिष्ठा न्यूज

पुन्हा गुलाम व्हायचे नसेल तर जागे राहा : डॉ. सुभाष देसाई; चक्रवर्ती सम्राट अशोक पुस्तकाचे सांगलीत प्रकाशन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : लोकशाही वाचवायची की निरंकुश, हुकुमशाही राजसत्ता आणायची हे ठरवा. आता (२०२४) मध्ये जागृतपणे निर्णय घ्या. सध्याची धार्मिकता पेशवाईला निमंत्रण देणारी ठरेल. धार्मिक, सांस्कृतिक गुलामगिरी येऊ द्यायची नसेल तर जागे राहा. समविचारींना सोबत घेऊन सजगपणे वाटचाल करा, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत व लेखक डॉ. सुभाष देसाई यांनी केले. त्यांच्या ‘चक्रवर्ती सम्राट अशोक’ या पुस्तकाचे प्रकाशन काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष व गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाचे प्रमुख पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार यांच्या अध्यक्षतेखाली व माजी मंत्री अजितराव घोरपडे, सौ. विजया पाटील, मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव अमृतराव सूर्यवंशी, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष प्रणिता पवार तसेच ज्येष्ठ साहित्यिक वसंत केशव पाटील, डॉ. संजय पाटील, ए. डी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवनात हा कार्यक्रम शुक्रवारी राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त झाला. याच कार्यक्रमाने ३ ते १२ जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती ते राष्ट्रमाता जिजाऊ जयंती दरम्यान झालेल्या ‘दशरथोत्सव २०२४’ ची सांगता झाली.
डॉ. देसाई म्हणाले,
“गौतम बुद्ध, सम्राट अशोक, स्वामी विवेकानंद आणि छत्रपती शिवाजी महाराज हा आपला मोठा वारसा विसरू नका. वसंतदादा पाटील यांच्या जिल्ह्यात जातीयवादी, धर्मांध वातावरण निर्माण व वाढू देऊ नका. जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी धर्माच्या बेड्या तोडल्या पाहिजेत, तरच आपली प्रगती शक्य आहे आणि काळाच्या कसोटीवर आपण टिकू शकू.”
ते म्हणाले,”गौतम बुद्धांच्या नंतर २०० वर्षांनी जन्मलेल्या सम्राट अशोकाने आपला राज्य विस्तार आजच्या म्यानमारपासून मध्य आशिया पर्यंत तसेच दक्षिणेला चोल राजवटीपर्यंत केला. त्यांचे अखंड साम्राज्य होते. ८४ हजार राजे मांडलिक होते. मात्र कलिंगच्या युद्धानंतर त्यांनी गौतम बुद्धांच्या शिकवणुकीचा केवळ अंगीकार केला असे नाही तर बौद्ध धर्माच्या शिकवणुकीचा दूरवर प्रसारदेखील केला. आपली राजवट समाजाच्या उपयोगी पडेल अशा कृती केल्या. ज्येष्ठ, पशुधन, प्रवासी, यात्रेकरू यांची काळजी यासाठी खूप काम केले. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना गौतम बुद्धांची शिकवण व सम्राट अशोकांचे विचार अशोक चिन्हांसह राज्यघटनेत समाविष्ट करावे वाटले. या सा-याचा आदर्श आजच्या राज्यकर्त्यांनी घेण्याची गरज आहे.”
अमृतराव सूर्यवंशी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले माजी मंत्री अजितराव घोरपडे, पृथ्वीराज पाटील, जिल्हाध्यक्ष सचिन पवार यांनी मनोगत व्यक्त केले. जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष प्रणिता पवार यांनी सूत्रसंचालन केले. सचिव सौ. ज्योती सावंत यांनी आभार मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.