प्रतिष्ठा न्यूज

पार्किंगच्या जागेवर कर आकारणीचा निर्णय तातडीने रद्द करा…आमदार सुधीर गाडगीळ यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. १४ : सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील पार्किंगच्या जागेवर कर लावण्याचा महापालिका प्रशासनाने घेतलेला निर्णय तातडीने रद्द करावा, अन्यथा लोकांचा असंतोष उफाळून येईल, असा इशारा आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिला आहे.
आमदार गाडगीळ यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त गुप्ता यांना एक निवेदन दिले आणि या निर्णयाचा तातडीने फेरविचार करण्याची मागणी केली.
आमदार गाडगीळ यांनी निवेदनात म्हटले आहे की महापालिका क्षेत्रातील पार्किंगच्या जागेवर रिकाम्या प्लॉटच्या दराने मालमत्ता कर आकारण्याचा महापालिका प्रशासनाचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. वास्तविक ज्या नागरिकांनी त्यांच्या अपार्टमेंट मध्ये किंवा बंगल्याच्या परिसरात पार्किंगची सोय केली आहे त्यांना महापालिकेने शाबासकी देऊन त्यांना प्रशस्तीपत्रक देणे गरजेचे आहे. कारण त्यांनी रस्त्यावरची पार्किंगची जागा आणि अडथळे वाचवले आहेत. महापालिका प्रशासनाने पार्किंगची जागा ठेवणाऱ्या अशा मालमत्ताधारकांना अथवा अपार्टमेंटच्या सोसायटीना मालमत्ता करात पाच ते दहा टक्के सूट दिली पाहिजे. त्याऐवजी त्यांच्यावरच मालमत्ता कर बसवणे हा अजब प्रकार आहे.
आमदार गाडगीळ यांनी निवेदनात म्हटले आहे की, प्रशासकीय काळात महापालिका प्रशासनाकडून अधिक गतीने शहराचा विकास होणे आवश्यक आहे. शहरातील रस्ते,ड्रेनेजची व्यवस्था ,पाणीपुरवठा याकडे महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे. पावसामुळे खराब होणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याकडेही तातडीने लक्ष द्यावे. त्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावावी. महापुराचा धोका लक्षात घेऊन ज्या ज्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना आहेत त्या कराव्यात त्याऐवजी अशा पार्किंगच्या जागेवर मालमत्ता कर बसवण्यासारखे चमत्कारिक निर्णय घेऊ नयेत.
आमदार गाडगीळ यांनी निवेदनात म्हटले आहे की, अशा पद्धतीचे निर्णय घेतल्याने नागरिकांचा रोष निर्माण होईल आणि प्रशासनाबद्दलही प्रतिकूल मत निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे प्रशासनाने तातडीने या निर्णयाचा फेरविचार करावा आणि आमच्या सूचनेनुसार पार्किंगची जागा ठेवणाऱ्या मालमत्ताधारकांना उलट प्रोत्साहन म्हणून नेहमीच्या मालमत्ता करात (म्हणजेच घरपट्टीमध्ये)थोडी सवलतही द्यावी.
आमदार गाडगीळ यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात माजी नगरसेविका स्वातीताई शिंदे, उर्मिला बेलवलकर, रजिया नाईक, माजी सभागृह नेते युवराज बावडेकर, माजी नगरसेवक सुब्राव मद्रासी, संजय यमगर, इम्रान शेख, अशरफ वांकर, विश्वजीत पाटील, अमर पडळकर, रोहित जगदाळे, सुजित राउत, हेमालता मोरे, सुमित शिंदे, प्रथमेश वैद्य, अनिकेत खिलारे, केदार खाडिलकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.