प्रतिष्ठा न्यूज

कार्यकारणभाव शोधण्यासाठी प्रश्न पडणे महत्त्वाचे – जगदीश काबरे – विज्ञान दिनानिमित्त अंनिसचा ‘हसत खेळत विज्ञान’ कार्यक्रम

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : 28 फेब्रुवारी या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सांगलीच्या रयत शिक्षण संस्थेच्या ‘कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूल’ या शाळेमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती चा हसत खेळत विज्ञान या कार्यक्रम झाला. याप्रसंगीअंनिसचे कार्यकर्ते जगदीश काबरे म्हणाले की, “आपण शालेय पुस्तकात विज्ञान शिकतो. पण विज्ञान हे फक्त पुस्तकात बंदिस्त नसतं, तर ते आपल्या अवतीभवतीच असतं. निसर्गात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे काहीतरी कार्यकारणभाव असतो आणि तो कार्यकारणभाव शोधण्यासाठी प्रश्न पडणे, चिकित्सा करणे, त्याची उत्तरे शोधणे त्यासाठी प्रायोगिक सिद्धता करणे हीच विज्ञानाची पद्धती आहे. आपण डोळे आणि डोके उघडे ठेवले तरच आपल्याला प्रश्न पडतील हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी ढेकर का येते? जांभई का येते? चालताना आपण हात हलवत का चालतो? अशी सोपी सोपी उदाहरणे देऊन त्यामागील शास्त्रीय स्पष्टीकरण दिले. अशा साध्या साध्या प्रश्नातूनच मोठ मोठे शोध लागलेले आहेत. जसे की सी व्ही रामन युरोपातून भारतात आगबोटीतुन येत असतांना आकाश निळे दिसले आणि त्यांना प्रश्न पडला की आकाश निळे का दिसते? हा साधा प्रश्न पडल्यामुळे त्यावर संशोधन करून त्यांनी नोबेल पारितोषिक विजेता ‘रामन परिणामा’चा प्रबंध त्यांनी लिहिला. तो प्रबंध 28 फेब्रुवारी रोजी त्यांनी प्रसिद्ध केला. म्हणून त्या दिनाचे औचित्य साधत आपण 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो’.

नंतर सांगली शाखेच्या अंनिसच्या धडाडीच्या कार्यकर्त्या त्रिशला शहा आणि आशा धनाले यांनी ‘हसत खेळत विज्ञाना’चा द्विपात्री नाट्य प्रयोग सादर करतांना अनेक छोटे छोटे सहज करता येण्यासारखे वैज्ञानिक प्रयोगही करून दाखवले. अशाप्रकारे या दोघींनी विज्ञानातल्या गमती जमती आणि वैज्ञानिक स्पष्टीकरणे देत मुलांना जवळजवळ दोन तास गुंगवून ठेवले.

या कार्यक्रमासाठी शाळेचे विश्वस्त एडवोकेट अजित सूर्यवंशी, अंनिसच्या शहर अध्यक्ष गीता ठाकर आणि प्रा. अमित ठाकर, मालोजीराव माने आवर्जून उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी जगताप यांनी स्वागत केले. नंतर सी व्ही रामन यांच्या फोटो समोर दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून शाळेचे तरुण आणि धडपडे विज्ञान शिक्षक हुसेन मगदूम आणि त्यांचे इतर सहकारी शिक्षक यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.