प्रतिष्ठा न्यूज

प्रा. विश्वनाथ व्हनमोरे यांची लोकसेवा आयोगामार्फत दुय्यम निबंधक श्रेणी – १ व राज्य कर निरीक्षक पदी निवड

प्रतिष्ठा न्यूज
मिरज: मिरजेतील कन्या महाविद्यालयात इंग्रजी विभागाकडे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे विश्वनाथ भाऊसाहेब व्हनमोरे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांमधून दुय्यम निबंधक श्रेणी -१ तसेच राज्य कर निरीक्षक या दोन पदांसाठी निवड झाली.
कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगाव या गावचे सुपुत्र असलेले विश्वनाथ व्हनमोरे यांनी एस. के. पाटील महाविद्यालय, कुरुंदवाड येथून पदवी तर शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून इंग्रजी विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. अध्यापनाची आवड असल्याने ते नेट, सेट व के सेट या पात्रता परीक्षादेखील उत्तीर्ण झाले. गेली सहा वर्षे ते मिरजेतील कन्या महाविद्यालयात वरिष्ठ विभागाकडे इंग्रजी विषयासाठी सी. एच. बी. तत्वावर सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. अध्यापनासोबतच प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. जिद्द, चिकाटी व कठोर अभ्यास या त्रिसूत्रीचा अवलंब करून त्यांनी लागोपाठ दोन पदांना गवसणी घालत यश प्राप्त केले.
त्यांना नालंदा अकॅडमी, सांगलीचे संस्थापक अनिकेत साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशात त्यांचे वडील भाऊसाहेब, आई मंगल व बहीण डॉ. अश्विनी यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी संपादन केलेल्या या दैदीप्यमान यशाबद्दल दि न्यू मिरज एज्युकेशन सोसायटीचे सचिव राजू झाडबुके, संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास माळकर, उपप्राचार्या डॉ. सुनिता माळी, पर्यवेक्षिका प्रा. नलिनी प्रज्ञासूर्य, इंग्रजी विभागप्रमुख डॉ. माधुरी देशमुख, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.